यज्ञ कार्यक्रम वृत्त : सन २०१६
यज्ञ कार्यक्रम वृत्त : सन २०१६
महिम्न स्वाहाकार -यज्ञ क्र.३६०(रविवार,दिनांक ११ डिसेंबर २०१६)-
दिनांक ११ डिसेंबर २०१६ रोजी, अर्थात महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ३६०वा संकल्पित महिम्न स्वाहाकार गायत्री गार्डन, बदलापूर येथे संपन्न झाला. प्रदोष निमित्ताने हा स्वाहाकार घेण्यात आला. सकाळी यजमानांच्या हस्ते आणि पूज्य आईंच्या उपस्थितीत यज्ञ प्रज्वलन झाले. आवाहनीय मंत्रांनंतर महिम्न स्तोत्राच्या सामूहिक आवर्तनांना सुरुवात झाली.
सकाळच्या सत्रात शिवमानस पूजा संपन्न झाल्यानंतर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी ह्यांच्या अमृत वाणीतून प्रकट झालेलं ध्वनिमुद्रित विवेचन “महिम्न स्वाहाकार” उपस्थितांनी श्रावण केलं. ह्या विवेचनाचा सारांश असा,

“प्रदोष म्हणजे संधिकाल. हा संधिकाल घातक आणि उपयोगी असा दोन्ही प्रकारातला असू शकतो. आपल्या अध्यात्माने प्रत्येक दिवशीच्या संधिकालामध्ये म्हणजे सूर्योदय, सूर्यास्त आणि मध्यान्न काळात कोणते नित्यकर्म करावे हे ठरवून दिलं आहे. तसंच दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष ह्याच्या मध्ये येणाऱ्या प्रदोषरूपी संधिकालात काय करावं ह्याचंही मार्गदर्शन केलं आहे. अध्यात्म असं सांगतं की ह्या पर्वकाळी चांगल्यात चांगलं सत्कर्म करावं. जे ह्या पर्वकाळात कोणतही सत्कर्म करू शकत नाहीत, त्याचं काही नुकसान होईल असं नाही, मात्र ह्या संधिकालात उत्तमोत्तम कर्म जे करतील त्यांचा निश्चितपणे फायदा आहे. संधिकालात पहिल्यांदा लय होतो आणि ह्या लयानंतरच सृजनाला सुरुवात होते. शिव ही लयाची देवता आहे. त्याची आराधना केली असता प्रत्येकजण शिव होतो अन्यथा प्रत्येकाचे शव कधीतरी होणारच आहे. म्हणून ४८ तासाच्या ह्या प्रदोषकाळामध्ये काही ना काही तरी सत्कर्म घडलं तर त्याचा गुणाकार होऊ शकतो.
स्तवन म्हणजे स्तुती. स्तवन जरा मनापासून केलं तर त्या शक्तीचा आविष्कार होऊ शकतो म्हणून अध्यात्माने ह्या स्तवनाला महत्त्व दिलं आहे. सबंध महिम्न स्तोत्र हे स्तवन आहे. महिम्ना इतके उत्कृष्ट स्तवन दुसरे नाही. त्यात मंत्राची अमोघ शक्ती आहे. विशेषतः महिम्न पठण जर प्रकाश शक्ती ज्यामध्ये जाज्वल्याने प्रकट झालेली असते त्या यज्ञासमोर केलं, तर शक्तीलहरींचा गुणाकार वातावरणात होऊ शकतो. महिम्नाचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. ओंकारेश्वर येथील अमरेश्वर मंदिरात महिम्नाचे ३१ श्लोक शिलालेखांवर कोरले आहेत. ह्या ३१ श्लोकांवर मधुसूदन सरस्वतींनी भाष्य केलं आहे. महिम्नाचं वैशिष्ट्य असं की ह्याच्या पठणाला कोणत्याही मर्यादा नाहीत. ज्यांना रुद्र म्हणणं शक्य नाही त्यांनाही महिम्न म्हणता येतं इतकं ते सुंदर आणि गेय आहे. स्तोत्रात म्हटलंय की महेशासारखा देव नाही, महिम्नासारखी स्तुती नाही, अघोर मंत्रासारखा श्रेष्ठ मंत्र नाही आणि गुरुतत्त्वासारखं श्रेष्ठ तत्त्व नाही. ह्या स्तोत्रात अद्वैतही सांगितलं आहे की ज्या ब्रह्मतत्त्वाला मी शिव म्हणतो तिथपर्यंत माझं स्तवन पोहोचू दे. महिम्नकारांनी ज्ञान आणि भक्तीचा सुरेख मिलाफ केला आहे. ह्या काव्यात नर्म विनोद आहे, तसंच त्यात उत्पत्ती, स्थिती, लय, विग्रह, अनुग्रहाची जोडदेखील आहे. असा अनुग्रह झाल्यावर सद्गुरु कृपा प्राप्त होते. ही कृपा महिम्न पठणाने निश्चितपणे प्राप्त होते. हे स्तोत्र अभिषेक आणि हवन अशा दोन्ही प्रसंगी म्हटलं जातं. हे चलित राहणारं स्तोत्र आहे, जागृत भक्तीचा उद्घोष करणारं स्तोत्र आहे. ह्यात आविष्कृत झालेलं ते शिवतत्त्व चराचरात भरलेलं आहे, अशी एकही जागा नाही जिथे ते नाही. तेव्हा त्याच भावनेने त्याला नमस्कार करुया.”

दुपारच्या सत्रात महिम्न आवर्तने सुरु ठेवण्यात आली. तसंच दोन दिवसांनी येणाऱ्या श्रीदत्तजयंतीचे औचित्य साधून प.प. श्रीमत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी रचलेल्या दत्तभावसुधारस स्तोत्राचे आणि कालभैरवाष्टक स्तोत्राचेही सामूहिक पठण करण्यात आले. वैद्यकीय समुपदेशन, जन्मपूर्व संस्कार, बालसंस्कार हे उपक्रम यथायोग्य संपन्न झाले. पूर्णाहुतीनंतर श्री सद्गुरु पादुका आणि पूज्य आईंच्या दर्शनाचा लाभ सगळ्यांनी घेतला.

विष्णुयज्ञ -यज्ञ क्र.३५९(रविवार,दिनांक १३ नोव्हेंबर २०१६)-
दिनांक १३ नोव्हेंबर २०१६ रोजी, महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ३५९ वा संकल्पित विष्णुयज्ञ बदलापूर येथे संपन्न झाला. आजचा दिवस सर्व यज्ञ साधकांसाठी अतिशय महत्त्वाचा होता कारण आज परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींचे प्रथम पुण्यस्मरण यज्ञ साक्षीने संपन्न झाले. ह्या दिवशी वैकुठ चतुर्दशी होती हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. पूज्य बापट ताईंच्या उपस्थितीत यज्ञ प्रज्वलन झाल्यानंतर श्रद्धासूक्त, पुरुषसूक्त, विष्णुसूक्त, श्रीसूक्त, लक्ष्मीसूक्त ह्यांचे पठण झाले व तद्नंतर विष्णूसहस्रनामाची सामूहिक आवर्तने सुरु करण्यात आली.
यज्ञाच्या दिवशी वामनराव ओक ह्या रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात पूज्य ताईंच्या हस्ते “श्रेष्ठ मंत्रशक्ती” ह्या श्री सद्गुरुंच्या प्रथम संकलनात्मक पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर श्री सद्गुरुंच्या मुखातून सांगितली गेलेली श्रीदत्तात्रेय मानसपूजा सर्वांनी श्रवण केली आणि त्याआधारे ध्यानाद्वारे दत्तपूजा साकार केली. ही मानसपूजा प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी रचली आहे. त्यानंतर सर्व भक्तांचे प्रतिनिधित्त्व करत सौ. प्रिया दाभाडे ह्यांनी अतिशय ह्रद्य मनोगत श्री सद्गुरुंना कृतज्ञतापूर्वक अर्पण केले.

दिनांक २४ जून २००४ रोजी “विष्णु दैवत विज्ञान” ह्या विषयावर जे विवेचन घेतले होते त्याचं ध्वनीमुद्रण सगळ्यांनी श्रावण केलं. ह्या विवेचनाचा सारांश असा,
"महाविष्णु ही सत्त्व गुणांचे प्रतीक असलेली वेदकालीन प्रमुख देवता आहे. निर्मिती ते लय ह्या काळात विश्वाचे पालन करणारी ही देवता आहे. साक्षात वैश्विक शक्ती म्हणजे महाविष्णु. जगपालन करणं, लोकांना आनंदात ठेवणं, प्रत्येकाला मार्ग दाखवणं हे सगळं करणारी शक्ती म्हणजे महाविष्णू. जगाला व्यापून दशांगुळे उरलेल्या ह्या शक्तीच्या आधीन सर्व जग आहे. ब्रह्म देवाला विश्व निर्मिती करण्याची प्रेरणा सुद्धा महाविष्णुने दिली. ह्या दैवताच्या अनेक प्रतिमा प्रचलित आहे. उत्तर भारतात वैकुंठ निवासी विष्णूची प्रतिमा प्रसिद्ध आहे. विठ्ठल प्रतिमा महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. श्रीनाथ प्रतिमा शंख, चक्र, गदा आणि कमाल धारण केलेली आहे. ह्या प्रत्येक आयुधाला काही सांकेतिक अर्थ आहे. उदाहरणार्थ चक्र हे दुष्ट निर्दालन आणि सृष्टीच्या रहाट गाडग्याचे प्रतीक आहे. पद्म हे पुरुष-प्रकृती मीलनाचे अर्थात उत्पत्तीचे प्रतीक आहे. ह्याच पद्माचा म्हणजे कमळाचा स्पर्श करून महाविष्णुंनी तपश्चर्या करत असताना त्रीमितीतून बाहेर पडलेल्या धृव बाळाला भानावर आणलं आणि आशीर्वाद दिले. पुढे ध्रुवाने अतिशय उत्तम राज्य केलं. दत्त प्रतिमेमध्ये सुद्धा तीनही गुणांचा मिलाप असला तरी प्रमुख शक्ती महाविष्णुंची आहे. दत्त प्रतिमेमध्ये तीनही गुणांचा समतोल असतो. महाविष्णू प्रतीकामधून अनेक उत्तम गुण आपल्याला घेता येतात, त्यातले प्रमुख म्हणजे व्यापकता, पालकत्त्व आणि नियमांचे पालन करून विश्वाला आनंद देणे. पूजन, अर्चन, यजन तीनही मार्गांनी विष्णू आराधना करता येते.विष्णू सहस्र्नामात विष्णू गुणांचे स्तवन केले गेले आहे. ह्याचं पठण हजारो वर्षांपासून ह्या संस्कृती मध्ये घडले असल्याने आजही जो कोणी विष्णू सहस्र नामाचे पठण करेल त्याला ती शक्ती मिळाल्यावाचून राहणार नाही आणि ह्या शक्तीच्या सहाय्याने ऐहिक कल्याणा बरोबर पारमार्थिक कल्याणही साध्य होईल.”,
दुपारच्या सत्रात विष्णू सहस्रनाम आवर्तने सुरु ठेवण्यात आली. पूर्णाहुती नंतर श्री सद्गुरु पादुका आणि पूज्य ताईंच्या दर्शनाचा लाभ सगळ्यांनी घेतला.

