प्रकाश ज्ञान शक्ति केन्द्र

* श्रीगुरुजींचे मनोगत

जीवन म्हणजे सततचा संघर्ष. आयुष्यात प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळतंच असं नाही. कित्येकदा ठरवतो एक आणि होतं दुसरंच. तर कधी काही कल्पना नसताना समस्या उभ्या राहतात. काय करावं, सुचेनासं होतं. मन सैरभैर होतं आणि आधार शोधू लागतं. अशा वेळी निश्चित सुचवावसं वाटतं की, श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या या अघोरकष्टोद्धरणस्तोत्राचा आश्रय घ्यावा. या स्तोत्राच्या आवर्तनाने आत्मविश्वास निश्‍चितपणे वाढतो आणि संकटाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आपोआप मिळतं.

विश्वातील अनेक ज्ञात व  अज्ञात व्यक्ति आणि शक्ति यांच्या प्रेरणेनुसार या स्तोत्रावर, खोपोली येथील स्थानी मी विवेचन केलं होतं. या विवेचनांच्या आधारे ओम सद्गुरू प्रतिष्ठानतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचे हक्क मी ओम सद्गुरू प्रतिष्ठानास देत आहे.

स्तोत्राचा मथितार्थ सहज आणि सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तो अर्थ समजून घेऊन जे पठण करतील, त्यांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. जसा भाव तसा अनुभव, हा अध्यात्मातील नियम असल्याने, यश मिळेलच अशा सकारात्मक विचाराने या स्तोत्राचं पठण करावं. या स्तोत्राच्या सामर्थ्याचा अनुभव पिढयान् पिढया लोकांनी घेतला आहे. सर्व साधकांनीही आपल्या अनुभवाच्या कक्षेत या स्तोत्राचं सामर्थ्य आणावं, हीच माझी सदिच्छा आहे.

— बापट गुरुजी.