शतचंडी स्वाहाकार -यज्ञ क्र.३५८(रविवार,दिनांक ९ ऑक्टोबर २०१६)-
परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी प्रेरित दरमहा यज्ञ संकल्पाचे पुढचे पुष्प अर्थात शतचंडी स्वाहाकार दिनांक ९ ऑक्टोबर २०१६ रोजी गायत्री गार्डन, बदलापूर ह्या स्थळी संपन्न झाला. सौर शक्तीच्या माध्यमातून यज्ञ प्रज्वलन यजमानांनी पूज्य आईंच्या उपस्थितीत केले. आवाहनीय मंत्र झाल्यानंतर श्री दुर्गा सप्तशतीच्या सामूहिक पठण आणि हवनाला प्रारंभ झाला. प्रथम सत्रामध्ये परमपूज्य सद्गुरु लिखित "अघोरकष्टोद्धरण स्तोत्र – संपूर्ण अर्थ आणि विवरण : संपूर्ण अर्थ आणि विवरण”, ह्या ग्रंथाच्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन पूज्य आईंच्या शुभहस्ते करण्यात आले.
दिनांक १३ नोव्हेंबर रोजीच्या मासिक यज्ञाच्या दिवशी परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. हे दान ज्ञानपूर्वक घडावे ह्या हेतूने श्री आदित्य बापट ह्यांनी रक्त दान म्हणजे काय? ह्या विषयाचा विज्ञाननिष्ठ आढावा घेतला. ह्यानंतर दिनांक १४ डिसेंबर २०१४ रोजी परमपूज्य सद्गुरुंनी “अहं राष्ट्री” ह्या विषयावर जे विवेचन यज्ञ साक्षीने घेतेले होते त्याचं ध्वनीमुद्रण सर्वानी श्रवण केलं. विवेचनाचा सारांश असा,
“दुर्गासप्तशती मध्ये शक्तीच्या विविध रूपांचं वर्णन आलं आहे. समूह शक्तीच्या सामर्थ्यामुळे महिषासुरमर्दिनीने असुरांचा नाश केला. ह्या समूह शक्तीचं एक रूप म्हणजे राष्ट्रभक्ती. संपूर्ण विश्व एकाच चैतन्याचं स्वरूप आहे, ते एकाच दिशेने गमन करते आहे. गायनात कितीही ताल-सूर-लयाचं वैविध्य असलं तर शेवटी समेवर यावंच लागतं. तसंच विश्वगायनातली सम म्हणजे समता. वरवर कितीही विषमता असल्याचं भासलं तरी विश्वाच्या अंतरंगात संपूर्ण समता नांदते आहे. समतेकडे जाणार्‍या विश्वप्रवासाचं एक स्टेशन म्हणजे राष्ट्र. जेव्हा ह्या राष्ट्र-संकल्पनेचा आपण स्वीकार करतो तेव्हा “मी आणि माझे कुटुंबीय’, ह्यापासून आपण विशाल झालेलो असतो. उत्क्रांतीच्या काळात नीतीमूल्यांचा विकास होत गेला आणि त्यातूनच राष्ट्र संकल्पनेचा उद्गम झाला. अनेकविध लोकांची एकत्रित झालेली इच्छा शक्ती म्हणजे राष्ट्रशक्ती. ऋग्‍वेदामध्ये ऐतरीय ब्राह्मण ग्रंथात वैदिक राष्ट्र संकल्पनेचा उद्घोष केला आहे. ह्यात प्रामुख्याने आठ प्रकारच्या राष्ट्रशासनांचा उल्लेख आढळतो.
* साम्राज्य म्हणजे आर्यविधानं करून राष्ट्राचा विस्तार करणे.
*भौज्यं म्हणजे भौगोलिक मर्यादेतले राष्ट्र.
*लोकांनी निवडलेला नेता जेव्हा राज्य करतो तेव्हा त्याला स्वाराज्यं म्हणतात. उत्तम स्वाराज्य येण्यासाठी मुळात जनमानस शुद्ध पाहिजे.
*कोणताही एक नेता नाही तर संपूर्ण जनताच जेव्हा राज्य करते तेव्हा त्याला म्हणतात वैराज्यं.
*परमेश्वराच्या इच्छेनेच हे राष्ट्र चालतं ही भावना म्हणजे पारमेष्ठ्यं.
*तर अनेक छोटी छोटी राष्ट्र एकत्र येऊन बनलेलं राष्ट्र म्हणजे महाराज्यं.
*सनदी अधिकार्‍यांनी चालवलेलं राज्य म्हणजे अधिपत्यमय राज्य.
*समन्तपर्यायी राज्य म्हणजे अनेक मांडलिक राजे आणि सुभेदारी असलेलं राज्य.
* ह्या पलीकडे जाणारी संकल्पना म्हणजे ’वसुधैव कुटुंबकम्”. तिथे पर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रकल्याणाचा संकल्प असणे ही महत्त्वाची पायरी आहे. ह्यासाठी परस्पर सहयोग आणि समन्वय साधता आला पाहिजे.
तलवारीने तलवारीशी लढता येत नाही, त्यासाठी ढाल पाहिजे. दुष्प्रवृत्त लोकांचा विचारांचा हल्ला परतवण्यासाठी आपली मनाची ढाल बळकट पाहिजे. लढाई वृत्तींशी असावी माणसांशी नाही.तलवारीने लढाई जिंकण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते खरेतर हरले. पण लक्षात राहिले ते कृष्ण, गौतम बुद्ध, महावीर. सेनापती अनेक झाले पण लक्षात राहिले ते महात्मा गांधी ज्यांनी विचारांवर विजय मिळवला.त्यांनी व्यक्तिद्वेष केला नाही तर वृत्तिद्वेष केला. आपणही यज्ञात राष्ट्र कल्याणाची प्रार्थना घेतो. हेतु एकच की राष्ट्रकल्याणात आपलाही खारीचा वाटा असावा आणि सामूदयिक इच्छाशक्ती आपल्याला अनुकूल व्हावी. विनाशक शक्ती नाहिशा करून आत्मकल्याणाची दिशा गवसण्यासाठी राष्ट्र कल्याणाचा मार्ग स्वीकारता आला पाहिजे. त्यासाठी बळ देण्याची प्रार्थना आज आपण महिषासुरमर्दिनीला करुया”.

दुपारच्या सत्रात कुमारिका पूजन, बालसंस्कार आणि जन्मपूर्वसंस्काराचा वर्ग इच्छुकांसाठी घेण्यात आला. इतरांनी दुर्गासप्तशतीचं हवन-पठण सुरु ठेवलं. पूर्णाहुती आणि सद्‍गुरु आशीर्वादाने यज्ञ सोहळ्याची सांगता झाली.

पितृयज्ञ-यज्ञ क्र.३५७(शुक्रवार,दिनांक ३० सप्टेंबर २०१६)-
दिनांक ३० सप्टेंबर २०१६ रोजी गायत्री गार्डन, बदलापूर ह्या यज्ञ स्थळी पितृ पक्षातील अधिकीचा विशेष पितृयज्ञ संपन्न झाला. गायत्री मंत्र पठणासहित सौर उर्जे द्वारे यज्ञ प्रज्वलन झाले. विश्वातील सर्व देवा-देवतांच्या आवाहनानंतर श्रध्दासूक्त, सौर सूक्ताद्वारे पितृ शक्तीला सर्वांनी वंदन केले. प्रथम सत्रामध्ये केंद्रातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. ह्यामध्ये दिनांक १६ सप्टेंबर रोजी २५-३० साधक-भक्तांनी कल्याण इथल्या गणेश घाटाच्या गणपती विसर्जनानंतर केलेल्या स्वच्छता मोहिमेचा विशेष उल्लेख केला गेला. ह्या उपक्रमाचे स्थानिक प्रशासनामार्फतही कौतुक झाल्याचे सांगण्यात आले. ह्या व्यतिरिक्त अघोरकष्टोद्धरण स्तोत्र आणि ग्रंथाचा प्रसार आणि प्रचाराच्या कार्यक्रमाविषयी देखील माहिती देण्यात आली. दिनांक १८ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम दापोली येथे संपन्न झाला आणि त्यावेळी स्थानिक भक्त-साधाकांचा ह्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभल्याचे सांगण्यात आले.

अहवाल वाचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर परम पूज्य श्रीसद्‍गुरुंचे "पितृपूजा अर्थात श्राद्ध”, ह्या विषयावर २०१४ ह्या वर्षी संपन्न झालेल्या विवेचनाच्या ध्वनी-फितीचे श्रवण सर्वांनी केले. विवेचनाचा सारांश पुढीलप्रमाणे आहे,
"आपल्या संस्कृतीने पितृपूजेसाठी भाद्रपद महिन्यातले पौर्णिमेनंतरचे पंधरा दिवस पितृपंधरवडा म्हणून नियोजित केले आहेत. पितर म्हणजे आपल्याच घरातले पूर्वी होऊन गेलेले सर्व पूर्वज एवढेच नाहीत तर वेदांनी ह्याची व्यापक व्याख्या केली आहे. मनुष्यच नव्हे तर वृक्ष, पशू, पक्षी ह्यापैकी ज्यांच्या ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी लाभ झाला आहे, मदत प्राप्त झाली आहे आणि जे आज ह्या भूमीवर नाहीत, ते सगळे आपल्या पितरांमध्ये आंतर्भूत होतात. पितृपूजेसाठी महत्त्वाचा मानला गेलेला श्राद्ध विधी प्रथमतः महर्षी अत्रींनी संकलित केला. श्राद्ध करून पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. पहिली अट म्हणजे श्रद्धा. श्रद्धेने केलं जाणारं ते श्राद्ध अशी व्याख्या पाणिनीने केली आहे. ही श्रद्धा ज्ञानपूर्वक असावी. परंतु ह्या श्रद्धेआड येणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मानवाच्या मनातल्या विविध शंका. ह्यातली प्रमुख शंका म्हणजे आपण अर्पण केलेलं सत्कर्माचं पुण्य पितरांपर्यंत नक्की पोहोचत असेल ना? ह्यासाठी पितृपूजेमागचं विज्ञान, तत्त्वज्ञान समजावून घेता आलं पाहिजे.
कोणत्याही सत्कर्मासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात, पहिलं म्हणजे अंतरीचा भाव आणि दुसरं कृती. देवतांना मुख्यत्त्वे भावाची अपेक्षा असते तर पितृगणांना कृतीची अपेक्षा असते. म्हणून कृती ही पितृपूजेची दुसरी अट आहे. पितृपूजेची तिसरी अट म्हणजे ज्ञान, कारण नुसत्या कृतीपेक्षा ज्ञानपूर्वक केलेल्या कृतीला अधिक महत्त्व आहे. पितृपूजा म्हणजे आपण कोणावर उपकार करत नसतो तर आपण आपल्याच ऋणमुक्तीसाठी आवश्यक असलेलं कर्तव्य पालन करत असतो, हे ज्ञान समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पितृपूजनासाठी शेवटची आणि महत्त्वाची अट म्हणजे आत्मचिंतन. आपणही कोणाचेतरी पूर्वज होणार आहोत तेव्हा आपल्या वंशजांवर शांती करण्याची वेळ येऊ नये ह्याचे आत्मभान ठेवून आपल्याला आयुष्यभर सत्कर्मरत राहता आलं पाहिजे. आयुष्यभर सत्कर्म केलं तर मृत्यूपश्चात वंशजांवर अवलंबून राहण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.”

विवेचनानंतर पितृसूक्ताच्या पठणाने सर्व पितृगणांना यज्ञाच्या माध्यमातून पिंडदान आणि हविर्द्रव्याचे कृतज्ञतापूर्वक अर्पण करण्यात आले. हविर्द्रव्याचा काही भाग जलार्पणासाठी राखून ठेवण्यात आला. गायत्री मंत्राचा ५१ लक्ष जपसंकल्पही उपस्थितांकडून यज्ञ साक्षीने केला गेला. सद्‍गुरु पादुका आणि पूज्य आईंचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

श्री गणेश यज्ञ -यज्ञ क्र.३५६ (रविवार,दिनांक ११सप्टेंबर २०१६)-
दिनांक ११ सप्टेंबर २०१६ रोजी गायत्री गार्डन,बदलापूर पूर्व ह्या स्थळी पूर्वनियोजित श्री गणेश यज्ञ संपन्न झाला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा यज्ञ आयोजित करण्यात आला होता. ठीक ९.३० वाजता सौर ऊर्जेद्वारे यज्ञ प्रज्वलन झाले. विविध वैश्विक शक्तींच्या आवाहनानंतर श्रद्धा सूक्ताचे पठण झाले आणि त्यानंतर ब्रह्मणस्पती सूक्ताने श्री गणेशाला हविर्भाग अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व साधकांनी श्री अथर्वशीर्षाच्या सामूहिक आवर्तनांना सुरुवात केली.

सकाळच्या सत्रात प्रथम श्री गणेश मानसपूजा संपन्न झाली. त्यानंतर पूज्य आईसाहेबांच्या शुभहस्ते ““श्रीदत्तापराधक्षमापन स्तोत्र : संपूर्ण अर्थ आणि विवेचन”, ह्या परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या विवेचनांवर आधारित ग्रंथाचे विमोचन झाले. हा ग्रंथ श्री केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या अत्यंत अर्थगर्भ आणि शक्तिशाली स्तोत्रांवरच्या श्री सद्गुरुंच्या विवेचन मालिकेतलं अंतिम पुष्प म्हणजे त्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये दत्तअपराधक्षमापन स्तोत्रावर घेतलेली विवेचन मालिका. सद्गुरु भक्ती करत असताना शिष्याचा भाव नेमका कसा असला पाहिजे ह्याचं दिग्दर्शन स्वामी महाराजांनी ह्या स्तोत्रात केलं आहे.स्तोत्राच्या संपूर्ण अर्थाचे विवरण करताना श्री सद्गुरुंनी हे स्तोत्र उपस्थितांकडून पठणही करून घेतले होते. ही विवेचन मालिका संपली आणि त्यानंतर अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत श्री सद्गुरु ब्रह्मलीन झाले. तेव्हा हे अंतिम विवेचन ग्रंथ स्वरूपात आणण्याचा अत्यंत औचित्यपूर्ण सोहळा आजच्या यज्ञ प्रसंगी संपन्न झाला.
ह्यानंतर श्री सद्गुरुंच्या २००४ साली संपन्न झालेल्या “श्री गणेश दर्शन आणि ध्यान” ह्या विवेचनाच्या ध्वनिमुद्रणाचे श्रवण सर्वांनी केले. ह्या विवेचनाचा सारांश असा,
“ वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या नावांनी ईश्वर ही संकल्पना आहे. आदिम काळापासून ही संकल्पना मनुष्याला भेडसावत आली आहे. आजही कोणताही विचारी मनुष्य त्या शक्तीचा उगम शोधण्याचा प्रयत्न करतो, जिथून सृष्टीची उत्पत्ती झाली. अनुभवी सत्पुरुषांना ह्या बाबतीत आलेल्या अनुभवांना अध्यात्मात प्रचीती म्हणतात. प्रत्येकाच्या ईश्वरी संकल्पनेला अनुसरून हे अनुभव भिन्न भिन्न असतात. ह्या भिन्न भिन्न ईश्वरी संकल्पनेचं एक पूर्ण रूप म्हणजे श्रीगणेश. वस्तुतः आपल्यातही ईश्वराचा अंश आहे. पण आपल्यात ही शक्ती अजून अपूर्ण रुपात आहे. आपल्याला जरा पूर्णत्त्व प्राप्त करायचं असेल तर ईश्वरी संकल्पना वाढवत नेली पाहिजे आणि स्वतःविषयीची संकल्पना कमी करत गेलं पाहिजे. असं केलं तरच तुम्ही एक दिवशी ‘अहं ब्रह्मास्मि” ह्या अवस्थेपर्यंत पोहोचाल. “तुका आकाशाएवढा’, हे अहंकाराचे नव्हेत तर स्वानुभवाचे उद्गार आहेत. एवढं विशाल व्हायचं असेल तर आपल्यातली सहभावना वाढवत नेली पाहिजे आणि समोरच्यातही तो ईश्वर बघता आला पाहिजे. आपल्यातले दोष ओळखून तो कमी करण्याचा संकल्प केला पाहिजे. आपल्यातला संकुचितपणा काढून टाकला पाहिजे. त्यासाठी नवविधा भक्ती मधलं आत्मनिवेदन हे सर्वात महत्त्वाचं आहे.“काहीही न मागण्याची” मागणी जेव्हा केली जाते तेव्हाच तुम्हाला खरी भक्ती करता येते. जेव्हा ईश्वरी संकल्पना परमोच्च स्तरावर न्याल तेव्हा ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी ईश्वराने प्रारब्ध भोगाचे जे कडू काढे दिले असतील ते निष्ठावानाचे संरक्षण करणारे असतील. तेव्हा साक्षात्कार हवा असेल तर हे कडू काढे, हे तपाचे काढे घेतलेच पाहिजेत. द्वैत भाव-दुजा भाव संपूर्ण संपवून टाकला पाहिजे. “नामा म्हणे केशीराजा, केला नेम चालवी माझा”, अशी अवस्था झाली पाहिजे.”

अन्नपूर्णाष्टक स्तोत्राच्या पठणाने यज्ञ नारायणाला नैवेद्याचे अर्पण करण्यात आले. जन्मपूर्व संस्कार, जन्मोत्तर संस्कार आणि वैद्यकीय समुपदेशन हे उपक्रम नित्याप्रमाणे यज्ञासह सुरु होते. दुपारच्या सत्रात अथर्वशीर्ष आवर्तने पुन्हा सुरु करण्यात आली. अंतिमतः आद्य शंकराचार्य आणि स्वामी महाराज विरचित विविध गणेशस्तोत्रांचे यज्ञ साक्षीने पठण करण्यात आले. पूर्णाहुती नंतर श्री सद्गुरु-पादुका दर्शन आणि आईसाहेबांचे दर्शन घेऊन यज्ञ कार्यक्रमाचा समारोप झाला.

दत्तयज्ञ- यज्ञ क्र.३५५(रविवार,दिनांक १४ ऑगस्ट २०१६)-
दिनांक १४ आणि १५ ऑगस्ट २०१६, गुरुपौर्णिमा निमित्त दत्तयज्ञ तथा सामूहिक सत्यदत्त पूजा सोहळा

दिनांक १४ ऑगस्ट रोजी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी नुकत्याच होऊन गेलेल्या गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने बदलापूर येथील गायत्री गार्डन येथे दत्तयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. ह्याच दिवशी गुरुपौर्णिमा सोहळा सुद्धा यज्ञ साक्षीने साजरा करण्यात आला. नित्याप्रमाणे सौर ऊर्जेच्या साहाय्याने यज्ञ प्रज्वलन यजमानांच्या हस्ते झाले. त्यावेळी पूज्य सौ. आई स्वतः उपस्थित होत्या. यज्ञ प्रज्वलनानंतर आवाहन मंत्र तथा इतर मंत्र आणि हवन संपन्न झाल्यानंतर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या ध्वनिमुद्रित आवाजामध्ये श्रीदत्तात्रेयांना १०८ नावांनी साद घालण्यात आली आणि हविर्द्रव्य अर्पण करण्यात आलं.

मुख्य गुरूपौर्णिमेचा सोहळा ह्यानंतर सुरु झाला.ह्या प्रसंगी अत्यंत हृद्य असं निवेदन करण्यात आलं.
“दरवर्षी आपण अतिशय आनंदाने श्री सदगुरूंचे तसेच आईंचे स्वागत करत असतो. या वर्षी प्रथमच श्री सदगुरू एका वेगळ्या रुपात आपल्या भेटीस येणार आहेत ते म्हणजे पादुकांच्या रूपाने... चिदरूपाने..आज ते येथे आगमन करणार आहेत. म्हणूनच दरवर्षी पेक्षाही जास्त उत्साहाने आणि आनंदाने त्यांचे स्वागत नामस्मरणाच्या जल्लोषात आपल्याला करायचे आहे...त्यांच्या स्वागतासाठी आपल्या स्वयंसेवकांनी पालखी सजवून सज्ज केली आहे आणि पालखीत विराजमान होवून सदगुरू या ठिकाणी आगमन करणार आहेत..... यात कोणतीच शंका नाही... १००% पूर्ण खात्री आहे की त्यांचे आगमन याठिकाणी आज होणार आहे..... सदगुरूंनी आपल्याला दिलेले आणि आजही ते देत असलेले प्रेम आणि त्यांच्या सहजकृपेविषयी आपल्याला काही सांगायला नको कारण आपल्यातल्या प्रत्येकाने ते अनुभवलेले आहे. ते आपल्याला देत असलेल्या ज्ञानाची तोड तर साऱ्या विश्वात कुठेच नाही. अशा आपल्या सदगुरुचे मन आसुसलेलं असतं ते फक्त भक्ताच्या निरागस भावासाठी....निरागस भक्तीसाठी...भावनेसाठी.
आपण जाणता की आपले गुरुजी हे आध्यात्मातल्या अत्युच्च पदावर आहेत. तरी ते प्रत्येक भक्ताशी अगदी सहज संवाद साधत असत. अध्यात्मासारखा रुक्ष विषय देखील ते अतिशय सोपा करून...त्याला गोष्टींची विनोदाची झालर लावून ते आपल्याला समजावून देतात. आपण अनुभवलं आहे की, ते कधीही विनाकारण गंभीर राहत नसत तर त्यांच्या स्वभावातली सहज मिश्कील छटा देखील आपण अनुभवलेली आहे. जेव्हा कोणी स्वयंसेवक साधक बऱ्याच दिवसांनंतर गुरुजींसमोर यायचा तेव्हा सुद्धा गुरुजी एका विशिष्ठ मिस्कील पद्धतीने त्याची विचारपूस करायचे कि... ‘काय रे ! काय म्हणताय....?’ त्यांच्या अशा बोलण्यातले ते प्रेम ते त्यांचे निरागस हास्य मनाला स्पर्शून जाणारे असते....
गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक भक्त त्या अधीर मनाने आपल्या सदगुरूला शोधत असतो...स्मरत असतो. आज जरी बाहेर सर्व सृष्टी जलधारांनी न्हाऊन निघत असली तरी आपले मन मात्र त्या सदगुरुच्या एक कृपाकटाक्षासाठी तहानलेलं आहे. याच जलधारांचे रूप घेवून त्यांनी माझ्या हृदयात बरसावं...जेणेकरून त्यातून त्या निरागस भक्तीचे सृजन होईल... अज्ञानरुपी या अंधकारात त्यांनी प्रकाशकिरण बनून प्रकट व्हावे...प्रत्येक भक्ताची याप्रसंगी हीच प्रार्थना असते की,‘सदगुरू मी तुमच्या चरणी शरण आलो आहे आता मात्र मला दूर करू नका.. अगदी मला मरण जरी आले तर ते सुद्धा तुझ्याच स्मरणात असतांना येऊ द्या आणि केवळ तरच माझ्या भक्तीचा हा स्वर निरागस होईल आणि तो तुमच्या पर्यंत पोहोचेल...मगच खऱ्या अर्थाने अखंड आणि अविनाशी अशा तुझे दर्शन मला होईल......
चला तर मग..!! आपण सिद्ध होऊया त्यांचे दर्शन घ्यायला...आज बऱ्याच महिन्यानंतर ते आपल्याला भेटत आहेत आणि जणू आपली विचारपूस करत आहेत की, ‘काय रे ! कसे आहात ?? आपण सर्वांनी हरी ओम गुरुजी असे म्हणत साद घालूया त्या सदगुरूशक्तीला..... “हरी ओम...गुरुजी....!!!!””

ह्या भावस्पर्शी निवेदनानंतर परमपूज्य सद्गुरुंच्या पादुकांचं आगमन छत्र, चामर आणि दंडधारी सेवकांच्या सन्मानात झाले. त्यावेळी मातोश्री सौ. आईसाहेब सोबत होत्याच. औक्षण झाल्यानंतर पादुका वाजत गाजत व्यापीठापर्यंत आणण्यात आल्या. आगमनाच्या वेळी गजर झाला, “ओम मंगलम ओंकार मंगलम, गुरु मंगलम गुरुपाद मंगलम” आणि त्याचवेळी समोरच्या व्यासापीठावर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या देखण्या आणि प्रसन्नवदन रूपाचं भव्य छायाचित्राच्या स्वरूपात अवतरण झालं! आतापर्यंत निर्गुणात जाणवणारं त्यांचं अस्तित्त्व साक्षात सगुणरूप धारण करून यज्ञ मंडपात पुन्हा अवतीर्ण झालं आणि नकळत सर्व भक्तांचे अष्टसात्विक भाव अश्रुंच्या रूपाने झरझर वाहू लागले. सद्गुरुंचा देह पंचतत्त्वात विलीन झाल्यानंतरची ही पहिलीच गुरुपौर्णिमा! बघता बघता गजर झाला, “जय नर्मदे जय नर्मदे, नमामि देवी नर्मदे| नर्मदे हर, नर्मदे हरहर, नर्मदे हर, हर हर”.
ह्यानंतर पादुकांचे षोडशोपचारपूर्वक एका ज्येष्ठ दांपत्यामार्फत पूजन करण्यात आले. त्यावेळी सर्व भक्तांनी सामूहिक रीत्या विविध स्तोत्र-मंत्रांचं पठन केलं. यज्ञात अखंड हवन सुरु होतंच. पादुका पूजन झाल्यानंतर श्री सद्गुरुंच्या ध्वनिमुद्रित विवेचनाचे श्रवण सर्व उपस्थितांनी केले. विवेचनाचा विषय होता, सद्गुरुतत्त्वाचं संकीर्तन. खोपोली स्थानावर गुरुचरित्र सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक ३१ जानेवारी २०१५ रोजी हे विवेचन श्रीगुरुदेवांनी घेतलं होतं. विवेचनाचा सारांश असा,

“ईश्वराचं संकीर्तन हे भक्तिशास्त्रातलं अमोघ साधन आहे. गुरुतत्त्वाच्या कीर्तनामुळे, गुणवर्णनामुळे चित्तावरचं मालिन्य जे दुर्दैवरूपाने साठलेलं असतं ते धुतलं जातं. संपूर्ण एकरूप मनाने गुरुतत्त्वाच्या संकीर्तनाचं अवगाहन जरा आपण केलं नाही, तर ते गुरुतत्त्व तुमच्यात प्रविष्ट होऊ शकत नाही आणि पर्यायाने मालिन्य धुतलं जाऊ शकत नाही. संकीर्तानासाठी सर्वात आवश्यक म्हणजे श्रद्धा आणि निश्चय.श्रद्धा असल्याशिवाय निश्चय होत नाही आणि निश्चयाशिवाय श्रद्धा दृढ होऊ शकत नाही. श्रद्धा आणि सत्कर्माचा निश्चय नसेल तर सत्कर्मात डळमळीतपणा येतो. दुसरी अट म्हणजे एकरूपता आणि एकतानता. भक्त सद्गुरूंशी एकरूप असेल तर ते गुरुतत्त्व त्या भक्ताबरोबर सावली सारखं सतत असतं. संकीर्तानाची तिसरी अट म्हणजे कृपेची पात्रता. ही पात्रता धैर्यामुळे येते. अल्प धारिष्ट्य दाखवून संसारात येणार्या सुख-दुःखांना धीराने सामोरं जाऊन सत्कर्मरत राहणाऱ्या भक्ताबरोबर सर्वज्ञ, सर्वतंत्र, आणि स्वतंत्र गुरुतत्त्व कायम असतं. खऱ्या भक्ताने महिमेच्या आणि सवंग लोकप्रियतेच्या मागे कधीही लागू नये. पुढची पायरी म्हणजे आर्ततेने गुरुमाउलीला हाक मारणे आणि प्रामाणिक आत्मनिवेदन करणे. त्यानंतर येते अनन्य शरणागती. केलेल्या दुष्कर्मा बद्दल निसर्ग नियमाप्रमाणे शिक्षा ही होत असतेच. पण गुरुतत्त्व ही शिक्षा सतत सुसह्य करत असतं. वस्तुतः मानहानी, धनहानी, वित्तहानी ही सुद्धा कृपाच आहे कारण त्याद्वारे श्रीगुरू तुमचा एकेक पाश सोडवत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुतत्त्वाच्या प्राप्तीची मुमुक्षा असणे. जिथे जिथे अंतिम सत्याची निस्वार्थ मागणी असते तिथे तिथे गुरुतत्त्व येतच. सर्वात शेवटी येतो कृतनिश्चय. प्रारब्धात जे कर्मनियम साठलेत ते दूर करण्यासाठी मी सत्कर्म करतो आहे असा दृढनिश्चय आणि तदनुरूप कृती पाहिजे. तरच गुरुतत्त्वाचं योग्यप्रकारे संकीर्तन करता येईल.”
अन्नपूर्णाष्टकम स्तोत्राच्या पठणाने यज्ञेश्वर नारायणाला भोजन प्रसादाची आहुती देण्यात आली. दुपारच्या सत्रात पठण-हवनाचं सत्र सुरु राहिलं. नमो गुरवे वासुदेवाय ह्या सिद्ध मंत्राची आवर्तनं आणि हवन घेण्यात आलं. पूर्णाहुती आणि पादुका दर्शनाने ह्या आनंद सोहळ्याची समाप्ती झाली.

दिनांक १५ ऑगस्ट २०१६ .. श्री सत्यदत्त पूजा
परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींची महत्त्वाची शिकवण म्हणजे “एकत्र येऊन सत्कर्म करा, यश तुमचंच आहे”. त्यामुळे सत्यदत्त पूजेसारख्या महान व्रताचे अनुपालनही समूहाने एकत्र येऊन केले तर त्यातून गुणाकाराने शक्तिवर्धन होते. ह्यासाठी सद्गुरु श्री बापट गुरुजींनी भक्तांना ज्या अनेक साधना सुचवल्या त्यापैकी एक महत्त्वाचे साधन म्हणजे सामूहिक सत्यदत्त पूजा. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रेरित आणि विरचित संहितेनुसार ह्या सत्यदत्त पूजा श्री सद्गुरु बापट गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली नित्याने आयोजित केल्या जातात. ह्या वर्षी एकूण ६१ सत्यदत्त पूजांचे आयोजन दिनांक १५ रोजी करण्यात आले होते. ह्या पूजांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये जात-लिंग-धर्म आदि सामाजिक भेदांना बाजूला सारून श्रद्धेने येणा-या प्रत्येकाला सहभागी होण्याची अनुमती असते. पूजेत पती-पत्नी एवढेच नव्हे तर भाऊ-भाऊ, आई-मुलगा, अशांनाही एकत्र पूजेला बसता येते. नुसते पूजेचे उपचार करणार्यांना नव्हे तर त्याच्या आयोजनासाठी सेवा देणार्या भक्तांनाही त्या पुण्यात सहभागी होता येते. जगात एकच-एक असणार्या त्या शाश्वत सत्य तत्त्वाला श्रीमद् स्वामी महाराजांनी दत्त असे नाम देऊन त्याची प्रत्यक्ष आणि मानसिक आराधना ह्या व्रताद्वारे सांगितली आहे.
स्वयंसेवकांनी अत्यंत नियोजनबद्ध प्रकारे सर्व पूजांची मांडणी सकाळीच करून ठेवली होती. सर्वप्रथम पूज्य आईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाचे प्रज्वलन झाले. ह्या वर्षी सुद्धा नित्याप्रमाणे प्रकाश शक्तीच्या सान्निध्यात पूजेचे आयोजन केले होते आणि त्यासाठी प्रथम यज्ञ प्रज्वलन झाले. त्यानंतर राष्ट्र कल्याणाची प्रार्थना झाली. ह्या दिवसाचे औचित्य साधून सर्वप्रथम राष्ट्रगीताचे सर्वांनी सामूहिक गायन केले. त्यानंतर पूजेचा आरंभ करण्यात आला. तत्पूर्वी परमपूज्य सद्गुरूंचे सत्यदत्त पूजा ह्या विषयावरील छोटेखानी विवेचनाचे ध्वनीमुद्रण सर्वांना ऐकवण्यात आले. श्री फाळके गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली व्यासपीठावर एका दांपत्याकडून यथायोग्य पूजा करवून घेतली जात होती. त्याचे प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर करून त्या आधारे इतर सर्व भक्त विहित उपचार करत होते.भक्तांना लागणारे सर्व साहित्य अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने स्वयंसेवकांकडून पुरवले जात होते. कुठेही गोंधळ किंवा गडबड न होता अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात सर्व पूजोपचार संपन्न झाले. त्यानंतर कथा वाचन होऊन आरती झाली. शेवटी नैवेद्यार्पण, पूर्णाहुती होऊन त्यानंतर प्रसाद भोजनाचा सर्वांनी लाभ घेतला आणि ह्या दोन दिवसीय अलभ्य सोहळ्याची सांगता झाली.

श्री गायत्री यज्ञ- यज्ञ क्र.३५४ (रविवार,दिनांक १० जुलै २०१६)-
दिनांक १० जुलै रोजी बदलापूर येथील गायत्री गार्डन येथे श्री गायत्री यज्ञ संपन्न झाला. सकाळी यजमानांच्या हस्ते आणि पूज्य आईंच्या उपस्थितीत यज्ञ प्रज्वलन झाल्यानंतर सुरुवातीला आवाहनीय मंत्र आणि श्रद्धा सूक्ताचं पठण झालं. त्यानंतर गायत्री मंत्राच्या सामूहिक पठणाला आणि हवानाला प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात मानसपूजेनंतर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींनी २००६ मध्ये केलेल्या विवेचनाच्या ध्वनिमुद्रणाचे श्रवण सर्वांनी केले. ह्या विवेचनाचा सारांश असा,
“मंत्र म्हणजे काय? तर जो मनाला त्राण देतो तो मंत्र. ज्याचं स्मरण केल्याने आपण तरतो तो मंत्र. काही मंत्र शब्दप्रधान आहेत, काही नादप्रधान आहेत तर काही अर्थप्रधान आहेत. अर्थप्रधान मंत्रांच्या प्रत्येक उच्चारणाबरोबर त्यातल्या अर्थावर एकाग्रता व्हावी लागते, पुन्हा पुन्हा ते चित्र डोळ्यासमोर उभं रहावं लागतं. गायत्री मंत्र हा शब्द आणि अर्थप्रधान अशा दोन्ही प्रकारातला आहे. ह्या मंत्राचा अर्थ आहे, “त्या सवितेच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो, जे आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो”. मंत्राचे परिणाम दिसण्यासाठी काही पूर्व अटी आहेत. मनापासून उच्चार करणे सर्वात महत्त्वाचे आहे. दुसरी अट म्हणजे एकाग्रता. तिसरं म्हणजे आपला अंतर्मनातल्या ब्रह्मतत्त्वाशी जुळवणूक करण्याचा संकल्प हवा. गायत्री मंत्राच्या पठणाने बुद्धीची विचारांचं पृथक्करण करण्याची क्षमता वाढते, चित्तावरचं मालिन्य दूर होऊ लागतं आणि त्यामुळे मन बलवान होऊ लागतं. पण पूर्वीची सर्व पुटं काढून टाकायची असतील तर ह्या मंत्राची वारंवार आवर्तनं करणं अनिवार्य आहे. दृढ संकल्प असेल तर हे शक्य आहे. तेव्हा निःशंक मनाने यज्ञतेजासन्मुख गायत्री तेजाचे स्मरण व प्रार्थना करा!"
दुपारच्या सत्रात नेहमीप्रमाणे जन्मपूर्व संस्कार, बालसंस्कार, वैद्यकीय समुपदेशन इत्यादि उपक्रम संपन्न झाले. पूर्णाहुती आणि सद्गुरु-पादुका दर्शनाने यज्ञ सोहळा संपन्न झाला.

ऋग्‍वेद संहितासार स्वाहाकार- यज्ञ क्र.३५३ (रविवार,दिनांक १२ जून २०१६)-
दिनांक १२ जून २०१६ रोजी ऋग्वेद संहिता सार स्वाहाकार हा ३५३ वा यज्ञ संपन्न झाला. सकाळी पूज्य आईसाहेब यांच्या उपस्थितीत आणि यजमानांच्या हस्ते सौर ऊर्जा आणि गायत्री जपासह यज्ञ प्रज्वलन झाल्यानंतर प्रथम सत्रामध्ये ऋग्वेद संहितेबद्दलची माहिती श्री आदित्य बापट ह्यांनी उपस्थितांना दिली. प्रथमतः गत यज्ञात सांगितलेल्या माहितीचा आढावा घेतला गेला. त्यानंतर सांगितलेल्या माहितीचा सारांश असा आहे.
“मानवी विचारांच्या उत्क्रांतीचा उगम म्हणजे ऋग्वेद. त्यात सुरुवातीला ज्या इच्छा प्रगट झालेल्या दिसतात त्या भौतिक स्वरूपाच्या आढळतात आणि त्यांच्या पूर्तीसाठी शेकडो देवतांची कल्पना केलेली आढळते. त्यापुढच्या काळात झालेल्या चिंतनाच्या प्रक्रियेतून एकेश्वर वादाचा उगम झाला. त्यातूनच पुढे वेदांताचा अर्थात ब्रह्म विचारांचा उद्गम झाला. ऋग्वेदातल्या पहिल्या मंडलातल्या ऋचा आपण गत यज्ञात पाहिल्या. दुसर्‍या मंडलात १९१ सूक्त आहेत. त्यात पथिकृत ऋषि-पूर्वजांना नमस्कार केला आहे. पथिकृत म्हणजे सन्मार्ग दाखवणारे. त्यांनी सन्मार्ग दर्शवला, त्याचं गंतव्य स्थानही सांगितलं पण सांगताना कुठेही उपदेशात्मक भूमिका ठेवली नाही. ऋग्वेद रचनाकारांच्या शब्दा-शब्दांमध्ये खूप नम्रता आहे. कुठलंही श्रेय स्वतःकडे घेतलेलं नाही तर हे आम्हाला दिसलं आणि आम्ही ते सांगितलं अशी नम्रतेची भावना आहे. म्हणून त्यांना मंत्रद्र्ष्टार ऋषी असं म्हटलं आहे. साध्या साध्या गोष्टीतल्या दिव्यत्त्वाचं दर्शन ज्यांना घडतं असे ते क्रांतदर्शी कवि होते. शिवोऽहम् शिवोऽहम् ही जाणीव प्रत्येकाला करून देणे हे त्यांचं ध्येय होतं.निसर्गाच्या महान रूपांची त्यांनी केलेली चिंतनं आणि रचलेल्या ऋचा म्हणजे त्यांनी निर्मिलेल्या मंत्रात्मक देवता होय. कोणत्याही वेदवाङ्‍मयाचा अर्थ चार प्रकारे लावता येतो. एक आधिभौतिक, दुसरा आधिदैविक, तिसरा आधियाज्ञिक आणि चौथा आध्यात्मिक.
ऋग्‍वेदाच्या दुसर्‍या मंडलातले अठरा मंत्र आपण अभ्यासासाठी निवडले आहेत. त्याचे प्रमुख रचनाकार आहेत गृत्समद आणि सोमाहुती ऋषी. ह्यापैकी गृत्समद ऋषी हे महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब गावचे असावेत असं मानलं जातं. ते श्रेष्ठ चिंतक आणि गणिती होते. ते कृषी संशोधकही होते. संघर्षपूर्ण जगण्याचा आणि प्रत्येक व्यवहारात यशस्वी होण्याचा त्यांचा निश्चय होता. त्यामुळे त्यांनी रचलेल्या दुसर्‍या मंडलातल्या ऋचांमध्ये अतिशय प्रभावी विचार प्रकट झाले आहेत.“मी इतरांचं श्रेय कधीही घेणार नाही. आमच्यात चांगले नेतृत्त्व गुण निर्माण होवोत. ज्ञानामुळे उन्नत झालेलं आमचं आयुष्य अजेय होवो. आमच्यातून द्वेष आणि छिद्रान्वेषीपणा नष्ट होवो. ते दुर्गुण आमच्यात नकोतच. श्रेष्ठत्वाचं मित्रत्त्व आम्हाला प्राप्त होवो. सर्वांना सोबत घेऊन उत्तम सामूहिक सत्‍कार्य आमच्या हातून घडावं. गणांच्याही गणपती, हे ब्रह्मणस्पती तू आपल्या सर्व आयुधांसह आमच्या सन्निध येऊन बस. जेणेकरून ते गुण आमच्यात स्फुरित होतील. आमच्या सत्कर्मांची सुकीर्ती सर्वत्र पसरो. हे रुद्रा तू आम्हाला आहार, विहार, विकार, विचार संतुलित करून सत्कर्म करण्यासाठी उत्तम आरोग्य दे.” हे असे तेजस्वी विचार ह्या ऋचांमध्ये आलेले आहेत. अठराव्या मंत्रामध्ये सरस्वती नदीकडे प्रवाहीपणाची, ज्ञानाची प्रार्थना केली आहे. “आमचे जीवन अज्ञानाने अप्रशस्त झाले आहे. तू ज्ञान देऊन आमचे जीवन तुझ्यासारखे प्रवाही गतिमान कर” अशी ही प्रार्थना आहे. ह्या अर्थपूर्ण प्रार्थना आजच्या काळातही आपण सर्वांनी करण्य़ाची गरज आहे”.

त्यानंतर गंगा दशहराचं औचित्य साधून जून २०१० मध्ये परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजी ह्यांनी “ गंगा दशहरा” ह्या विषयावर घेतलेल्या विवेचनाची ध्वनीमुद्रिका भक्तांना ऐकवण्यात आली. त्याचा सारांश असा,
“गंगेचे अवतरण हे गंगा-उत्तरी ह्या हिमनदी (glacier) मधून झाले आणि त्यानंतर दहा दिवसांनी गंगाजल हे गंगोत्री येथे पोहोचले. हा दहा दिवसांचा कालावधी आपण गंगादशहरा ह्या नावाने साजरा करतो. ह्या काळात केलेल्या सत्कर्मांमुळे दहापटीने पाप कमी होऊन, पुण्याचा गुणाकार दहा पटीने होऊ शकतो. गंगा नामाचं मूळ बीज आहे गॅं. गमन करणारा ओघ म्हणजे गंगा. गमन करणार्‍या ह्या ओघातून शक्तीची निर्मिती होत असते. ह्या शुद्ध शक्तीचा उपयोग सर्व सजीव करू शकतात. भगवान शिव शंकरांनी स्वतःच्या जटेत साठवलेला हा जलाचा ओघ सावकाशपणे पृथ्वीवर सिंचित केला. ह्या कथेतूनच पुढे जलाभिषेकाच्या परंपरेचा उद्गम झाला असावा. जलाभिषेकाचं महत्त्व सुद्धा मोठं आहे. देहस्नानाने देह शुद्धी होते तर थेंबा-थेंबाने केलेल्या अभिषेक उपचारामुळे आत्मशुद्धी होऊ शकते. दशहरा म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय ह्यातील अहंकाराचं हरण करणारा. अनेक रोगांचं हरण करणारी पुण्यसलीला गंगा आपल्या भवरोगाचंही हरण करू शकते. म्हणून गंगादशहरा कालावधी मध्ये मनाने तिच्या एकाग्रता साधण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे.”
ह्यानंतर गंगा मंत्रांचं पठण करून सर्वांकडून यज्ञामध्ये हवन करून घेण्यात आलं. दुपारच्या सत्रात वैद्यकीय समुपदेशन, जन्मपूर्व संस्कार, जन्मोत्तर संस्कार ह्या बरोबरच विद्यार्थी साहाय्यक योजनेचाही उपक्रम संपन्न झाला. आशीर्वाद मंत्रांनी आणि श्री सद्‍गुरु-पादुका दर्शनाने यज्ञाची सांगता करण्यात आली.

ऋग्‍वेद संहितासार स्वाहाकार-यज्ञ क्र.३५२(रविवार,दिनांक ८ मे २०१६)-
दिनांक ८ मे २०१६ रोजी परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजी प्रणित ३५२ वा यज्ञ संपन्न झाला. ह्या दिवशी भगवान परशुराम जयंतीचाही योग जुळून आला होता.
यज्ञप्रज्वलनानंतर प्रथमतः श्रद्धासूक्ताचे पठण झाल्यानंतर ऋगवेदातील पहिल्या मंडलातल्या निवडक ऋचांचं पठण आणि हवनास सुरुवात झाली. पहिल्या सत्रात परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजींच्या दोन पुस्तकाचे प्रकाशन झाले. पहिले म्हणजे “यज्ञरहस्य” ह्या ग्रंथाचे डॉ. श्रीपाद ह्यांनी केलेले, “ Yajna Rahasya : The secret of sacred fire” ह्या शीर्षकाचे इंग्रजी भाषांतर आणि दुसरे म्हणजे, “ध्यानातून ध्येयाकडे”, ह्या पुस्तकाचे प्रथम पुनर्मुद्रण. ही दोन्ही प्रकाशनं पूज्य आईसाहेब आणि श्री आदित्य बापट ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यावेळी संस्थेमार्फत जे निवेदन सादर करण्यात आले त्याचा सारांश असा,
“परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजींनी प्रथमतः सन १९९४ मध्ये सामूहिक यज्ञांचा संकल्प ईश्वरी प्रेरणेने केला. प्रकाशाकडून प्रेरणा घेऊन स्वयमोद्धार साधणार्‍या ह्या प्राचीन साधनेचं आधुनिक विज्ञानाच्या तत्त्वावर पुनरुज्जीवन करण्याचं हे कार्य गेली २२ वर्षं अविरतपणे सुरु आहे. आजवर झालेल्या ३५० पेक्षा अधिक यज्ञांमध्ये श्री सद्‍गुरु बापट गुरुजींनी यज्ञ साधनेवर आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने अनेक विवेचनं घेतली आहेत. श्री सद्‍गुरुंच्या यज्ञ विवेचनांवर आधारित ’यज्ञरहस्य’ हा ग्रंथ २०११ मध्ये प्रथम प्रकाशित झाला. त्यानंतर डॉ. अविनाश बिनीवाले ह्यांच्या सहकार्याने त्याचं हिन्दी भाषांतरही करण्यात आलं. मैसूरचे पूज्य स्वामी विरजानंद सरस्वती सन २०१३ मध्ये शतचंडी स्वाहाकाराला बदलापूर इथे त्यांच्या शिष्यांसमवेत उपस्थित होते. त्यांनी यज्ञ रहस्याचे हिन्दी भाषांतर वाचून त्यांचे शिष्य डॉ. श्रीपाद ह्यांना त्याचे इंग्रजी भाषांतर करण्याची आज्ञा दिली जेणेकरून मराठी न जाणणार्‍या भक्तांनाही गुरुजींच्या यज्ञ विचारांचा लाभ होऊ शकेल. डॉ. श्रीपाद ह्यानी पदार्थ विज्ञानात डॉक्टरेट मिळवली असून ते शासकीय़ अभियांत्रिकी महाविद्यालय, मंड्या, कर्नाटक इथे प्राध्यापक आहेत. परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजींनीही डॉ. श्रीपाद ह्यांना यज्ञरहस्याच्या इंग्रजी भाषांतरासाठी आशीर्वाद दिले. डॉ श्रीपाद ह्यांनी २०१४ मध्ये भाषांतराचं काम पूर्ण केल्यानंतर प्रकाशन विभागातल्या स्वयंसेवकांनी श्री गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली त्यावर पुनश्च संस्करण केले आणि आज ढवळे प्रकाशनाच्या माध्यमातून “ Yajna Rahasya : The secret of sacred fire” ह्या नावाने हा ग्रंथ प्रकाशित होतो आहे.
आज प्रकाशित झालेला दुसरा ग्रंथ म्हणजे श्री सद्‍गुरुंच्या विवेचनावर आधारित “ ध्यानातून ध्येयाकडे” ह्या ग्रंथाचे पहिले पुनर्मुद्रण. ह्या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे सन २००९ मध्ये पुष्कर क्षेत्री आयोजित सात दिवसीय यज्ञामध्ये श्री सद्‍गुरुंनी जो ध्यानपाठ घेतला त्यावर आधारित असलेला हा ग्रंथ आहे. जानेवारी २०१६ मध्ये ह्याची प्रथम आवृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतर दोन-अडीचशे पानांचा हा ग्रंथ सहा महिन्याच्या आत त्याचं पुनर्मुद्रण करावं लागत आहे.”

ह्यानंतर श्री आदित्य बापट ह्यांनी “ ’ऋग्‍वेद सारसंहिता“’ ह्या विषयावर पहिले विवेचन घेतले. ह्या विवेचनाचा सारांश असा , “ आज दिवसभर आपण ऋग्वेदातल्या पहिल्या मंडलातल्या ५१ ऋचांचे पठण करणार आहोत. व्याकरणदृष्ट्या ’वेद’ हा शब्द ’विद्‍” ह्यापासून उत्पन्न झालाय, ह्याचा अर्थ जाणणे. ज्ञान आणि विचार ह्या सुसंबद्ध गोष्टी आहेत. विचारातून नवज्ञानाची आणि ज्ञानातून विचारांची उत्पत्ती होत असते. मनुष्याच्या अत्यंत जटिल अशा मानस अरण्यातला घनदाट, भव्य आणि विराट वृक्ष म्हणजे भारतीय संस्कृती, ज्याची मुळं प्रत्येक भरतीय मन-मानसात रुजलेली आहेत. हा वृक्ष वर्धमान आहे, वृद्धिंगत होणारा आहे. हा मनावर लादलेला नसून वैचारिक क्रांतीकारक ऋषींच्या माध्यमातून पुढे आला आहे. आपणही ह्या वृक्षाचे आश्रित आहोत, मग ते आपण मान्य करो अथवा न करो. ह्या वृक्षाची मूळ शाखा म्हणजे वेद. सर्व धर्मांचे मूळ असलेले वेद अपौरुषेय आहेत कारण ते कोण्या एका व्यक्तीने निर्माण केलेले नाहीत. मानवी इतिहासात प्रथम निर्माण झालेलं साहित्य म्हणजे ऋग्‍वेद. आजपासून सुमारे चार ते साडेचार हजार वर्षांपूर्वी तो निर्माण झाला. त्यानंतर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ह्या तीन वेदांची निर्मिती झाली. प्रत्येक वेदाचे चार मुख्य भाग आहेत ते म्हणजे संहिता, ब्राह्मणक, अरण्यक आणि उपनिषद ऋग्‍वेदातल्या मंत्रांना ऋचा म्हटलं जातं. ह्या ऋचा आर्ष संस्कृत मध्ये असल्याने त्यांचा अन्वय वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतो आणि अर्थांचा हा प्रत्येक कंगोरा अर्थकर्त्याच्या दृष्टीने योग्यच असतो, फक्त माझाच अर्थ अचूक आहे असं विधान कोणी करू शकत नाही. वेदांनी मनुष्याला दिलेला प्रमुख विचार म्हणजे ब्रह्मविचार. ऋग्‍वेदातल्या नासदीय सूक्ताची बेचाळीस भाषांमध्ये भाषांतरं झाली आहेत. मानवी संस्कृतीला आधारभूत असलेलं हे प्रचंड विचारधन आपल्यासाठी आजही खुलं आहे. त्यातले निवडक ५१ मंत्र आज आपण निवडले आहेत. समाजाच्या हिताचे, विचारगर्भ आणि चिंतनाला पूरक मंत्र आपण निवडले आहेत. ह्या सर्वांचा अर्थासहित अभ्यास आपण करणार आहोत”. ह्यानंतर मानसपूजा संपन्न झाली आणि त्यानंतर परशुराम जयंती निमित्त परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजी ह्यांनी जे विवेचन घेतलं होतं, त्याच पुनःप्रसारण करण्य़ात आलं. त्या विवेचनाचा सारांश असा,

“ वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया हा दिवस हिंदू पंचांगाप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस म्हणजे महाविष्णुंचा सहावा अवतार असणार्‍या भगवान परशुरामांचा जन्मदिवस. महाविष्णुंच्या दशावतारांपैकी ऋषी-कुलात जन्माला आलेला हा एकच अवतार. सुमारे पंचवीस हजार वर्षांपूर्वी हा महावतार होऊन गेला. महादेवांनी त्यांना आपलं तेज दिलं. भगवान परशुराम हे सर्वोत्तम क्षात्रतेजाने संपन्न असलेले क्षत्रीय, खरोखरचं ब्रह्म जाणणारे ब्राह्मण, सर्वोत्तम दानशूर, उत्तम राजनीतीज्ञ, उत्तम तापसी, उत्तम मंत्रद्र्ष्टा ऋषी, उत्तम समाजधुरीण आणि उत्तम भक्त होते. श्रीदत्तात्रेयांच्या सर्वोत्तम नऊ भक्तांपैकी एक असणार्‍या भगवान परशुरामांची गणना सप्तचिरंजीवांमध्ये होते. रामायण महाभारत काळातही त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केल्याचा उल्लेख आहे.
अशा ह्या श्रेष्ठ आणि आदर्शवत महापुरुषाचा आशीर्वाद आजच्या विषमतेनी ग्रस्त आणि धर्मकार्याचा लोप झालेल्या समाजाला मिळणं अतिशय गरजेचं आहे. अग्नी विद्या प्रथमतः प्रचलित करणार्‍या भृगू ऋषींच्या कुळातले परशुराम हे सहाव्या पिढीतले वंशज. वर्णव्यवस्था ही जन्मावर नाही तर कर्मावर अवलंबून आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिले.अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. उत्तम पुरुषार्थ सिद्ध करणारी त्यांची तीन प्रमुख कार्य म्हणजे दैत्यांचा निःपात, नर्मदा क्षेत्राला पावित्र्याची पुनर्प्राप्ती करून देणे आणि उन्मत्त क्षत्रियांचा संहार करुन धर्म संस्थापना करणे. शस्त्राची शास्त्रावर होणारी कुरघोडी नाहिशी करण्यासाठी त्यांनी स्वतः शस्त्र धारण केलं. त्यांना क्षत्रियांचं नव्हे तर अधर्माचं वावडं होतं. खरोखरचा धार्मिक, प्रजाहितदक्ष, कल्याणकारी असा प्रभू रामचंद्रांसारखा राजा जेव्हा त्यांना आढळला तेव्हा त्यांनी स्वतःचं सगळं सामर्थ्य त्याला देऊन टाकलं. जिंकलेली सर्व भूमी त्यांनी कश्यप ऋषींना दान देऊन टाकली आणि त्यानंतर अपरान्त भूमी म्हणजेच कोकण प्रदेशाची निर्मिती केली. तिथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या. समाजाला उपयोगी पडणार्‍या कृषीसह सर्व कौशल्यांचा विकास त्यांनी केला. तिथे त्यांना जे अनुयायी लाभले त्यांना वेद शिकवले. त्यांनी समुद्रासमोर उभं राहून आत्मसंशोधन केलं आणि त्याला त्यांनी सामुद्रोपनिषद असं नाव दिलं. यात त्यांनी दोन तात्पर्य मांडली. एक म्हणजे मनुष्याने मर्यादा कधी ओलांडू नये कारण मर्यादेमुळे बळ आणि शक्ती हे दोन्ही टिकून राहतं. दुसरं म्हणजे मनुष्याने निष्ठेने प्रयत्न करावा आणि अनुभवातून शिक्षण घ्यावं. काळ आणि काम हे दोन्ही ज्यांचे दास होते त्या विष्णुस्वरूप परशुरामांना नमन करून श्री सद्‍गुरुंनी विवेचनाची सांगता केली.
दुपारच्या सत्रात अघोरकष्टोद्धरण स्तोत्र- प्रचार आणि प्रसार कार्यक्रमाचा आढावा घेणारं संगणकीय सादरीकरण झालं. तसंच जन्मपूर्व संस्कार, जन्मोत्तर संस्कार, वैद्यकीय समुपदेशन हे उपक्रमही संपन्न झाले. पूर्णाहुतीने आणि सद्‍गुरुपादुकांच्या दर्शनाने यज्ञ सोहळ्याची सांगता करण्यात आली.

रामरक्षा यज्ञ-यज्ञ क्र.३५१(शुक्रवार,दिनांक १५ एप्रिल २०१६)-
परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी प्रेरित तीनशे एकावन्नाव्या संकल्पयज्ञाची पूर्तता “रामनवमी” निमित्ताने गायत्री गार्डन ह्या यज्ञ स्थळी झाली. समतामय ब्रह्मशक्तीरूपी सौर ऊर्जा गायत्री मंत्र पठणासह अग्नीरूपाने यज्ञात प्रस्थापित करण्यात आली. आवाहन मंत्राच्या पठणानंतर उपस्थित यज्ञकर्मींनी प्रथमतः श्रद्धासूक्त आणि त्यानंतर रामरक्षेच्या एकत्रित हवन पठणास सुरुवात केली. प्रथम सत्रात श्रीसद्गुरु विवेचन आणि त्यानंतर श्रीमद्‍ आद्य शंकराचार्य प्रणित श्लोकांच्या आधारे प्रभू रामचंद्रांची मानसपूजा उपस्थितांनी साधली. यापूर्वी दिनांक ३ एप्रिल २००९ रोजी प्रथमतः घेतलेल्या ह्या विवेचनाचा सारांश असा,

“चैत्रातल्या शुद्ध नवमीला प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. रम् म्हणजे रमणे आणो अयन म्हणजे गती. जिथे रमल्यावर अशी गती निर्माण होते की तिथून परतण्याची शक्यताच राहत नाही ते रमण्याचे रमणीय स्थान म्हणजे रामायण. जो रामायणातल्या भक्तीमध्ये आणि ज्ञानामध्ये रमतो व स्वतःचे कर्म सुधारतो तो रामायण खर्‍या अर्थाने जगतो आणि अंतिमतः स्वतःच रामचंद्र बनतो. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित वेदांतपर रामायण स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी अहंकाररूपी रावणावर जय मिळवून सीतारूपी वृत्ती सोडवून आणली. प्रभू रामचंद्र म्हणजे एकवचनी, एकबाणी, आदर्श बंधू, आदर्श मित्र, आदर्श पती, आदर्श राजा, आदर्श नेता, आदर्श योद्धा आणि आदर्श शत्रूचं प्रतीक होय. रावणाच्या अंतःक्रियेचा विधी त्यांनी स्वतः केला आणि त्याद्वारे ते शत्रुत्त्व सुद्धा संपवून टाकलं. प्रभू रामचंद्रांना पूज्यत्त्व देऊन आणि स्वतःकडे शून्यत्त्व घेऊन त्यांच्यावर एकाग्रता आपल्याला साधता आली पाहिजे. ज्याप्रमाणात आपण एकाग्रता, सातत्य आणि तन्मयता दाखवाल त्याप्रमाणात आपणास यश मिळेल. संकल्पाचे धनुष्य पेलणारा तो कोदंडधारी श्रीराम. त्या रामावर आपल्याला यज्ञसाक्षीने एकाग्रता करायची आहे. त्यासाठी मनाला एकत्र करून लक्ष्य साधणार्‍या लक्षमणाचे बंधुत्त्व आपल्याला मिळवायचे आहे. भगवान श्रीमद्‍ आद्य शंकराचार्य विरचित श्रीराम- मानसपूजा अतिशय उत्कृष्ट आहे. पूर्ण शांत होऊन, आपल्या देहाच्या सर्व अडचणी बाजूला ठेवून मानसपूजेतले सोळा उपचार आपल्याला करायचे आहेत आणि त्या सुंदर, रमणीय, स्मित-हास्य धारण केलेल्या रामचंद्ररूपी वैश्विक शक्तीशी समगती साधायची आहे”.
विवेचनानंतर श्रीसद्गुरुंनी मानसपूजेचे उपचार करवून घेतले आणि त्यानंतर “ श्रीराम जय राम जय जय राम”, ह्या त्रयोदशाक्षरी महामंत्राचा जपही करवून घेतला.
दुपारच्या सत्रात केंद्रामार्फत चालवल्या जाणार्‍या वेगवेगळ्या उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. ह्या मध्ये प्रामुख्याने डॉ. संतोष सायणेकर ह्यांनी वैद्यकीय समुपदेशन ह्या उपक्रमाच्या वर्षपूर्ती निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. पूर्णाहुती नंतर साक्षात प्रभू रामचंद्रांसारखे जीवन आचरणार्‍या परमपूज्य श्री सद्गुरुंच्या पादुकांचे सर्व उपस्थितांनी मनोभावे दर्शन घेतले.

श्रीगणेश यज्ञ-यज्ञ क्र.३५०(रविवार,दिनांक १० एप्रिल २०१६)-
दिनांक १० एप्रिल २०१६ रोजी महिन्याच्या दुसर्‍या रविवारी संकल्पित “श्रीगणेश यज्ञ” गायत्री गार्डन, बदलापूर (पूर्व) इथे संपन्न झाला. परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी ह्यांच्या प्रेरणेने दर महिन्याच्या दुसर्‍या रविवारी यज्ञाचे आयोजन होत असते.
परमपूज्य सद्गुरुंच्या आशीर्वादाने समतारूपी सूर्याची ऊर्जा घेऊन गायत्री मंत्राच्या जयघोषात यज्ञाचे प्रज्वलन यजमानांनी केले. आवाहनीय मंत्रपठण झाल्यानंतर ॐकाररूपी नादमय मूळ शक्ती अर्थात श्रीगणेश शक्तीला प्रथमतः श्रद्धासूक्त आणि त्यानंतर ब्रह्मणस्पती सूक्ताने हविर्भाग अर्पण करण्यात आला. त्यानंतर अथर्वशीर्षाच्या सामूहिक पठण आणि हवनाला सुरुवात झाली. श्री गणेश मानस पूजेनंतर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या “ध्यानातून ध्येयाकडे” ह्या पुस्तकाचं डॉ. श्री भारवि खरे, संपादक संतकृपा ह्यांनी केलेलं परीक्षण सर्व उपस्थितांना वाचून दाखवण्यात आलं. त्यानंतर दिनांक ११ जानेवारी २००४ रोजी श्री सद्गु्रुंनी घेतलेल्या “गणेश विज्ञान” ह्या विवेचनाची ध्वनीफीत सर्वांनी श्रवण केली. ह्या विवेचनाचा सारांश असा,

ज्याला ’ॐ नमोजी आद्या” म्हटलं आहे किंवा “ मूलारंभ आरंभ तो निर्गुणांचा” असं म्हटलं आहे ती गणॆश शक्ती म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेली मूळ शक्ती. त्या शक्तीला आपण आज प्रचलित असलेलं साकार रूप दिलं म्हणजेच गणेश प्रतिमा निर्माण केली. आजही विविध गणेश प्रतिमा निरनिराळ्या देशांमध्ये आढळतात. योगशास्त्राप्रमाणे मूलाधार चक्रामध्ये ह्या शक्तीचा निवास आहे आणि त्याला रक्तवर्ण दिला आहे. ह्या मूलाधार चक्रावर विजय मिळवण्यासाठी कोणत्याही साधनेची सुरुवात ही गणेश उपासनेने केली जाते. अनेक प्राचीन सूक्तांमध्ये ह्या मूळ शक्तीचा उल्लेख आहे. ह्यामध्ये रुद्र सूक्त, ब्रह्मणस्पती सूक्त आदिचा समावेश आहे. गणेश प्रतिमेमागे निश्चित असे विज्ञान आहे. विज्ञानानुसार ज्या प्राण्यामध्ये मेंदुच्या वजनाचे शरीराच्या वजनाशी असलेले प्रमाण सगळ्यात मोठे असते तो प्राणी बुद्धिमान समजला जातो. त्यामुळे माणसाच्या खालोखाल हत्ती आणि डॉल्फिन मासा बुद्धिमान समजला जातो. परंतु गणेश प्रतिमेमध्ये मात्र डोकं हत्तीचं आणि शरीर माणसाचं असल्यामुळे हे प्रमाण सर्वोच्च आहे. अर्थातच ही प्रतिमा बुद्धिची देवता म्हणून अतिशय योग्य आहे. उत्तम बुद्धिच्या प्राप्तीसाठी ह्या प्रतिमेवर केलेली एकाग्रता उपयुक्त ठरते. ॐकारामध्ये तीन मात्रा आणि एक अर्ध मात्रा आहे. ह्या तीन मात्रा म्हणजे विश्वात भरून उरलेल्या लघू, मध्यम आणि दीर्घ कंपनसंख्येच्या लहरींचं प्रतीक आहे, त्यापलीकडची शून्य अवस्था म्हणजे अर्ध मात्रा अर्थात बिंदु. ह्या तीन लहरी म्हणजेच विश्वाची उत्पत्ती ज्यातून होते ते सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुणांचं प्रतीक आहे. ह्या त्रिगुणात्मक शक्तीचं रूप म्हणजे ॐकाररूपी श्रीगणॆश. त्याच्या विश्वात्मक रूपाशी एकरूप होण्यासाठी संपूर्ण अहंकार-शून्यत्त्व आणि शरणागती साध्य झाली पाहिजे तर सहमती होईल. सहमती नंतर सहकार्य झालं तर अध्यात्मातल्या समसुखाची प्राप्ती होण्यास वेळ लागणार नाही. ह्या पायर्‍यानी प्रत्येकाला त्या मूळ शक्तीपर्यंत पोहोचता यावं म्हणून आज आपण त्या गणेश शक्तीला वंदन करुया.”
दुपारच्या सत्रात जन्मपूर्व संस्कार, जन्मोत्तर संस्कार आणि वैद्यकीय समुपदेशन हे कार्यक्रम संपन्न झाले. पूर्णाहुती आणि आशीर्वाद मंत्रांनी यज्ञाची सांगता झाली आणि सर्वांनी गुरुपादुकांचे दर्शन घेतले.

गायत्री यज्ञ-यज्ञ क्र.३४९(रविवार,दिनांक १३ मार्च २०१६)-
दिनांक १३ मार्च २०१६ रोजी म्हणजेच महिन्याच्या दुसर्‍या रविवारी संकल्पित यज्ञ अर्थात गायत्री यज्ञ, गायत्री गार्डन, बदलापूर(पूर्व) ह्या नियोजित स्थळी संपन्न झाला. गायत्री मंत्राच्या जयघोषामध्ये यज्ञ प्रज्वलन झाले आणि त्यानंतर प्रथमतः श्रद्धासूक्त आणि सौर सूक्ताचे पठण यज्ञसन्मुख घेतले गेले. त्यानंतर गायत्री मंत्राच्या सामूहिक पठणाला आणि हवनाला सुरुवात झाली.
“ सन्मान, संगतीकरण आणि दान” ह्या यज्ञाच्या त्रिसूत्रीला अनुसरून आजच्या यज्ञात प्रकाश ज्ञान शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट, बदलापूर, जनसेवा समिती कल्याण आणि वामनराव ओक रक्तपेढी ह्यांच्यातर्फे रक्तदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यागाचं प्रतीक असलेल्या यज्ञ साक्षीने एकुण ६५ बंधु आणि भगिनींनी रक्तदानात सहभाग घेतला.

सकाळच्या सत्रात श्री गायत्री मानसपूजेनंतर श्री सद्गुरुंच्या विवेचनाची ध्वनीफीत सर्वांनी श्रवण केली. ह्यात परमपूज्य श्री सद्गुरुंनी गायत्री मंत्राबद्दल विवरण केले होते. त्याचा सारांश असा,
‘मूळ गायत्री मंत्र ऋग्वेदात आढळतो, अथर्ववेदात त्याबद्दल विस्तृत विवरण आहे. गायत्री मंत्राचं जेव्हा विधिवत पठण केलं जातं तेव्हा प्रचंड शक्तीची निर्मिती होते. बृहदारण्यक उपनिषद, त्यानंतरच्या काळातलं रामायण, महाभारत ह्या सगळ्या प्राचीन वाङ्मयात गायत्री मंत्राचा उल्लेख आहे. रामायणातल्या प्रत्येक अध्यायाच्या पहिल्या मंत्राची सुरुवात गायत्री मंत्राच्या आद्याक्षराने होते. गीतेत “ छंदांमध्ये मी गायत्री छंद आहे” असे गौरवोद्गार कृष्णाने काढले आहेत. गायत्री मंत्रामध्ये जी चोवीस अक्षरं आहेत, ती प्रकृतीच्या चोवीस तत्त्वांना अनुसरून आहेत. त्यामुळे गायत्री पठणाने तुमच्यामध्ये ज्या तत्त्वाची कमतरता आहे त्याची पूर्ती व्हायला सुरुवात होते. गायत्री छंद म्हणजे म्हणणार्‍याच्या वाणीचं संरक्षण करणारा छंद आहे. ह्या मंत्राचा अर्थ असा की, “अखिल चराचराला प्रेरणा देणारी सविता शक्ती, त्याच्या अवर्णनीय तेजाचं ध्यान करणं हे आमचं कर्तव्य आहे. तो आमच्या ज्ञान भक्तीला आणि ध्यान भक्तीला; बुद्धीला प्रेरणा देवो”. एवढा श्रेष्ठ अर्थ असणार्‍या मंत्राचं ज्ञानपूर्वक पठण घडलं पाहिजे. साधनेला सुरुवात करताना अग्रक्रम गायत्री मंत्राला द्यावा लागतो. प्रत्येक चैतन्याला अधोगतीपासून दूर नेणारा असा हा मंत्र आहे. प्रचंड उष्णता, प्रचंड गती ह्यापासून प्राप्त होत असते. त्यासाठी एकत्रित पठण सर्वोत्तम आहे. एकत्रित पठणामुळे निर्माण झालेल्या ऊर्जेचं संनियंत्रण होऊन ती ऊर्जा बाधक होत नाही. “आमच्या बुद्धीला प्रेरणा मिळो”, ही मूळ प्रार्थना त्यात आहे आणि त्यामुळे गायत्री पठणाने ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे योग्य ती प्रेरणा ज्याला त्याला मिळत जाते. हे पठण जर यज्ञासमोर केलं तर तो दुग्ध-शर्करा योग ठरतो कारण यज्ञ म्हणजे सद्हेतूपूर्वक निर्माण केलेली गती. ह्या गतीसमोर केलेलं गायत्रीचं पठण आधिकाधिक उत्तम गती निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतं. हे सगळं कधी शक्य होईल? जर पूर्ण शरणागती असेल तर! ढोलकं आहे, ते वाजवणारे हात आहेत पण ऐकणारे कान मात्र नाहीत असं होऊ नये. ज्या ज्या सत्पुरुषाने त्याचा अभ्यास केला आहे त्याच्याकडून ती शक्ती आपल्याला घेता येते, पण त्यासाठी संकल्प मात्र आपल्यालाच करावा लागतो. संकल्पामुळे मनुष्याच्या लिंगदेहात आणि त्याच्या वृत्तीमध्ये बदल घडू शकतो. असा उत्तम बदल आपल्या सगळ्यांमध्ये घडण्यासाठी मुळात तसा संकल्प आपल्याकडून व्हावा अशी प्रार्थना आपण यज्ञसमक्ष करुया”.
दुपारच्या सत्रात जन्मपूर्व संस्कार, वैद्यकीय समुपदेशन आणि बालसंस्कार वर्ग ह्याबरोबरच यज्ञामध्ये सामूहिक मंत्रपठण आणि हवन सर्व साधकांनी सुरु ठेवलं. पूर्णाहुती नंतर श्री सद्गुरु-पादुकांच्या दर्शनाचा लाभ सर्व उपस्थितांनी घेतला.

रुद्र स्वाहाकार-यज्ञ क्र.३४८(सोमवार,दिनांक ७ मार्च २०१६)-
दिनांक ७ मार्च २०१६ रोजी, गायत्री गार्डन बदलापूर येथे महाशिवरात्री निमित्त रुद्र स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले होते. नित्याप्रमाणे पूज्य सौ. आईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ सोहळ्याची सुरुवात झाली. सौरशक्ती आणि गायत्री मंत्रांच्या साहाय्याने प्रकाश शक्तीचे आगमन यज्ञवेदीवरती झाले.यज्ञाच्या प्रथम सत्रात श्रद्धासूक्त आणि रुद्राध्यायाने ब्रह्मतत्त्वरूपी महादेवाला मंत्रांनी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर झालेल्या शिवमानसपूजेचा लाभ सर्व उपस्थित साधकांनी घेतला. सर्वव्यापक, सर्वशक्तिमय महादेवाशी एकरूप होण्याचा संकल्प सर्वांनी केला. मानसपूजेनंतर महत्त्वाच्या सूचना आणि आगामी कार्यक्रमांची माहिती सर्व साधकांना देऊन त्यानंतर एका भक्ताकडून परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजी ह्यांच्यावर अंतःस्फुर्तीने रचल्यागेलेल्याकाव्याचं वाचन करण्यात आलं. ते काव्य असं,

दिव्यत्त्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती
श्रीमुखावर हास्य निर्व्याज विलसत होते तुमच्या
वाणीतून स्रवत होता घोष तो वेदमंत्रांचा
सुकर्माच्या वेदीवरती यज्ञ सोहळा तो विज्ञानाचा
देण्यासाठीच आलात तुम्ही परि इष्ट ते नच मागे कोणी
वर्तले ते आधी मग सांगितले इतरांस
वाणी आणि लेखणीतून केला जनोद्धार
मननातून त्राण द्याया मंत्रशक्तीचा आधार
नर्मदे हरऽहर घोष राहिला अजरामर
बाकी सारे विसरून ’नमो गुरवे वासुदेवाय’ चा चाले गजर
पट हा नियतीने का विणला हो अधुरा?
टकटक त्या कालपुरुषाची ऐकू येते का सर्वांना?
गुरुतत्त्वाशी जो लीन त्याचेच भाग्य थोर
रुतू नका माया मोहात, हा तुमचा संदेश
जिवंत चालते बोलते अध्यात्म, झाले चिरंतन, झाले चिरंतन, झाले चिरंतन
..... एक अनामिक भक्त
ह्या काव्याचं वैशिष्ट्य असं की ह्यातल्या प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर जर घेतले, तर त्यातून नाम तयार होतं “ श्री वासुदेव वामन बापट गुरुजी”!

ह्यानंतर परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजींनी दिनांक २७ फेब्रुवारी २०१४ रोजी “ रुद्रातील मधुसंकल्प” ह्या विषयावर केलेल्या पूर्वध्वनिमुद्रितविवेचनाचे श्रवण सगळ्यांनी केले. त्याचा सारांश असा,
“ वेदातलं रुद्रसूक्त हे प्रामुख्याने यज्ञीय सूक्त म्हणून प्रसिद्ध आहे. वैश्विक शक्तीला उद्देशून त्याची रचना झाली आहे. रुद्र दोन विभागात विभागला गेला आहे; नमक आणि चमक. नमक किंवा नमन विभागात विश्वातल्या महानातल्या महान आणि क्षुल्लकातल्या क्षुल्लक गोष्टीला नमस्कार केला आहे. भांडण-मित्रत्त्व, आरोग्य-अनारोग्य, शांती-अशांती, सुख-दु:ख अशी सर्व द्वंद्व विश्वात आवश्यक आहेत कारण जीवन जर निर्द्वंद्व झालं तर त्यातला आनंद निघून जाईल. त्यामुळे रुद्रामध्ये जे जे मनुष्याला स्वीकारार्ह वाटतं, त्याला नमस्कार तर केला आहेच शिवाय जे जे त्याज्य वाटतं त्यालाही नमस्कार केला आहे. कारण आपल्याला जे त्याज्य वाटतं ते कदाचित प्रकृतीतल्या दुसर्याय कोणत्यातरी जिवासाठी आवश्यक असू शकेल. चमक विभागात विश्वकल्याण, समष्टीकल्याण आणि व्यक्तिकल्याणाच्या मागण्या त्या वैश्विक शक्तीकडे मागितल्या आहेत. ह्या मुख्यतः शब्दात्मक आणि संख्यात्मक मागण्या आहेत. ह्यातल्या संख्यात्मक मागण्यांनाविशिष्टगूढार्थ आहे, संकेतार्थ आहे. ह्या संख्या बहुतांशी विषम आहेत. चमकातल्या अकराव्या अनुवाकात आलेल्या संख्यांपैकी एक म्हणजे ब्रह्मतत्त्वाची मागणी, तीन म्हणजे त्रिगुणाची मागणी, पाच म्हणजे पंचतन्मात्रा,सात म्हणजे पंचमहाभूतं आणि मन-बुद्धि असं करत करत शेवटी आठ वसू, अकरा रुद्र, बारा आदित्य, अश्विनीकुमार आणि प्रजापती अशा एकूण तेहतीस देवतांच्या मागणीने ह्या मागण्यांच्या शृंखलेचा शेवट केला आहे.
रुद्रातला शांतीमंत्र एकदा सुरुवातीला आणि एकदा शेवटी असा दोनदा येतो. ह्यात मुख्यत्त्वे पृथ्वी देवता, अंतरिक्ष देवता आणि दिवि देवता ह्या देवतांचे आशीर्वाद मागितले आहेत. ह्यातली प्रमुख प्रार्थना म्हणजे, “ देवांनी, पृथ्वीने आमची हिंसा होणार नाही, आमचा नाश होणार नाही हे पाहावे”, अशी मागणी आहे. ही प्रार्थना करण्याची पत निर्माण व्हावी म्हणून काही संकल्प करण्याचे अभिवचनही दिले आहे. ह्या संकल्पालाच ’मधुसंकल्प’ म्हटले आहे. मधू म्हणजे मंगलमय, कल्याणमय. ‘मधुमनिष्ये’ म्हणजे आमच्या मनात कोणत्याही प्रकारची कटूता शिल्लक राहणार नाही हा संकल्प. ‘मधुजनिष्ये’ म्हणजे उत्तमाची निर्मिती करण्याचा संकल्प. ‘मधुवक्ष्यामि’ म्हणजे उत्तम कार्याचा भारवाह होण्याचा संकल्प. तर ‘मधुवदिष्यामि’ म्हणजे उत्तम कल्याणकारी वाणीचा संकल्प आहे. थोडक्यात ‘मी स्वतः तर कल्याणकारी, मंगलमय बोलेनच, पण इतरांच्याही मुखातून ‘मधू’ वदवून घेईन, आणि मग अशी माझी मती उत्तम संस्कारयुक्त झाल्यानंतर ’मधुमतीं देवेभ्यो वाचमुद्यासं’, अर्थात ईश्वरालाही आवडणारी वाणीच माझ्या मुखातून बाहेर पडेल’, हा संकल्प आपोआप घडतो. मधुसंकल्पाच्या ह्या पाच अटी जर पाळता आल्या तर मनुष्यलोकामध्ये आपली कीर्ती नक्कीच वृद्धिंगत होईल शिवाय आपल्या पितरांनाही आपला अभिमान वाटेल.
सारांशाने, रुद्रातला हा मधुसंकल्प मधमाशीसारखे ‘मधुग्राही’ होण्याचा संदेश देतो. मधमाशी फुलातला मध इतक्या खुबीने गोळा करते की त्यामुळे फुलांच्या सौंदर्याला किंवा त्यातल्या सुगंधाला जराही धक्का पोहचत नाही. शिवाय ती स्वतःही त्या फुलातल्या बाह्य सौंदर्यात लिप्त होत नाही, ती त्यातलं फक्त सार स्वीकारते. तसंच रुद्रोपासकाने भौतिक सृष्टीत लिप्त न होता रुद्राचं उत्तमोत्तम मनन करून आपलं भविष्य ब्रह्मतत्त्वापर्यंत कसं नेता येईल ह्याचाच विचार केला पाहिजे. रुद्राला दुर्वास ऋषींसारख्या अनेक श्रेष्ठ ऋषींचे वरदान आहे, ते फोल जाणार नाही ह्याची शाश्वती बाळगावी.”
दुपारच्या सत्रात रुद्रपठण व हवन सुरु ठेवण्यात आले. शेवटी आशीर्वाद मंत्रांनी पूर्णाहुतीची सांगता झाली. श्रीसद्‍गुरुंच्या पादुका दर्शनाचा लाभ सर्व उपस्थितांनी घेतला.

श्रीनर्मदा लहरी स्वाहाकार -यज्ञ क्र.३४७ (रविवार,दिनांक १४ फेब्रुवारी २०१६)-
दिनांक १४ फेब्रुवारी २०१६ रोजी गायत्री गार्डन, बदलापूर(पूर्व) ह्या स्थळी दरमहा यज्ञाच्या संकल्पानुसार यज्ञ संपन्न झाला. ह्याच दिवशी असणार्‍या नर्मदा जयंतीचे औचित्य साधून नर्मदा लहरी स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले होते. नित्याप्रमाणे पूज्य आईंच्या उपस्थितीत आणि गायत्री मंत्राच्या जयघोषात यज्ञ प्रज्वलन संपन्न झाले. सर्वप्रथम श्रद्धासूक्ताचे पठण झाल्यानंतर श्रीनर्मदेवर आधारित विविध स्तोत्रांचे यज्ञसाक्षीने सामूहिक पठण तथा हवनाच्या सत्राला प्रारंभ झाला.
कुमारी पूजनानंतर तसेच श्रीनर्मदेच्या मानसपूजेनंतर सकाळच्या सत्रामध्ये परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या निवडक स्तोत्रांचे संकलन असलेल्या ’स्तोत्रसुधा’ ह्या ग्रंथाचे प्रकाशन पूज्य आईंच्या शुभहस्ते करण्यात आले. स्वामी महाराजांच्या स्तोत्रांतले ज्ञान-विज्ञान सामान्य साधकाला समजावे, ह्या हेतूने परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींनी काही निवडक स्तोत्रांची संथा भक्तांना देऊन त्यावर विवरणे केली होती. सर्वांना ही स्तोत्रे यज्ञसन्मुख पठण करण्याकरता उपलब्ध असावीत, ह्या हेतूने हे पुस्तक यज्ञेश्वर प्रकाशनातर्फे आजच्या शुभदिनी प्रकाशित करण्यात आले.

परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी परब्रह्म तत्त्वात विलीन होऊन आजच्या दिवशी नव्वद दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. ह्या नव्वद दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या असीम कृपेच्या आधारे आणि पूज्य आईंच्या मार्गदर्शनाखाली सर्व संकल्प यथोचितपणे आणि एकत्रितपणे पार पाडता आले. ह्यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे पंचवीस कोटी ’नमो गुरवे वासुदेवाय” च्या संकल्पाची पूर्ती झाली. दरमहा यज्ञाचा संकल्पही श्री सद्गुरुंनी आखून दिलेल्या शिस्तीनुसार संपन्न होतो आहे. ह्याच काळात “ध्यानातून ध्येयाकडे” आणि आज प्रसिद्ध झालेला “स्तोत्रसुधा”असे दोन ग्रंथ प्रसिद्ध झाले. ह्या पार्श्वभूमीवर सर्व भक्तांनी एकत्रितरीत्या आणखी एक संकल्प यज्ञसाक्षीने केला. तो संकल्प म्हणजे, "“नमो गुरवे वासुदेवाय” ह्या सिद्ध मंत्राचा ११ कोटी नामजप, ११ लक्ष लिखित नामजप आणि ११ साधकांच्या घरी नामस्मरणाचा” संकल्प. हा संकल्प श्री सद्गुरुंच्या पहिल्या पुण्यतिथीअगोदर पूर्ण करण्याचा मानसही भक्तांनी जाहीर केला. हा संकल्प सद्गु्रुशक्तीच सर्व भक्तांकडून पूर्ण करवून घेईल ह्या विश्वासाने सर्व उपस्थित साधकांनी यज्ञेश्वर नारायणाच्या साक्षीने सद्गु्रु तत्त्वाला पुन्हा एकदा वंदन केले आणि त्यानंतर सद्गुरु- विवेचनाची ध्वनीफीत उपस्थितांच्या श्रवणार्थ लावण्यात आली. “ श्री स्वामी महाराज विरचित श्रीनर्मदा लहरी” ह्या शीर्षकाचे विवेचन परमपूज्य सद्गुरुंनी दिनांक २९ नोव्हेंबर २०११ रोजी सामूहिक नर्मदा परिक्रमेदरम्यान भेडाघाट ह्या स्थळी संपन्न केले होते. ह्या विवेचनाचा सारांश असा,
“स्वामी महाराजांना भक्ताच्या रोगाचा परिहार करताना स्वतःलाच जेव्हा शरीर पीडा उद्भवली तेव्हा श्रीदेवांनी त्यांना आदेश दिला की श्रीनर्मदेच्या किनारी जाऊन तीन दिवस तपाचरण करा. त्या आज्ञेला अनुसरून जेव्हा स्वामी महाराजांनी नर्मदाकिनारी तपाचरण केलं तेव्हा नर्मदा मातेचं स्तवन करण्यासाठी त्यांनी जी रचना केली ती म्हणजे “ नर्मदालहरी” काव्य. ह्यात स्वामी महाराजांनी नर्मदा मय्येचं आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक रूप रेखाटलेलं आहे. त्यात त्यांनी मय्येची स्तुती करण्यासाठी योजलेला प्रत्येक शब्द अत्यंत अर्थपूर्ण असा आहे. अत्यंत एकाग्र अवस्थेत रचलेल्या ह्या काव्यात प्रचंड सामर्थ्य भरलेलं आहे.” प्रस्तुत विवेचनात नर्मदा लहरीसारख्या दिव्य स्तोत्रातून निर्माण होणारी शक्तिकंपनं मनुष्याच्या देहावर आणि मनावर कसे कसे परिणाम घडवून आणू शकतात ह्याचा वैज्ञानिक दृष्टीने श्री सद्गुंरुंनी आढावा घेतला. परिक्रमा करत असताना नर्मदा मातेकडून जी शक्ती मिळणार आहे ते सामर्थ्य आपण फुकट घालवणार नाही हे आश्वासन तिला देऊन श्रीसद्गुनरुंनी सर्व भक्तांकडून नर्मदा मातेला उद्देशून भावपूर्ण प्रार्थना करवून घेतली आणि विवेचनाचा समारोप केला. ( मूळ विवेचन श्रीनर्मदा परिक्रमा : एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा” ह्या ग्रंथामध्ये वाचनासाठी उपलब्ध आहे.)
दुपारच्या सत्रात नित्याप्रमाणे जन्मपूर्व संस्कार, जन्मोत्तर संस्कार आणि वैद्यकीय समुपदेशन असे कार्यक्रम संपन्न झाले. सर्व साधकांनी स्तोत्र-मंत्राचे सामूहिक पठण-हवन यज्ञसाक्षीने सुरु ठेवले. पूर्णाहुती आणि आशीर्वाद मंत्रांनंतर श्रीसद्गुरुंच्या पादुका दर्शनाचा लाभ सर्व उपस्थितांनी घेतला.

श्री यज्ञ -यज्ञ क्र.३४६ (रविवार,दिनांक १० जानेवारी २०१६)-
परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या प्रेरणेने नित्याप्रमाणे दर महिन्याच्या दुसर्‍या रविवारी बदलापूर येथे ‘श्री’यज्ञाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सकाळी ठीक ९.३० वाजता श्रीगायत्री मंत्राच्या जयघोषात यजमानांनी यज्ञ प्रज्वलन केले. त्यानंतर वैश्विक शक्तीच्या विविध रूपांना यज्ञात उपस्थित राहण्य़ासाठी आमंत्रित करण्यात आले. सर्वप्रथम श्रद्धासूक्त, पुरुषसूक्त, विष्णू सूक्त, श्रीसूक्ताचे हवन आणि पठण झाले.
सकाळच्या सत्राची सुरुवात एका अत्यंत उत्साहवर्धक समारंभाने झाली. परमपूज्य सद्गु्रु श्री बापट गुरुजींनी सन २००९ मध्ये श्रीक्षेत्र पुष्कर येथे ’ध्यान’ ह्या विषयावर सलग १० विवेचने केली होती. ह्या विवेचनांना ग्रंथबद्ध करून प्रकाशित करण्यासाठी आजच्या यज्ञाचा शुभमुहूर्त लाभला आणि पूज्य आईंच्या शुभहस्ते ग्रंथाचे विमोचन यज्ञसाधकांसमोर घडले. ग्रंथाचे शीर्षक आहे ’ध्यानातून ध्येयाकडे” आणि हा ग्रंथ श्री केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. ग्रंथ विमोचनाप्रसंगी केंद्राचे विश्वस्त श्री आदित्य वासुदेव बापट म्हणाले, “ध्यान हा श्री गुरुजींचा चिंतनाचा, ध्यासाचा आणि निदिध्यासाचा विषय होता. ध्यान ह्या विषयाला फार मोठी आध्यात्मिक बैठक आहे. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या ऋग्वेदात गृत्समद ऋषींनी रचलेल्या ऋचेमध्ये असं म्हटलं आहे की, माझ्या ध्यानाचा तंतु कधीही तुटू देऊ नकोस. उपनिषत्काळ तर ध्यानाभोवतीच गुंफलेला आहे. बाजारात आज अनेक ध्यानग्रंथ उपलब्ध आहेत. पण तरीही श्रीगुरुजींना हा ग्रंथ स्वतंत्रपणे का रचावासा वाटला? ह्याचं कारण ‘ध्यान’ हा विषय काहीसा किचकट आणि बराचसा गुंतागुंतीचा आहे. परंतू श्री गुरुजींनी ह्यावर अतिशय सुबोध असे विवरण उदाहरणांसहित केले आहे, ज्यामुळे नवागतालाही बोध होऊ शकतो. ह्या ध्यानातून नेमके कुठे जायचे आहे? अंतिम गंतव्य स्थान काय आहे? त्याचाही उलगडा इथे केला आहे. गीताईत वर्णन केलेल्या ’पावता न चळे पुन्हा” ह्या ब्राह्मिस्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी ध्यानाच्या अनेक पद्धती, फायदे, अडचणी आणि प्रार्थनांचा समावेश ह्यात आहे. हा संवादात्मक ग्रंथ आहे, जणू कोणीतरी समोर बसून आपल्याला समजावत आहे अशी अनुभूती ह्यातून मिळते. हा नुसत्या वाचनाचा नव्हे तर अनुभवण्याचा, अभ्यासण्याचा ग्रंथ आहे. असा अनुभव प्रत्येकाला येवो ह्यासाठी सर्वांना खूप शुभेच्छा!”

ह्यानंतर गायत्री स्वरूपातल्या शक्तीची मानसपूजा सर्वांनी श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली केली. त्यानंतर दिनांक १० नोव्हेंबर २००४ रोजी श्री सद्गुरुंनी घेतलेल्या ’सुखाचा शोध’ ह्या विवेचनाचे ध्वनीमुद्रण सर्वांनी ऐकले. ह्या विवेचनाचा सारांश असा,
“सुखाची कल्पना किंवा आसक्ती सतत बदलत असते आणि मनुष्य सतत सुखाचा पाठलाग करत असतो. आपली संस्कृती ह्या बाबतीत अत्यंत श्रीमंत आहे. इथे प्राचीन काळापासूनच भौतिक सुखाच्या साधनांबरोबरच चिरंतन, शाश्वत सुखाच्या साधनांचाही शोध घेतला गेला आहे. आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन आपल्याला मानवी जीवनातल्या सुख-दु:खाच्या सततच्या चक्राचे विश्लेषण करता येते. क्रियेला प्रतिक्रिया, ह्या नियमानुसार मनुष्य जेवढा सुखाचा पाठलाग करतो तेवढ्याच दु:खाच्या संधी निर्माण होत असतात. परंतु इथे सूक्ष्म असा मनाचा स्तर असल्याने क्रियेला प्रतिक्रिया येण्यापूर्वी कालांतर जाते. त्यामुळे सत्कर्माची आणि दुष्कर्माची अशी दोन्हीची प्रतिक्रिया लगेच येत नाही. सुखाच्या पाठलागासाठी आपण फार मोठा शक्तिव्यय करत असतो हे अनेक मेंदुशास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.वेदांनी अशी मागणी केली आहे की, आम्हाला सुख पाहिजे परंतु ते फक्त उपभोगण्यासाठी नको तर मोक्षावस्था गाठण्यासाठी पाहिजे. जीवनात ‘श्री’प्राप्तीसाठी श्रीसूक्ताद्वारे आपल्याला‘श्री’चं अधिष्ठान मिळवता येतं. हा मंत्र अतिशय प्रभावी आहे, तो तुम्ही अमूल्यतेने घेतलात तर त्याच पद्धतीची अमूल्यता तुम्हाला प्राप्त होईल. श्री सूक्तात अशी मागणी केली आहे की, तू आमच्याकडे कधीही न परतण्यासाठी अशी कायमची निवासाला ये, त्यासाठी मी दानाच्या आणि त्यागाच्या सर्व अटींचं पालन करेन”. ही श्रेष्ठ मागणी घेऊन आपणही श्री यज्ञामध्ये श्रीसूक्ताचं पठण केलं पाहिजे.”
भोजन प्रसादापूर्वी यजमानांनी अन्नपूर्णाष्टकम्‍ स्तोत्राने यज्ञात नैवेद्यार्पण केले. दुपारच्या सत्रात जन्मपूर्व संस्कार, जन्मोत्तर संस्कार आणि वैद्यकीय समुपदेशन ह्या उपक्रमांबरोबरच विविध स्तोत्रमंत्रांचे सामूहिक पठण तथा हवन सुरु राहिले. आशीर्वाद मंत्रांनी पूर्णाहुती संपन्न झाली. त्यानंतर उपस्थितांनी श्री सद्गुरुंचे दर्शन पादुका स्वरूपात घेतले.

 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी