यज्ञ कार्यक्रम वृत्त : सन २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त : सन २०१७
श्री महाविष्णु यज्ञ-यज्ञ क्र.३७३(दि.१२ नोव्हेंबर २०१७)
दिनांक १२ नोव्हेंबर २०१७ रोजी गायत्री गार्डन, बदलापूर(पूर्व) ह्या स्थळी महाविष्णू यज्ञ संपन्न झाला. परमपूज्य सद्गुरू श्री बापट गुरुजी ह्यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त हा यज्ञ त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केला होता. ह्या दिवशीचे वैशिष्ट्य म्हणजे पूज्य सद्गुरुंच्या द्वितीय स्मरणार्थ केलेला ११ कोटी “नमो गुरवे वासुदेवाय” ह्या सिद्ध मंत्राचा माळेवरचा जप, ११ लाख लिखित जप आणि ११ भक्तांच्या घरी नामस्मरण असा हा संकल्प ह्या दिवशी पूर्ण होऊन तो श्री सद्गुरूंना अर्पण झाला. ह्या संकल्पाच्या निमित्ताने घेतलेले नवविधा भक्ती सत्संगातले शेवटचे आत्मनिवेदनाचे पुष्पसुद्धा श्री सद्गुरू चरणी अर्पण करण्यात आले.

सकाळी यज्ञ प्रज्वलन आणि आवाहन मंत्र झाल्यांनंतर पुरुष सुक्त आणि विष्णू सहस्रनामाचे एकदा सामुहिक पठण हवन घेऊन त्यांनंतर ‘नमो गुरवे वासुदेवाय’, ह्या सिद्ध मंत्राच्या सामुहिक पठण हवनाला सुरुवात करण्यात आली. मानसपूजा झाल्यांनतर श्री सद्गुरूंचे महाविष्णू दैवत ह्या विषयावरचे ध्वनिमुद्रित विवेचन सर्वांच्या श्रवणार्थ ऐकवण्यात आले. ह्या विवेचनाचा सारांश असा आहे,
“पुरुष सूक्तातील विराट पुरुष हा समष्टी स्वरूप आहे. आपल्या पैकी प्रत्येकामध्ये हा विराट पुरुष आहे, पण दुर्दैवाने आपल्याला त्याची जाणीव नाही. हे परामात्त्व तत्त्व विश्वाधाराने व्यक्त झालेलं असतं. त्याचा आधार घेतला तर मनुष्य महाविष्णू जिथे निवासाला असतात त्या वैकुंठी निश्चित जाऊ शकतो. महाविष्णू ह्या विश्वपालक तत्त्वाला प्रतिमेचा आकार वेद व्यासांनी दिला कारण अव्यक्ताची उपासना करणं खरोखर कठीण आहे. ह्या दैवताची उपासना करण्यासाठी एकादशीचे व्रत सांगण्यात आले. दुर्दैवाने आज त्या व्रताचे स्वरूप केवळ साबुदाण्याची खिचडी खाण्यापर्यंत मर्यादित झाले आहे. उपवास म्हणजे आपल्या आराध्य दैवतासमवेत निवास करणे. त्या दैवताच्या चिरंतन स्वरूपाचे स्मरण, मनन व ध्यान करणे. ह्या दिवशी कमी आहार घेऊन सतत ईश्वराजवळ आपला मनाने निवास राहील असं आचरण करा. निर्जला एकादशीच्या दिवशी भौतिक तृष्णांचा त्याग करायला सांगितला आहे. ह्या दिवशी स्वतः विषयी बाळगलेल्या अहंकाराचा त्याग करता आला पाहिजे. उपासनेचे अवडम्बर न माजवता मूळ तत्त्वाशी समरसता साधता आली पाहिजे. महाविष्णू प्रतिमेमध्ये आणि त्यांनी धारण केलेल्या विविध आयुधांमध्ये पुष्कळ सांकेतिक अर्थ सामावला आहे. तो समजून घेतला पाहिजे. त्या प्रतिमेत दडलेल्या मूळ विष्णूतत्त्वाचा शोध घेणं हा आपला हेतू असला पाहिजे.”

दुपारच्या सत्रात वैद्यकीय समुपदेशन, जन्मपूर्व संस्कार, जन्मोत्तर संस्कार इत्यादि उपक्रम संपन्न झाले. तसेच काही साधकांनी द्वितीय वर्ष पुण्यस्मरणार्थ आपले मनोगत व्यक्त केले व कार्याचा आढावा घेतला.
यज्ञाची संपन्न्ता पूर्णाहुती आणि पादुका दर्शनाने झाली.

श्री गणेश यज्ञ-यज्ञ क्र.३७२(दि.८ ऑक्टोबर २०१७)
परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी ह्यांच्या प्रेरणेने दिनांक ८ ऑक्टोबर २०१७ रोजी दुसऱ्या रविवारी महिन्याचा संकल्पित यज्ञ संपन्न झाला. चतुर्थी असल्याने ह्या दिवशी श्रीगणेश यज्ञ घेण्यात आला. सकाळी ठीक ९.३० वाजता यजमानांच्या हस्ते यज्ञ प्रज्वलन झाले. त्यावेळी पूज्य आई उपस्थित होत्या. आवाहनीय मंत्र झाल्यांनतर श्रद्धासूक्त, ब्रह्मणस्पती सूक्ताचे पठण झाल्यांनतर श्रीगणेश अथर्वशीर्षाच्या सामुहिक आवर्तनांना सुरुवात झाली.

सकाळच्या सत्रात मानसपूजा आणि श्रीगणेश अध्यात्म व विज्ञान ह्यावर श्री सद्गुरुंचे पूर्वध्वनीमुद्रित विवेचन संपन्न झाले. सन २०१२ मध्ये ३०० भक्तांना घेऊन पूज्य सद्गुरुंनी चारधाम-पंचप्रयाग यात्रा आयोजित केली होती. त्यामध्ये श्रीकृष्ण चरित्र आणि भगवद्गीता ह्या विषयावर त्यांनी जी विवेचनं घेतली त्या संकलनाचा पहिला भाग "श्रीकृष्ण नावाचं सावळं सामर्थ्य” ह्या नावाने पूज्य आईंच्या शुभहस्ते प्रकाशित झाला. सकाळच्या सत्रात रक्तदान शिबीर सुद्धा संपन्न झाले. ठाणे येथील श्रीवामनराव ओक रक्तपेढीच्या सहकार्याने हा रक्तदानाचा कार्यक्रम प्रकाश ज्ञान शक्ती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आला होता. ह्या रक्तदानामध्ये एकूण ६२ साधकांना रक्तदान करता आले. ह्या प्रसंगी रक्तपेढीचे श्री सुरेंद्र बेलवलकर ह्यांचा यज्ञ साक्षीने पूज्य आईंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ‘रक्तदानाचे महत्त्व आणि ओक रक्तपेढीचे कार्य’, ह्याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले.
दुपारच्या सत्रात नित्याप्रमाणे जन्मपूर्व संस्कार, वैद्यकीय समुपदेशन, बालसंस्कार वर्ग हे उपक्रम यज्ञासोबत घेण्यात आले. श्रीगणेश अथर्वशीर्षाची आवर्तनं सुरु ठेवण्यात आली आणि सर्व उपस्थित साधकांनी त्यात सहभाग घेतला. पूर्णाहुती नंतर आशीर्वाद ग्रहण करून यज्ञाची सांगता सद्गुरु-पादुका दर्शनाने झाली.

पितृयज्ञ-यज्ञ क्र.३७१(दि.१० सप्टेंबर २०१७)
दिनांक १० सप्टेंबर २०१७ रोजी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी गायत्री गार्डन, बदलापूर या स्थळावर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या प्रेरणेने आणि पितृपंधरवड्याच्या निमित्ताने पितृ यज्ञाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९.३० वाजता पूज्य आईंच्या उपस्थितीत यजमानांनी यज्ञ प्रज्वलन केले. आवाहनीय मंत्र तसेच श्रद्धा सूक्त ह्यांचे पठण झाल्यानंतर गायत्री मंत्राच्या सामूहिक पठण आणि हवनाला प्रारंभ करण्यात आला.
सकाळच्या सत्रात श्री आदित्य बापट ह्यांनी ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रक्तदान उपक्रमाविषयी सविस्तर माहिती सांगितली आणि साधकांच्या शंकांचे समाधान केले.त्यानंतर “पितृयज्ञ” ह्या विषयावर आधारित श्री सद्गुरुंच्या विवेचनाची ध्वनिफीत उपस्थितांच्या श्रवणार्थ ऐकवण्यात आली. ह्या विवेचनाचा सारांश असा,

“भाद्रपद महिन्यातल्या पौर्णिमा ते अमावस्या अशा पंधरा दिवसांना पितृ पंधरवडा असे म्हटले जाते. हा काळ पितृगणाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा आणि त्यांना श्रद्धायुक्त अंतःकरणाने तर्पण म्हणजे तप अर्पण करण्याचा समजला जातो. ह्या देशात झालेल्या हजारो वर्षांच्या संशोधनाच्या आधारे असं म्हणता येईल की, पितृशक्ती ही मानवाच्या ऐहिक आणि पारमार्थिक कल्याणासाठी अतिशय महत्त्वाची असते. पण ही पितृशक्ती कशी अनुकूल करून घ्यायची ह्याचं ज्ञान समजून घेतलं पाहिजे. पूर्ण श्रद्धा आणि ज्ञान हे दोन्ही तिथे आवश्यक आहे. आपल्या प्राचीन तत्त्वज्ञानाप्रमाणे अग्निसाक्ष पाठवलेले संदेश निःसंशय पितरांना पोहोचतात. त्यामुळे यज्ञसाक्षीने केलेल्या पितृकर्तव्याला अधिक महत्त्व आहे. पितरांना तुमच्याकडून कृतज्ञता अपेक्षित असते. जन्मोजन्मी अनेक पिढ्यांपासून निर्माण झालेले ऋणानुबंध फेडायचे असतील तर यज्ञसाक्षीने केलेले तपार्पण अतिशय उपयुक्त ठरते. पितरांनी जरी पुनश्च जन्म घेतला, तरीदेखील त्यांना ह्या कृतज्ञतायुक्त कृतीचा उपयोग होतो, तशी योग्य प्रेरणा त्यांना त्या जन्मात मिळत राहते. कृतज्ञता म्हणजे ज्ञानपूर्वक केलेली कृती. ही कृती म्हणजे सत्कर्माचे समर्पण आणि प्रार्थना.
पितृगण सर्वसाधारणपणे चार अवस्थांमध्ये असण्याची शक्यता असते. पहिली अवस्था म्हणजे त्या पूर्वजांना वंशजांना खूप काही देण्याची इच्छा असते. दुसरी अवस्था वसुलीची असते. तिसऱ्या अवस्थेतल्या पितरांना काही द्यायचंही असतं आणि तुमच्याकडून काही वसूलही करायचं असतं. चौथ्या प्रकारातले पितर ह्या सगळ्यातून मुक्त झालेले असतात. त्यांना काही द्यायचं नसतं आणि काही घ्यायचंही नसतं. पंचमहाभूतात्मक देहाचा अभाव असल्याने पितरांची नेमकी अवस्था ज्ञानपूर्वक समजून घ्यावी लागते. पितरांच्या प्रेरणेचा चांगल्यात चांगला उपयोग करण्याचं कौशल्य यज्ञामध्ये आहे. विश्वातली सर्वाधिक गती असलेला प्रकाश उत्तम संदेशवाहक आहे आणि त्याद्वारे आपल्याला आपले कृतज्ञतेचे संदेश पितरांपर्यंत उत्तमरीत्या पोहोचवता येऊ शकतात. पितृगणांना सत्कर्म अर्पण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गायत्री मंत्राचा संकल्पयुक्त जप आणि त्याच्या श्रेयाचे संपूर्ण समर्पण. सत्कर्माचा अभाव आपल्यात निर्माण होऊ नये आणि आपल्या वंशजांना आपली शांती करण्याची वेळ येऊ नये ह्यासाठी आपण स्वतः आयुष्यभर सत्कर्मरत राहायला हवं”.

ह्यानंतर यजमानांनी स्वतंत्र यज्ञकुंड स्थापन करून त्यात अग्नी प्रज्वलित केला आणि त्या अग्नीसाक्षीने सर्व उपस्थित साधकांनी गायत्रीच्या जयघोषात पिंडदान केले. अर्पण केलेल्या पिंडाचा आणि हविर्द्रव्याचा काही भाग जलार्पण करण्यासाठी राखून ठेवण्यात आला. ह्यावेळी श्रीसद्गुरुंच्या स्वरातले ऋग्वेदातले पितृसूक्तातले मंत्र, त्यांच्या अर्थासहित सर्वांना ऐकवण्यात आले आणि त्याचं एकाग्रतापूर्वक श्रवण सर्वांनी केलं.
दुपारच्या सत्रात जन्मपूर्व संस्कार, जन्मोत्तर संस्कार आणि वैद्यकीय समुपदेशन हे उपक्रम सुरू ठेवून यज्ञामध्ये उपस्थित साधकांनी गायत्री मंत्राचे पठण व हवन सुरू ठेवले. विवेचनानंतर पूर्णाहुती झाली आणि त्यानंतर आशीर्वादमंत्रांचे ग्रहण करून यज्ञसाधनेची सांगता श्रीसद्गुरुपादुकांच्या दर्शनाने करण्यात आली.
||नमो गुरवे वासुदेवाय||

श्री यज्ञ-यज्ञ क्र.३७०(दि.१३,१४,१५ऑगस्ट २०१७)
दिनांक १३, १४ तसेच १५ ऑगस्ट ह्या तीन दिवसात गायत्री गार्डन बदलापूर येथे तीन दिवसीय निवासी ‘श्री’ यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. प.प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी तसेच स्वामी महाराजांचे कार्य करणारे श्रेष्ठ सत्पुरुष परमपूज्य श्री भाऊ महाराज करंदीकर ह्या तीन सत्पुरुषांच्या जयंती सोहळ्यानिमित्त ह्या तीन दिवसांमध्ये विविध प्रकारच्या साधना संपन्न झाल्या. अशाच प्रकारचा तीन दिवसीय ‘श्री’ यज्ञ सन २००६ मधल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये, दीपावलीच्या निमित्ताने श्री सद्गुरुंनी गायत्री गार्डन ह्या स्थळी घेतला होता.
◆दिवस पहिला : दिनांक १३ ऑगस्ट रविवार रोजी दरमहा यज्ञ संकल्पाला अनुसरून सकाळी ठीक ९.३० वाजता यजमानांच्या हस्ते आणि पूज्य आईंच्या उपस्थितीत श्रीयज्ञाचे प्रज्वलन झाले. आवाहनीय मंत्र झाल्यानंतर श्रद्धा सूक्त आणि पुरुष सूक्ताचे पठण झाल्यावर श्री सूक्ताच्या सामूहिक पठण-हवनाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात श्री सद्गुरुंच्या पादुकांचे समंत्र आणि षोडशोपचारे पाद्यपूजन झाले. त्यानंतर आरती व मानसपूजा झाल्यावर श्रीसद्गुरुंनी २००६ मध्ये ‘श्री’ ह्या विषयावर घेतलेल्या विवेचन मालिकेतल्या पहिल्या विवेचनाचा पुनःप्रत्ययी अनुभव भक्तांनी दृक्श्राव्य माध्यमाच्या मदतीने घेतला. ह्या विवेचनाचा सारांश असा,

“ प्राचीन काळापासून आजपर्यंत मनुष्य सतत सुखाचा शोध घेत आला आहे. त्यामागची मुख्य भावना अशी असते की, मला दुःख जाऊन सुख लाभू दे, शांती लाभू दे. मनुष्याचा सुखाचा पाठलाग अहर्निश चालू असतो. आजचे वैद्न्यानिकसुद्धा ह्याच विचाराने संशोधन करत असतात की, कमीत कमी वेळात, कमीत कमी श्रमात मनुष्याचा लाभ कसा होईल. ह्या विश्वाच्या प्रयोगशाळेत आपल्या ऋषी-मुनिंनीसुद्धा ह्याच हेतुने प्रयोग केले आणि विविध साधना प्रकारांची निर्मिती केली. सामान्य मनुष्याची सुखाची कल्पना फार सीमित असते. कोणाला विवाह प्राप्ती, कोणाला संतान प्राप्ती किंवा इतर कशात तरी सुख लाभेल असं वाटत असतं. मात्र सत्पुरुषांची सुखाची कल्पना ह्यापेक्षा खूप भव्य आणि शाश्वत अशी असते. त्यानुसार अध्यात्मातल्या साधकाने ह्या संसारात मिळणाऱ्या सर्व सुखांच्या कल्पनांमधला फोलपणा लक्षात घ्यायला हवा. प्रापंचिक मनुष्याला संसारात आणि अध्यात्मात अशा दोन्ही क्षेत्रात सुख प्राप्तीची अपेक्षा असते. पण सांसारिक सुखातला फोलपणा समजल्याशिवाय त्याची अध्यात्मात प्रगती होऊच शकत नाही. ह्या दोन्हीचा विचार करुन आपल्या प्राचीन भारतात जी साधना सांगितली गेली ती म्हणजे श्री यंत्राची साधना.
श्री यंत्राच्या त्रिकोणयुक्त आकारामागे विशिष्ट विज्ञान आहे. ह्यामध्ये चार ऊर्ध्वगामी त्रिकोण आहेत तर पाच अधोगामी त्रिकोण आहेत. ह्या नऊ त्रिकोणात पूर्ण विश्व प्रतीकरूपाने सामावलेलं आहे. शक्तीच्या प्राप्तीशिवाय ब्रह्मतत्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही हे ह्या साधनेमागचं मूळ तत्त्व आहे. हे तत्त्व लक्षात आल्यानंतर श्रीमद आद्य शंकराचार्य ह्यांनी सौंदर्य लहरी ह्या ग्रंथामध्ये श्रीयंत्र साधना सुचवली आहे. धन, आरोग्य किंवा मोक्ष ह्या पैकी काहीही प्राप्त करायचं असेल तर शक्तीची आवश्यकता असते. लक्ष्मीचे वेगवेगळे प्रकार आहेत. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य. धनाच्या दारीद्र्यापेक्षा मनाचं दारिद्र्य अधिक वाईट असतं. वित्त स्वरूपात असलेल्या लक्ष्मीचा जेव्हा आपण सत्कर्मासाठी त्याग करतो तेव्हा तिचं रुपांतर महालक्ष्मी मध्ये झालेलं असतं. अशी महालक्ष्मी आपल्याला मोक्ष द्वारी घेऊन जाऊ शकते. ह्या यंत्राला अनुरूप मंत्र म्हणजे श्रीसूक्त. श्रीसूक्ताची निर्मिती नादशास्त्रानुसार केली आहे. ह्या साधनेतून फक्त भौतिक प्राप्ती अपेक्षित नाही तर त्या पलीकडे जाऊन विश्वाशी एकरूपता साध्य करणं महत्त्वाचं आहे. उत्तम मार्गाने धन मिळवा आणि अलिप्त राहून ते खर्च करा असं ह्या साधनेचं ब्रीद आहे. ह्या साधनेला दानाची जोड अनिवार्य आहे. हा त्याग इतका नि:स्वार्थ असावा की, त्याचं उच्चारणसुद्धा होता कामा नये. त्यासाठी प्राप्ती आणि त्यागाचं चक्र सतत सुरू ठेवता आलं पाहिजे आणि अग्निसाक्षीने अत्यंत नम्रतेने, एकाग्रतेने आणि सद्भावनेने म्हणता आलं पाहिजे की, ‘हे जातवेदा, मी तुला आवाहन करतो की तू अनपगामिनी, अर्थात परत कधीही न जाणाऱ्या अशा त्या महालक्ष्मीला घेऊन ये’. ही अधिकारवाणी प्राप्त करण्यासाठी आपण अत्यंत निष्ठेने हे तीन दिवसाचं तप केलं पाहिजे.”
दुपारच्या सत्रामध्ये जन्मपूर्व संस्कार, बालसंस्कार आणि वैद्यकीय समुपदेशन हे उपक्रम संपन्न झाले. सायंकाळी लक्षार्चना आणि ज्योतीर्ध्यान संपन्न झाले आणि त्यानंतर यज्ञज्योती प्रज्वलित ठेवण्यासाठी काही स्वयंसेवकांनी रात्रीच्या प्रहरी हवन आणि अग्निसेवा सुरू ठेवली.

◆दिवस दुसरा : १४ ऑगस्ट २०१७
सकाळी नामस्मरण संपन्न झाले. तद्नंतर नेहमीप्रमाणे सकाळी ९.३० वाजता यजमानांच्या उपस्थितीत आवाहन मंत्र आणि राष्ट्र कल्याणाची प्रार्थना संपन्न झाल्यांनतर श्रीसूक्त आवर्तने पुनश्च सुरू ठेवण्यात आली. आजच्या दिवशी श्रीसद्गुरुंनी नोव्हेंबर २००६ मध्ये घेतलेल्या उर्वरित दोन्ही श्री विवेचनांचा लाभ भक्तांना पुनश्च मिळाला. ह्या विवेचनांचा सारांश असा,
श्री विवेचन-२
“कोणत्याही साधनेचे दोन प्रकार असतात. एक अंतरंग साधना; ह्यामध्ये आपल्या अंतरातच ईश्वराला पाहिले जाते. दुसरी बहिर्साधना ज्यामध्ये देहाबाहेर ईश्वरी प्रतीकाची स्थापना करून त्याची आराधना केली जाते. अंतरंग साधनेला कोणत्याही जप, तप, हवन इत्यादी बाह्य साधनाची आवश्यकता नाही. मात्र बहिर्साधनेला कोणत्यातरी बाह्य साधनाची आवश्यकता असते. सामान्य मनुष्याला अंतरंग साधना करणे आणि आतल्या ईश्वराला ओळखणे कठीण असते आणि म्हणून त्याच्यासाठी बाह्य साधना सांगितल्या आहेत. ह्यामध्ये पंचमहाभूतांचा आधार घेऊन पुढे जायचं असतं, उदाहरणार्थ जलाभिषेकामध्ये जल माध्यमाचा वापर केला जातो तर यज्ञामध्ये अग्नितत्त्वांचा वापर करुन ईश्वरापर्यंत पोहोचायचं असतं. प्रतीक विज्ञानामधला महत्त्वाचा भाग म्हणजे मेंदूविज्ञान. ज्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की, मेंदूमध्ये दोन प्रकारे संदेश पाठवता येतात; एक म्हणजे कंपनं आणि दुसरं म्हणजे विशिष्ट आकार. ह्यातली प्रमुख असतात ती कंपनं. कंपनांद्वारे विचार निर्माण होतात आणि विचारांद्वारे पुन्हा कंपनं निर्माण होतात. ही कंपनं अंतर्गत निर्माण होईपर्यंत बाह्य स्वरूपात म्हणजे मंत्र किंवा नामसाधनेद्वारे प्रथम ती निर्माण करावी लागतात. मंत्र साधनेमुळे किंवा नाम साधनेमुळे प्राप्त होणार नाही अशी एकही वस्तू ह्या जगात नाही. पण त्यासाठी काही प्रमुख अटी आहेत. पहिलं म्हणजे हे नाम/मंत्र आपल्या सद्गुरुंनी आपल्याला द्यायला हवं. ते नाम आपण निष्ठेने घ्यायला हवं आणि तिसरं म्हणजे त्यांनी दिलेल्या इतर साधना आणि सेवा आपण करायला हव्यात. ह्या सगळ्याला त्यागाची जोड अनिवार्य आहे. कारण ह्या विश्वाच्या एकूण शक्तीमध्ये फेरबदल होत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही विश्वाची शक्ती स्वतःच्या स्वार्थ पूर्तीसाठी उपयोगात आणता तेव्हा कुठेतरी त्याची घट झालेली असते आणि ही घट भरून काढण्यासाठी त्याग अनिवार्य ठरतो. जिथे महाविष्णू आहेत तिथेच लक्ष्मीचं स्थान आहे. ती त्यांच्या चरणसेवेत मग्न आहे. त्यामुळे लक्ष्मीची उपासना स्वतंत्रपणे न करता, वैश्विक शक्तीचं एक रूप म्हणून तिची उपासना करायला हवी.

◆श्री विवेचन-३
श्री यंत्र हे विश्वाचं प्रतीक आहे. ब्रह्मांडात असलेल्या प्रमुख १६१ शक्ती एका आकारात बद्ध करण्यात आल्या आहेत. सारांशाने सूक्ष्म रूपात विश्वाचं भव्य रूप सामावलेलं आहे. मनुष्य त्या सूक्ष्माशी एकरूप झाला तर त्या भव्याशी एकरूप होऊ शकतो. दृश्य स्वरूपातल्या लक्ष्मीपेक्षा अदृश्य स्वरूपातली लक्ष्मी अधिक उपयुक्त असते. अशा लक्ष्मीचा आवश्यक तेवढा पुरवठा साधकाला वेळोवेळी होत राहतो, पण त्याचा डामडौल करता येत नाही. दृश्य लक्ष्मी मात्र सगळ्यांना दाखवता येते पण त्या लक्ष्मीवंताला फार अभावाने तिचा उपभोग घेता येतो. महालक्ष्मीची आराधना करत असताना, ‘मी प्रयत्न करत राहणार आणि योग्य वेळी ती लक्ष्मी माझ्याकडे येणारच’, असा आत्मविश्वास साधकाकडे पाहिजे आणि साधना करत असताना तशी जिद्द आणि चिकाटी पाहिजे. श्री यंत्रामध्ये मानवी मेंदूचा सर्वाधिक विचार केला आहे, तसंच भारतीय अध्यात्म शास्त्राचाही सर्वार्थाने विचार केला आहे. ह्यावर जरा आपण एकाग्रता केली तर आपल्याला ज्या शक्तीची आवश्यकता आहे तिचा निश्चित पुरवठा होतो. आपण श्री यंत्रावर शक्तीने एकाग्र झालात तर शक्ती मिळेल, श्रद्धेने एकाग्र झालात तर श्रद्धा मिळेल आणि मुक्तीने एकाग्र झालात तर मुक्तीसुद्धा मिळेल. क्षुल्लक मागणी घेऊन तिथे जाऊ नका. जे मिळायचं ते आपोआप मिळेल पण मागताना मात्र भव्याचीच मागणी करा. संसारातल्या बुभुक्षितपणामुळे कर्मदोष वाढतात आणि ते फेडण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावे लागतात. जो निधड्या छातीने म्हणेल की मला तुझ्याकडून काही नको त्याच्याकडेच लक्ष्मी निवास करेल. श्री म्हणजे सर्व प्रकारची श्रीमंती. त्यात फक्त वित्त नव्हे, तर विचार आणि आचारांचीही श्रीमंती अपेक्षित आहे. ‘श्री’ ची आराधना करताना सरतेशेवटी एवढच म्हणूया की, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. ह्याचा अर्थ मला माज चढणार नाही, मी कृतघ्न होणार नाही आणि काहीही झालं तरी मी संकल्प अर्धवट सोडणार नाही. ही प्रार्थना यज्ञसाक्षीने आपण त्या महालक्ष्मीला कळवूया.’
सायंकाळी कालप्रमाणेच लक्षार्चना संपन्न झाली आणि यज्ञज्योत हवन आणि अर्चन साधनेने प्रज्वलित ठेवण्यात आली.

◆दिवस तिसरा:१५ ऑगस्ट २०१७ आज पंधरा ऑगस्ट. भारताचा स्वातंत्र्य दिवस. ह्या दिवसाचे औचित्य साधून आवाहन मंत्र आणि राष्ट्र कल्याणाच्या प्रार्थनेनंतर राष्ट्रगीताने यज्ञाला राष्ट्रभक्तीचे अर्पण करण्यात आले. त्यानंतर यज्ञसाक्षीने १०८ सामूहिक सत्यदत्त पूजा विधिवत संपन्न झाल्या. प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ही साधना सुचविली आहे आणि त्याचा विधीसुद्धा सांगितला आहे. एकत्र येऊन सत्याची आराधना करणे हे ह्यामागचं मुख्य तत्त्व होय. सकाळच्या सत्रात सत्यदत्त पूजा संपन्न झाल्यानंतर आरती आणि गजर झाला आणि सर्व उपस्थितांनी यज्ञात अंतिम हवन केले. त्यानंतर पूर्णाहुती संपन्न होऊन तीन दिवसीय यज्ञाची सांगता पादुका दर्शन आणि महाप्रसादाने झाली.
|| नमो गुरवे वासुदेवाय ||

श्री दत्तयज्ञ (गुरुपौर्णिमा)-यज्ञ क्र.३६९(रविवार, दि.९ जुलै २०१७)
दिनांक ९ जुलै २०१७ रोजी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी गायत्री गार्डन, बदलापूर या स्थळावर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या प्रेरणेने आणि श्री गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्री दत्तात्रेय यज्ञाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९.३० वाजता पूज्य आईंच्या उपस्थितीत यजमानांनी यज्ञ प्रज्वलन केले. आवाह्नीय मंत्र, श्रद्धा सूक्त पठण झाल्यानंतर श्रीदत्तात्रेय नामावलीने श्रीदत्तात्रेय शक्तीच्या विविध रूपांना आवाहन करून हविर्भाग अर्पण करण्यात आले. त्यानंतर प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित वेदपादस्तुती आणि श्रीदत्तभावसुधारस स्तोत्र ह्या स्तोत्रांद्वारे त्या दत्तात्रेयरुपी विश्वशक्तीला यज्ञामध्ये हविर्भाग अर्पण करण्यात आले. प्रथम सत्रामध्ये “श्री दत्तात्रेय अपराध क्षमापन स्तोत्र” ह्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित स्तोत्रावर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी ह्यांनी केलेल्या विवरण ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे अनावरण पूज्य आईसाहेबांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. परमपूज्य श्री सद्गुरु दृश्य विश्वातून अदृश्य विश्वात प्रवेश केलेल्याला जवळ जवळ दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र त्यांचे चैतन्य अजूनही यज्ञेश्वर नारायण स्वरूपात, त्यांच्या पादुकांच्या रूपाने आणि त्यांनी निर्मिलेल्या ग्रंथ संपदेच्या रूपाने चिरंतन आहे. ही भावना प्रकर्षाने जागृत करुन श्री सद्गुरुंच्या चैतन्याशी एकरूप होण्याचा आजचा दिवस. अर्थातच सर्व भक्त अत्यंत उत्साहात, आनंदात आणि भक्तीभावाने श्रीसद्गुरुंचे स्वागत करण्यासाठी सिद्ध होती. पादुकांच्या रूपाने श्रींना पालखीमध्ये विराजमान करून, चंद्र, सूर्य, मशाल, चवरी ह्यांच्यासह सन्मानित करुन, तुतारी आणि सनईच्या मंगलमय सुरावटीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे स्वागत करण्यात आले. दिगंबरा दिगंबरा ह्या सिद्ध नामाचा जयघोष आणि ‘ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम’, ह्या नामाचा गजर होत होता. औक्षण करुन आणि पुष्पांची उधळण करत श्रींना व्यासपीठावर आणण्यात आले. सोबत परमपूज्य आईसाहेब होत्याच! नर्मदामय्येच्या गजरात श्रीसद्गुरु व्यासपीठावर विराजमान झाल्यांनतर भक्तांचे प्रतिनिधित्त्व करत एका ज्येष्ठ दाम्पत्याने श्रींची समंत्र पाद्यपूजा केली. त्यावेळी विष्णुसहस्रनाम, पुरुष सूक्त आणि श्रीसूक्त ह्या मंत्रांचे सामूहिक पठण करण्यात आले. पाद्यपूजेचा समारोप आरती आणि गजराने करण्यात आला. त्यानंतर सर्व साधकांनी क्रमाक्रमाने श्रीदत्तसहस्रनामाचे पठण करत यज्ञात हविर्भाग अर्पण केले.

दुपारच्या सत्रात जन्मपूर्व संस्कार, जन्मोत्तर संस्कार आणि वैद्यकीय समुपदेशन हे उपक्रम सुरु ठेवून यज्ञामध्ये उपस्थित साधकांनी विविध स्तोत्र-मंत्रांचे पठण व हवन केले.
त्यानंतर श्री सद्गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनुभव कथनाचा कार्यक्रम संपन्न झाला. ह्यामध्ये श्री नानिवडेकर, श्री व सौ धर्माधिकारी, श्री मनोज पेडणेकर, चि. अक्षत वैद्य आणि चि. भक्ती केळकर ह्या साधकांनी आपले अनुभव सांगितले. विशेषतः लहान वयाच्या साधकांचे मनापासून व्यक्त झालेले अनुभव ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. एकत्र येऊ, एकत्र कार्य करू हा संदेश प्रामुख्याने आजच्या यज्ञात दिला गेला.
त्यानंतर, श्री सद्गुरुंनी सन २०१५ मध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने घेतलेल्या विवेचनाचा लाभ दृक्श्राव्य माध्यमाच्या कृपेने सर्वांना पुनश्च मिळाला. ह्या विवेचनाचा सारांश असा,
“ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू: गुरुर्देवो महेश्वरः |
गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||
सद्गुरुतत्त्वाचं वर्णन करणाऱ्या ह्या ओळी केवळ दोनच आहेत. पण त्यात सगळं सद्गुरुतत्त्व सामावलेलं आहे. उत्पत्ती, स्थिती आणि संहार ही तिन्ही कार्यं ह्या एकमेवाद्वितीय अशा गुरुशक्तीमध्ये एकवटलेली आहेत. आणि ती सदगुरुशक्ती म्हणजे साक्षात परब्रह्म आहे असा हा श्लोक सांगतो. हे आपल्या सारखेच दिसणारे सदेह सद्गुरु म्हणजे साक्षात परब्रह्माचं रूप आहेत, हे समजून घेणं थोडं अवघड असतं. कारण हा ऐंद्रिय ज्ञानाच्या पलीकडचा विषय आहे. त्या जाणीवेच्या प्रांतामध्ये ज्याला जाणीव होते तोच ते समजून घेऊ शकतो, नाहीतर समजणं फार अवघड असतं. हा अनुभव येण्यासाठी प्रथम जी काय आवश्यकता आहे ती श्रद्धेची आहे. ईश्वर आणि सद्गुरु ह्यांच्यामध्ये किंचितसा फरक असतो. ईश्वर हा सर्वत्र व्याप्त असतो ‘विभुर्व्याप्य सर्वत्रं’, असं आपलं अध्यात्मशास्त्र सांगतं. पण तरीही त्या ईश्वरीतत्त्वाला प्रकट होण्यासाठी किंवा त्याला प्रकट करण्यासाठी आत्यंतिक अशा श्रद्धेची गरज असते. अगदी पौराणिक उदाहरणांमध्ये भक्त प्रल्हादाचं उदाहरण घेता येईल. जेव्हा त्याची श्रद्धा एवढी दृढ झाली की, ह्या खांबामध्ये भगवान महाविष्णू आहेत, तेव्हा त्या निर्जीव खांबामध्येसुद्धा त्या महाविष्णूला प्रकट व्हावं लागलं.थोडक्यात म्हणजे काय त्या ईश्वरी शक्तीला प्रकट होण्यासाठी भक्ताच्या श्रद्धेची नितांत आवश्यकता असते,जी प्रल्हादाने दाखवली ह्या गोष्टीमध्ये तशी. की, इतकी खात्री की, हो ह्या खांबामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर आहे. पण सत्पुरुषांच्या बाबतीत मात्र ईश्वरी शक्ती प्रकट होण्यासाठी अशा भक्ताच्या श्रद्धेची आवश्यकता असतेच असं नाही. कारण त्या सत्पुरुषाच्या तपामुळे, त्याच्या सत्कर्मामुळे ती तिथे अगोदरच अवतरीत झालेली असते किंबहुना म्हणूनच ते सद्गुरु किंवा सत्पुरुष असतात. अर्थात श्रद्धा इथेही आवश्यक आहे पण ती कशी आहे ज्ञानोत्तर श्रद्धा आवश्यक आहे.ती शक्ती प्रकट करण्यासाठी श्रद्धेची आवश्यकता नाही, शक्ती प्रकट झालेली आहे, ती अदृश्यातून दृश्यात आलेली आहे.फक्त ह्या दृश्यात असलेल्या शक्तीवर श्रद्धा असणं आवश्यक असतं. आधी प्रकटलेली ही शक्ती ग्रहण करण्यासाठी भक्तासाठी किंवा शिष्यांसाठी जे उरतं, ते एकच कार्य की, त्या शक्तीचं अस्तित्व आपल्या अनुभवाच्या कक्षेमध्ये आणणं.
माझीया मनीचा जाणोनिया भाव तो करी उपाव गुरु रावो ||
आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेणे नव्हे गुंपा काही कोठे ||
जाती पुढे एक उतरले पार हा भवसागर साधूसंत ||
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी उतार सांगडी तापे तेते ||
तुका म्हणे मज दावियेला तारू कृपेचा सागरू पांडुरंग||
तुकाराम गाथेतला हा अभंग सांगतो की, गुरुराजांनी माझ्या हृदयातला भाव जाणून त्याप्रमाणे मला मार्ग सांगितला.सत्कर्मं करायला हवीत.ते ठीक आहे.पण ती कोणती? कशी? केव्हा? आणि कुठे?आणि कशापद्धतीने? ह्याचं मार्गदर्शन जे मिळतं ते सद्गुरुतत्त्वाकडनं मिळतं.गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा तुकारामांचा अभंग आहे. ह्या अभंगाचा एवढाच भावार्थ आहे की, सत्कर्माशिवाय कर्माच्या गुंत्यातून सुटका होत नाही. मग ती कोणाकडून आणि कशी करवून घ्यावी, ह्याचं ज्ञान सद्गुरुंना असतं. म्हणून गुरुतत्त्व हे देवापेक्षाही सर्वोच्च मानलं गेलं आहे आपल्याकडे अध्यात्म शास्त्रामध्ये. म्हणजे रेखेवर मेख मारतो तो सद्गुरु. पण दुर्दैव असं आहे की, एखादेवेळी ह्या सद्गुरुंचं सामर्थ्य सर्वांना कळतंच असं नाही. कारण ते जाणवत नाही, सामान्य माणसं ते ओळखत नाहीत. एखाद्यावेळी एखाद्यला वाटू शकतं की, माझ्या रेखेवर मेख म्हणजे पाचर सद्गुरुंनी बरोबर मारलेली नाही कारण माझ्यावर संकटं येताहेत. म्हणजे ह्या सद्गुरुंच्यातच काही दम नाही. उगाच आपले काहीतरी सांगताहेत. ही एक प्रकारची गुरुनिंदा असते आणि तुकाराम महराजांनी अत्यंत जहाल शब्दामध्ये ह्या निंदकांवर टीका केलेली आहे.
अभंग:
दोराच्या आधारे पर्वत चढला | पाउलासी केला अपघात||
अष्टोत्तरशे व्याधी ज्या वैद्ये दवडोनी | तो वैद्य मारुनी उत्तीर्णता ||
नवमास माया वाहिले उदरी | ते माता चौबारी नग्न केली||
गायत्रीचे क्षीर पिळोनी घेउनी | उपवासी बांधोनी ताडितसे||
तुका म्हणे गुरुनिंदकांचे तोंड | पहाता नरककुंड पूर्वजांसी ||
वस्तुतः सद्गुरु हा भौतिक मागण्या पूर्ण करण्यासाठी नसतो कधी.ही अपेक्षाच चुकीची आहे.ही समजूत चुकीची आहे. तो फक्त अध्यात्मिक प्रगतीसाठीच असतो आणि तिथे अध्यात्मिक प्रगतीच मागायची असते. भौतिक प्रगतीकडे लक्ष द्यायचं नसतं म्हणजे मग आपली निष्ठा डळमळीत होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यासाठी सद्गुरुंची सेवा आपण करावी, सेवा ह्याचा अर्थ ‘अनुसंधान'.प्रत्यक्ष येऊन सेवा करायला पाहिजे असं नाही. ते करायच्या ऐवजी सद्गुरुंकडे जाऊन आपल्या मागण्या नोंदवायच्या की हे झालं पाहिजे,ते झालं पाहिजे. म्हणजे आपण सद्गुरुंचे सेवक आहोत का सद्गुरु आपला सेवक आहे, नक्की काय आहे? ह्याचं गणित नीट स्वतःशी मांडावं म्हणजे अध्यात्म काय आहे ते लक्षात येईल.अरे तो सद्गुरु काय आपला नोकर आहे का? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे सांगायला. इथे अध्यात्मिक प्रगतीसाठी आलोय आपण. माझ्या मागण्या पूर्ण करण्याचं एक माध्यम म्हणून सद्गुरु आहेत असं नाहीये.हे सर्वस्वी चुकीचं आहे.
हे बघा आपल्याला इथे चमत्कार दाखवून गर्दी जमा करायची असती तर मी वाटेल ते केलं असतं. पण रोखठोक जे खरं सत्य आहे,तेच मी आपल्याला सांगतोय की, हे खरं अध्यात्म नव्हे.अध्यात्म हेच आहे की, आपल्याला जास्तीत जास्त सत्कर्म कसं करता येईल, त्याकडे सतत लक्ष ठेवणं आणि संकल्पपूर्वक आपलं आचरण त्या पद्धतीनी दृढ करणं आणि त्या पद्धतीनी सेवा करणं हेच खरं अध्यात्म आहे. बाकीचं काहीही अध्यात्म नाही.बाकीचं सगळं खोटं आहे,मिथ्या आहे. हे बरोबर ओळखून असावं माणसाने. ह्याच्यामध्ये अनेक वेळेला गडबड गोंधळ होतो, अध्यात्म म्हणजे कुठेतरी काहीतरी वाचलं जातं पुस्तकातून किंवा अशी काहीतरी डोक्यामध्ये कल्पना करून घेतलेली असते की, अमुक म्हणजे अध्यात्म आहे. तर त्या चुकीच्या कल्पना सोडून देऊन, तुकाराम महाराजांनी दिलेल्या ह्या शिकवणीप्रमाणे आपण आचरण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ह्या कानानी ऐकायचं, त्या कानानी सोडून द्यायचं म्हणजे अध्यात्म नव्हे. तर खरं अध्यात्म कशाला म्हणतात त्याचं ज्ञान आपल्याला करून घेतलं पाहिजे. त्या ज्ञानामध्ये काही शंका असतील तर सगळ्या ग्रंथांचं अवलोकन करून झाल्यानंतर त्या सद्गुरूंना जरूर विचारा.पण पुरेसं ज्ञान न घेता अशा शंका कुचकामी असतात,त्याचा काही उपयोग नसतो.तेव्हा ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त, व्यास पौर्णिमेनिमित्त तुकारामांनी दिलेली ही महत्त्वाची शिकवण आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया.”

विवेचानानंतर पूर्णाहुती झाली आणि त्यानंतर आशीर्वाद मंत्रांचे ग्रहण करून यज्ञ साधनेची सांगता सद्गुरु पादुकांच्या दर्शनाने करण्यात आली.

श्री गायत्री यज्ञ-यज्ञ क्र.३६८(रविवार, दि.११ जून २०१७)
दिनांक ११ जून २०१७ रोजी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी गायत्री गार्डन, बदलापूर या स्थळावर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या प्रेरणेने ’गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९.३० वाजता पूज्य आईंच्या उपस्थितीत यज्ञ प्रज्वलन करण्यासाठी सौरशक्ती घेताना गायत्री मंत्राचा उद्घोष भक्तांनी केला. आवाहनीय मंत्र पठण झाल्यानंतर सुरुवातीला श्रद्धा सूक्त व सौर सूक्ताचे पठण झाल्यानंतर गायत्री मंत्राच्या सामूहिक आवर्तनांना सुरुवात करण्यात आली.

सकाळच्या सत्रात गायत्री मानसपूजा सिद्ध झाल्यानंतर यज्ञ साधनेचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व विशद करणारी श्री सद्गुरु-विवेचनाची ध्वनिफीत सर्वांनी श्रवण केली. हे विवेचन श्री सद्गुरुंनी ऑगस्ट २०१० मध्ये भक्तांच्या ज्ञानवर्धनासाठी घेतले होते. विवेचनामध्ये श्री सद्गुरुंनी यज्ञ संकल्पना, त्यात कालौघात प्रविष्ट झालेल्या अनिष्ट रूढी ह्यांचा परामर्ष घेऊन बदलत्या काळाला अनुरूप असलेली यज्ञ संकल्पनेची नवनिर्मिती विज्ञाननिष्ठ भूमिकेवर करण्याचं प्रतिपादन केलं. ह्यामध्ये त्यांनी यज्ञ व्याख्या, प्रकाशाचे उत्तम संदेशवाहक म्हणून असणारे महत्त्व, मंत्र आणि प्रकाश सामर्थ्याचा दुग्धशर्करा योग यज्ञात कसा साधला जातो ते सोदाहरण सांगितलं. प्रकाशासमोर एकाग्रतापूर्वक, ‘माझा उद्धार मी करणार आहे,’ असा निर्धार साधकाने कोणताही न्यूनगंड न बाळगता केला पाहिजे. सन्मान, संगतीकरण आणि दान ही यज्ञाची त्रिसूत्री आहे, त्यानुसार वेळेचा, सेवेचा आणि श्रमाचा त्याग यज्ञ सान्निध्यात घडला पाहिजे. एकत्रित मंत्र उच्चारणाने गुणाकाराने शक्ती निर्माण होते पण ती शक्ती ग्रहण करण्याकरीता मनाची निःसंशय अवस्था सगळ्यात महत्त्वाची आहे. यज्ञाचे तत्त्व लक्षात घेऊन अतिशय निर्मम वृत्तीने यज्ञ साधना करणाऱ्या साधकाला सुख-दुःखाच्या पलीकडची मोक्षावस्था देण्याचे सामर्थ्य ह्या यज्ञ साधनेत कसे आहे त्याचे यथार्थ विवरण करून श्रीसद्गुरुंनी विवेचनाची सांगता केली.

दुपारच्या सत्रात प्रकाश ज्ञान शक्ती ट्रस्ट तर्फे बदलापूर परिसरातल्या ९० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप पूज्य आईंच्या शुभहस्ते यज्ञ साक्षीने करण्यात आले. पूर्णाहुती नंतर आशीर्वाद मंत्रांचे ग्रहण करून यज्ञ साधनेची सांगता करण्यात आली.

श्री गणेश यज्ञ-यज्ञ क्र.३६७(रविवार, दि.१४ मे २०१७)
दिनांक १४ में २०१७ रोजी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गायत्री गार्डन बदलापूर या स्थळावर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या प्रेरणेने ’श्रीगणेश’ यज्ञाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९.३० वाजता पूज्य आईंच्या उपस्थितीत यज्ञप्रज्वलन करण्यासाठी सौरशक्ती घेताना गायत्री मंत्राचा उद्घोष भक्तांनी केला. देवदेवतांच्या आवाहनीय मंत्रपठणाने ब्रह्मशक्ती जणु काही ’गणेश’ रूपात अवतरीत झाली. या ॐकाररूपाचे ’ब्रह्मणस्पती स्तोत्र’ व श्रीअथर्वशीर्ष या मंत्रानी स्मरण करून सामूहिक हवनाद्वारे हविर्भाग अर्पण केले.
सकाळच्या सत्रात श्रीगुरुजींनी ११ मार्च २०१२ रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपन्न झालेल्या यज्ञात जे विवेचन घेतलं होतं त्याचे ध्वनीमुद्रण सगळ्या भक्तांनी श्रवण केले. ह्या विवेचनाचा सारांश असा,
संकष्टी चतुर्थी आणि गणेशोपासना
सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णक:
लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायक:।
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ॥
या गणेशपुराणातील संस्कृत श्लोकात द्वादश नामांनी वर्णिलेली वाचक शक्ती "श्रीगजानन" या रूपात प्रकट झाली. शब्दमाहात्म्याचे वर्णन करताना श्रीगुरुजी सांगतात,
"मानवाला प्रदान केलेल्या शक्तींपैकी शब्दशक्ती सर्वात मोठी आहे. ही शक्ती सरस्वती रूपाने संस्कृत भाषेत प्रकट झाली. या शक्तीचे सामर्थ्य शब्दभांडारात नसून शब्दातून व्यक्त होणाऱ्या अत्युच्च भावात आहे. देवदेवतांना अनेक नामांनी संबोधून संबंधित गुणांचा संचय वा गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला जातो. विशिष्ट प्रतिमेसमोर शब्दसामर्थ्याचा वापर करून केलेले स्तवन शक्तीच्या प्रकटीकरणाचे कार्य करते. गणपतीच्या बारा नावांमध्ये हीच किमया आहे. गणेश या देवतेला ’सुमुख’ या नावाने ओळखतात कारण ॐकारमय गणेशाचे मुख, श्रीशंकर-पार्वतीला ॐकाराच्या विविध रूपांचे सोंडेद्वारे दर्शन घडवताना अधिकच खुलून दिसायचे. या सुमुखाचे नाव एकदंत पडले कारण अद्वैतरुपी ब्रह्मतत्त्व म्हणजे साक्षात ’श्रीगणेश’. खरेतर कपील म्हणजे तांबडा रंग. कपिला गाय जशी तांबुस-काळ्या रंगाची असूनही पांढरे दूध देते त्याप्रमाणेच हा एकदंत कपील शुद्ध आत्मज्ञानरूपी दूधाचे प्रदान भक्तांना करतो. गजकर्ण म्हणजे मोठ्या, सुपाएवढ्या कानाचा! गजकर्ण या विषेश नामाने बहुश्रुतता, सर्वांच्या साहाय्याने व सल्ल्याने कार्य करण्याच्या गुणांचा संदेश देते. या गणपतीने स्वतःच्या उदरात १४ विद्या,६४ कला सामावून घेतल्यामुळे त्याला लंबोदर असेही म्हणतात. वेदांचे ज्ञान त्याने श्रीशंकरांच्या डमरूमधून व संगीताचे ज्ञान पार्वतीच्या पैंजणातून घेतले. भयंकर आणि विशेष विघ्नांचा नाश करणारा विकट विघ्ननाशक तर साक्षात ब्रह्मतत्त्वाचे प्रतीक असणारा विशेष नायक अर्थात विनायक! सगुण अग्नी आणि निर्गुण उष्णतेच्या मध्यावर असणाऱ्या धूम्रावस्थेतला धूम्रकेतू आणि धूसर कल्पनांना साकार मूर्त स्वरूप देणारा महागणपती. जो गणांचा अध्यक्ष असून भाळीच्या ममता, वात्सल्य, क्षमाशीलता या गुणांमुळे चंद्राशी साम्य साधतो तो भालचंद्र. अशा गजमुखी गजाननाशी एकरूपता साधण्यासाठी संकष्टी अर्थात सत्कर्मासाठी कष्ट प्रत्येक गणेश भक्ताने करायला हवेत”.
दुपारच्या सत्रात समूहिक मंत्रपठण व हविर्भाग अर्पणानंतर पूर्णाहुती झाली. उपस्थितांना ॐकार तत्त्वाचा आशीर्वाद यज्ञाद्वारे मिळाला.

महिम्न स्वाहाकार-यज्ञ क्र.३६६ (रविवार, दि.९ एप्रिल २०१७)
दिनांक ९ एप्रिल २०१७ रोजी महिन्याच्या दुसऱ्या रविवारचा संकल्पित यज्ञ संपन्न झाला. ह्या दिवशी महिम्न स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले होते. यजमानांच्या हस्ते सौर शक्तीद्वारे यज्ञ प्रज्वलन झाल्यांनतर आवाहन मंत्र आणि श्रद्धासूक्त ह्यांचे पठण झाल्यांनतर महिम्न स्तोत्राच्या सामूहिक पठण आणि हवनास प्रारंभ झाला. ह्या दिवशी महावीर जयंती असल्याने सकाळच्या मानस पूजेनंतर श्री सद्गुरुंनी “भगवान महावीर आणि जैन तत्त्वज्ञान” ह्या विषयावर १३ एप्रिल २०१४ रोजी घेतलेल्या विवेचनाच्या ध्वनीमुद्रणाचे सर्वांनी श्रवण केले. त्याचा सारांश असा, “कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करण्याचं कौशल्य जो दाखवतो तो वीर असतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे, हे शूरवीर असतात. मोहावर विजय मिळवून त्याग करणारा दानवीर असतो. धर्मरक्षणासाठी स्वतःच्या जीवावर उदार होणारा धर्मवीर असतो. परंतु सर्वात मोठा वीर तोच, ज्याने अंतर्गत शत्रूंचा बिमोड केला आहे. असा बिमोड करून स्वतःमध्ये समता प्रस्थापित करणारा बलवान वीर म्हणजे वर्धमान महावीर! हे जैन तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारे चोविसावे तीर्थंकर आहेत. हजारो वर्षांपूर्वी वैदिक संस्कृतीच्या समांतर काळात जैन तत्त्वज्ञानाचा उगम भारतवर्षात झाला. वैदिक वाङ्मयामध्ये श्रमण मुनींचा उल्लेख आढळतो.

जिन म्हणजे विजय, त्यामुळे स्वतःला जिंकणारा तो जैन! वर्धमान महावीर जन्मतः ज्ञानी आणि अलौकिक शक्ती असणारे होते. राजाच्या पोटी त्यांचा जन्म झाला. तिसाव्या वर्षी सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी श्रमण दीक्षा ग्रहण केली. पुढे त्यांनी अतिउग्र तपश्चर्या करून तितिक्षेची परिसीमा गाठली आणि ‘वीतराग’ पदाला ते लायक ठरले. इंद्राने ’महावीर’ ह्या पदवीने त्यांचा सन्मान केला. त्यानंतर बहात्तर वर्षांच्या आयुष्यात सतत प्रचार आणि प्रसार करून त्यांनी कर्मवीरतासुद्धा दाखवली.
जैन तत्त्वज्ञानाचे तीन मूल सिद्धांत म्हणजे अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकान्तवाद (स्याद्वाद). स्याद्वाद हा फार मोठा सिद्धांत आहे. कोणत्याही गोष्टीचा आग्रह कदापि न ठेवणे, कोणालाही त्याज्य न ठरवणे हा स्याद्वादाचा गाभा आहे. वेदान्ताच्या बरोबर विरुद्ध असं प्रतिपादन हा स्याद्वाद करतो की, जे दिसतं ते खरं आहे आणि जे दिसत नाही ते ही खरं आहे. सापेक्षतेने प्रत्येकाची परीक्षा करा आणि त्याला खरोखरचे ओळखा असं स्याद्वाद सांगतो. ह्या तत्त्वज्ञानातले अर्धमागधी भाषेतले पाच मंत्र महत्त्वाचे समजले जातात. हे पाच प्रकारचे नमस्कार आहेत.
१)णमो अरिहन्ताणं- अंतर्गत शत्रुंना मारलेल्या आणि समता प्रस्थापित केलेल्या अरिहंताला माझा नमस्कार असो.
२)णमो सिद्धाणं –मुक्ती साधलेल्या सिद्धांना माझा नमस्कार असो.
३)णमो आइरियाणं- सर्व मुनींचे गुरु असणाऱ्या, इतरांकडून प्रायश्चित्त करवून घेणाऱ्या, सत्कर्म करवून घेणाऱ्या सद्गुरुंना माझा नमस्कार असो.
४)णमो उव्झायाणं- शिक्षक, मार्गदर्शक रुपातल्या गुरुंना माझा नमस्कार असो.
५)णमो सव्वसाहुणं- स्वतःचं आत्महित जाणणाऱ्या, मोक्षमार्गासाठी प्रयत्नशील असलेल्या साधूला माझा नमस्कार असो.
ह्या पाच नमस्कारांची फलश्रुती म्हणजे, “एसो पंच णमुक्कारो सव्व पाव प्पणासाणो । मंगलाणं च सव्वेसिं पढमं हवइ मंगलं ॥“
ह्या पाच नमस्कारांनी सर्व पापांचा नाश होऊन सर्वांचे मंगल होवो असं ही फलश्रुती सांगते.
हे नमस्कार साकार करण्यासाठी तीन गोष्टी साधता आल्या पाहिजेत, १) सम्यग्दर्शन २) सम्यक ज्ञान ३) सम्यक चारित्र्य. सम्यक म्हणजे सारासार विचार करून काढलेलं तात्पर्य. आत्मस्वरूपाचं ज्ञान पाहिजे असेल तर त्यासाठी तशी दृष्टी आणि तशी श्रद्धा पाहिजे. जैन तत्त्वज्ञानाने श्रद्धेची आठ अंगं सांगितली आहेत. ती म्हणजे, १) नि:शंक अंग( शंका नसलेली बुद्धी) २) नि:कांक्षित अंग ( भोगांची इच्छा नाही) ३) निर्विचिकित्सा अंग ( कोणाबद्दल द्वेष, तिरस्कार, घृणा नाही) ४) उपगूहन अंग (निंदेत सहभागी न होणं) ५) स्थितीकरण अंग ( विसरा आणि क्षमा करा ह्या तत्त्वाचा अंगिकार) ६) अमूढ दृष्टी अंग ( आगतिक दृष्टी न बाळगता गतानुगतिक दृष्टी बाळगणं) ७) वात्सल्य अंग (यच्चयावत प्राण्यांविषयी प्रेमभाव) ८) प्रभावना (धर्माचा, सत्कर्माचा प्रचार आणि प्रसार करणं). सम्यग्दरर्शनासाठी हे आठ गुण आवश्यक आहेत. त्यामुळे हळूहळू आत्मज्ञान प्राप्त होते.

महावीरांच्या शिकवणीची आणखी दोन प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी स्त्रियांना समतुल्य अधिकार दिले. दुसरं म्हणजे ते त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तीला अनुकूल काळ बघून त्याच्या श्रद्धास्थानाला बळकट करण्याचा प्रयत्न करत असत. श्रीमद्‍ आद्य शंकराचार्यांनी ह्याच तत्त्वाचा पुढे आधार घेतला. सर्वस्वाचा त्याग करा असं सांगणारे भगवान महावीर आणि ऐहिक तसेच पारमार्थिक उन्नयन एकत्र साधा असं सांगणारे वैदिक तत्त्वज्ञान ह्यात काही मूलभूत फरक आहेत. तरीही या तत्त्वज्ञानातलं उत्तम ते स्वीकारून आपण आजच्या दिवशी ह्या श्रेष्ठ सत्पुरुषाला वंदन करुया!”

श्रीसद्गुरुंच्या ह्या अलौकिक विवेचनानंतर अन्नपूर्णाष्टकम् स्तोत्र मंत्रांनी यज्ञदेवतेला नैवेद्य अर्पण करण्यात आला. दुपारच्या सत्रानंतर जन्मपूर्व संस्कार, वैद्यकीय समुपदेशन इत्यादी नेहमीचे उपक्रम इच्छुकांकरीता घेतले गेले, त्यावेळी इतरांनी महिम्न स्वाहाकार सुरू ठेवला. सायंसत्रात ‘नमो गुरवे वासुदेवाय’ ह्या नाममंत्राचा जप यज्ञसाक्षीने करून त्यानंतर पूर्णाहुती संपन्न झाली. सर्वांनी आशीर्वाद मंत्रांचे ग्रहण केले आणि श्रीसद्गुरु पादुका तसेच पूज्य आईंचे दर्शन घेऊन यज्ञाची सांगता करण्यात आली.||इति श्रीवासुदेवार्पणमस्तु ||

श्री रामरक्षा यज्ञ - यज्ञ क्र.३६५ (मंगळवार, दि.४ एप्रिल २०१७)
परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी ह्यांच्या आशीर्वादाने दिनांक ४ एप्रिल रोजीच्या रामनवमीनिमित्त श्रीरामरक्षा यज्ञाचे आयोजन “गायत्री गार्डन’, बदलापूर ह्या यज्ञस्थळी करण्यात आले. गायत्री मंत्राच्या जयघोषात आणि पूज्य आईंच्या उपस्थितीत यज्ञाचे प्रज्वलन केल्यानंतर सर्व देवदेवतांसह यज्ञाच्या रक्षणकर्त्या प्रभू रामचन्द्रांचे सर्वानी स्मरण केले. श्रद्धासूक्ताचे पठण झाल्यानंतर श्रीरामरक्षा स्तोत्राच्या सामूहिक पठण-हवनाला सुरुवात झाली.

सकाळच्या सत्रात श्रीराम मानसपूजा संपन्न झाली आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे करण्यात आलेल्या निवेदनामध्ये श्रीसद्गुरुंनी यज्ञाच्या जोडीने सुरु केलेल्या उपक्रमांबाबत आणि श्रीसद्गुरुंच्या ग्रंथांबाबत माहिती देण्यात आली. तसेच श्रीसद्गुरुंच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त भक्तांनी केलेल्या नामजप संकल्पाचा आढावा घेऊन त्यानंतर नवविधा भक्तीच्या दुसऱ्या म्हणजेच कीर्तन भक्ती अंतर्गत नियोजित सत्संग बैठकीची घोषणा करण्यात आली. यज्ञसाक्षीने जन्मपूर्व संस्कार, ह्या उपक्रमाला आजच्या दिवशी ११ वर्षे पूर्ण झाली. आजवर ह्या उपक्रमात एकूण ३१६ साधक सहभागी झाले आहेत.

ह्यानंतर श्रीसद्गुरुंनी एप्रिल २००६ मध्ये रामनवमीच्या निमित्ताने यज्ञसन्मुख जे विवेचन केलं, त्याचं ध्वनीमुद्रण सर्वांनी श्रवण केलं. ह्या विवेचनाचा सारांश असा, “प्रभू रामचंद्रांबद्दल माहित नाही असा एकही मनुष्य ह्या देशात असू शकणार नाही. मानव आपल्या बुद्धीचा आणि शक्तीचा वापर करून किती उत्तुंग व्यक्तिमत्त्व निर्माण करू शकतो, हे राम अवतारातून दिसते. रामप्रहर म्हणजे पहाटेचा प्रहर. सकाळी उठल्यापासून त्याचं स्मरण केलं तर आयुष्यभर सत्यनिष्ठा ठेवून अन्यायाचं परिमार्जन करण्याची शक्ती आपल्यालाही त्यांच्याकडून मिळू शकते. ही सत्यनिष्ठा जपताना त्यांना १४ वर्ष वनवास झाला, पण नियोजित राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी तो कठोर आदेश ऐकूनही त्यांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही, असं वाल्मीकि ऋषी सांगतात. आजच्या दिवशी त्यांचं विशेष स्मरण ह्याकरिता आवश्यक आहे की, त्यामुळे त्यांच्यातले गुण हळूहळू आपल्यातही स्फुरित होण्यास सुरुवात होते. अत्यंत संतुलित विचारांचं हे व्यक्तिमत्त्व म्हणजे साक्षात विष्णुशक्तीचं अवतरण होतं. उत्तम राजा, उत्तम पुत्र, उत्तम पती, उत्तम शिष्य, उत्तम भाऊ अशा सर्वोत्तम गुणांचं दर्शन आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या रूपाने घडतं. ह्या शक्तीने जेवढी उत्तम अवस्था गाठली, तशी स्मरणकर्त्यालाही ती निश्चितपणे प्राप्त होऊ शकते. ही शक्ती मृत्यूसमयी विशेष मदतीला येऊ शकते. रामनामाचा ध्यास घेतेलेले अनेक संत-सत्पुरुष भारत देशात होऊन गेले. तुळशीदास, संत कबीर, संत सूरदास ह्यासारख्या रामाचे नाव घेतलेल्या संतांना घातलेलं साकडं म्हणजे साक्षात त्या रामशक्तीला घातलेल्या हाकेपेक्षाही कांकणभर अधिक श्रेष्ठ ठरू शकेल.”

ह्यानंतर श्रीसद्गुरुंनी श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या “सदा रामचंद्रं भजे‌‍हं” ह्या स्तोत्राचं पठण करून त्याचा अर्थही विशद केला आणि भक्तांकडून हे स्तोत्र एकत्रितपणे म्हणून घेतलं.
त्यानंतर दिवसभर रामरक्षेची आवर्तनं पूर्ण झाल्यांनंतर पूर्णाहुती व आशीर्वाद मंत्राने यज्ञ सोहळ्याची सांगता करण्यात आली.

श्री यज्ञ - यज्ञ क्र.३६४ (रविवार दि.१२ मार्च २०१७)
दिनांक १२ मार्च २०१७ रोजी दरमहा यज्ञ संकल्पानुसार परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी प्रणित सामूहिक यज्ञ संपन्न झाला. ह्या दिवशी असलेल्या होळी पौर्णिमेचं निमित्त साधून श्री यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. पूज्य आईंच्या उपस्थितीत यजमानांनी सौर शक्ती ग्रहण करून यज्ञ प्रज्वलन केल्यानंतर आवाहन मंत्रांचं उच्चारण करून सर्व यज्ञीय देवतांना निमंत्रण देण्यात आलं. श्रद्धासूक्त, पुरुषसूक्त ह्यांचं पठण झाल्यांनतर श्री सूक्ताच्या आवर्तनांना सुरुवात करण्यात आली.

सकाळच्या सत्रात श्री मानसपूजा झाल्यांनतर सर्वांनी श्रीसद्गुरुंच्या ध्वनिमुद्रित विवेचनाचा लाभ घेतला. हे विवेचन परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी ह्यांनी दिनांक १२ ते १४ नोव्हेंबर २००६ मध्ये बदलापूर येथेच घेतलेल्या तीन दिवसीय श्री यज्ञावेळी केलं होतं.

समृद्ध जीवनासाठी श्री :
मनुष्य अहर्निश सुखाचा शोध घेत असतो. पण ज्या गोष्टींच्या तो मागे लागतो, त्या गोष्टी त्याला कायमस्वरूपी शाश्वत सुख कधीच देऊ शकत नाहीत. तो भक्ती करतानासुद्धा त्या अशाश्वताचीच मागणी करत असतो. आपण चिरंतन सुखासाठी पुण्य मिळवायचं की अशाश्वतासाठी ते खर्ची घालायचं हे त्याला कळत नाही. प्राचीन काळी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारच्या ‘श्री’प्राप्तीचा विचार करण्यात आला. त्यामागे अशी भूमिका होती की, समृद्ध जीवन लाभलं, तर शाश्वताच्या मागे लागता येतं. ह्या विचारांनुसार ‘श्री’सूक्ताची रचना प्राचीन काळी करण्यात आली. ‘श्री’प्राप्ती कोणत्या पायऱ्यानी प्राप्त होऊ शकते, त्याचाही विचार करायला पाहिजे.

सांघिक/एकत्रित साधना: लक्ष्मी पूजा ही एकट्याने करणं कधीच अपेक्षित नव्हतं, तर ती संघपूजा म्हणूनच करणं अपेक्षित आहे. व्यक्तिगत साधनेमध्ये शक्ती निर्मिती होत नाही, पण एकत्रित साधनेमध्ये प्रचंड शक्ती निर्मितीची बीजं असतात. ज्या दिवशी मी आणि माझं कुटुंब ह्या मध्ये हिंदू समाज बंदिस्त झाला, तेव्हापासून अधोगतीला सुरुवात झाली. ह्या बंदिस्तपणामुळे ना व्यक्तीला शक्ती मिळाली, ना समाजाला ! हिंदू समाज सोडून बाकी सर्व समाजाचं बलस्थान आहे, एकत्रित साधना ! “ज्या प्रमाणात समाजाला मिळेल त्या प्रमाणात मला मिळणारच”, ही भावना ठेवा. जोपर्यंत फक्त मी आणि माझं कुटुंब ही भावना केवळ जोर धरून आहे, तोपर्यंत हा समाज असाच राहणार. समुदायाने केलेल्या मंत्रसाधनेमुळे व्यक्तीगत उच्चारणाचे दोष नाहीसे होतात, कारण तिथे एकत्रिततेचं बळ मिळतं.
2.निरपेक्ष सत्कर्म: श्रीप्राप्तीची दुसरी अट म्हणजे सतत आपल्या इच्छेचा पाठलाग न करता आपल्याला जो कुठला उपाय सांगितला आहे तो करत राहणं.
३. प्रयत्न आणि शांती ह्यांची जोड: सत्कर्म करत असताना संकटाचा कितीही मोठा डोंगर कोसळला तरी दोलायमान न होता शांत राहणे. संकटाशी सामना तुमचा तुम्हीच करायचा आहे, पण त्यासाठी गुरुतत्त्व सतत तुमच्या सोबत राहणार आहे.
४. एकाग्रता: एकाग्रता म्हणजे एका टोकावर मनाच्या सर्व भावना एकत्र आणणे. एकाग्रता होत नाही हा आपलाच दोष असतो. विषयांकडे सतत ओढलं जाणारं मन अध्यात्मात एकाग्र होऊ शकत नाही.वस्तुतः एकाग्रतेमुळे आपण सर्व इंद्रिय एकाचवेळी बंद करू शकतो. ते कौशल्य आपल्या मनाकडे नक्की असतं. एकाग्रता घराच्या घरी,सगळ्या सांसारिक कोलाहालात मिळवणं सुरुवातीच्या काळात तरी थोडंसं कठीण असतं, त्यासाठी निसर्ग सान्निध्यात एकत्र येऊन साधना करणं गरजेचं आहे.
५. ईश्वराचं नाम/मंत्र: ईश्वराच्या नामामध्ये, मंत्रांमध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की ह्या सगळ्या अटी पाळून जर मंत्र साधना केली तर लक्ष्मीच काय, सर्वस्व प्राप्त होईल! अर्थात त्यासाठी प्रमुख अट आहे त्याग. त्यागाशिवाय काहीच प्राप्त होऊ शकत नाही. “सन्मान, संगतीकरण आणि दान”, ह्या यज्ञसाधनेच्या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपण हा समाज श्रीमान होण्याकरिता ‘श्री’ आराधना करुया.”

दुपारच्या सत्रात जन्मपूर्व संस्कार, बालसंस्कार आणि वैद्यकीय समुपदेशन हे उपक्रम संपन्न झाले. श्रीसूक्त आवर्तनांनंतर नंतर इतर स्तोत्र-मंत्रांचं पठण करून पूर्णाहुती संपन्न झाली आणि गुरुआशीर्वादाने यज्ञाची सांगता झाली.

रुद्र स्वाहाकार -यज्ञ क्र.३६३ (शुक्रवार दि.२४फेब्रुवारी,२०१७)
दिनांक २४ फेब्रुवारी २०१७ रोजी महाशिवरात्रीचे औचित्य साधून सामूहिक रुद्र स्वाहाकार संपन्न झाला. परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी ह्यांच्या प्रेरणेने आणि पूज्य आईंच्या उपस्थितीत गायत्री मंत्रपठणासह यज्ञ प्रज्वलन झाले. श्रद्धासूक्त आणि सौरसूक्त ह्यांचे पठण झाल्यानंतर उपस्थितांनी रुद्र सूक्ताच्या सामूहिक आवर्तनांना आणि हवनाला सुरुवात केली. प्रथम सत्रात सर्वांनी मनोभावे शिवमानसपूजा केली.

ह्यानंतर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी ह्यांच्या संकल्पनेवर आधारित असलेल्या “तुका नावाचा खेळिया” ह्या सांगितिक कार्यक्रमाची घोषणा झाली. हा कार्यक्रम शारदा संगीत आणि कला अकादमी (रजि.), बदलापूर व कलांगण, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर येथे दिनांक १८ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता, कुळगाव शाळा नं १, गांधी चौक, मराठी शाळेचे मैदान, बदलापूर पूर्व येथे नियोजित करण्यात आला आहे. ह्या कार्यक्रमात सद्गरु श्री बापट गुरुजींनी त्यांच्या अखेरच्या विवेचनांमध्ये ज्यावर विवरण केले आहे, असे संत तुकाराम महाराजांचे काही अप्रचलित अभंग मान्यवर गायकांकडून सादर केले जाणार आहेत.

तद्नंतर श्रीगुरुदेवांच्या ध्वनिमुद्रित विवेचनाचा लाभ उपस्थित भक्तांनी घेतला. विवेचनाचा सारांश असा,
“रुद्रशक्ती-
रुद्रशक्ती ही वेदकालापासून अतिशय प्रभावी समजली जाते. रुद्रसूक्ताची लाखो आवर्तनं आजवर ह्या देशात झाली. वैद्न्यानिक सिद्धांत असं सांगतो की ह्या शक्तीलहरी वातावरणात साठून राहतात आणि नव्याने ती शक्ती ग्रहण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला त्या मिळतात. उपनिषदापैकी जाबालोपनिषदामध्ये ह्या रुद्रशक्तीवर भाष्य केलेलं आढळतं. महर्षी जाबालांचं मूळ नाव त्यांच्या आईच्या ‘जाबाली’ ह्या नावावरून पडलं होतं . हा दासीपुत्र होता, ज्याला आपल्या पित्याचं नावही माहीत नव्हतं. त्याची सचोटी आणि ज्ञानाची दुर्दम्य इच्छा पाहून गौतम ऋषींनी त्याला शिष्य म्हणून त्याचा स्वीकार केला. निसर्गाच्या सान्निध्यात राहून विशिष्ट काळात १०० गायींच्या जेव्हा ह्याने १००० गायी निर्माण केल्या, तेव्हा गौतम ऋषींनी त्याचं कर्तृत्त्व, त्याग पाहून ह्या सत्यकामाला अनुग्रह दिला. जाबाली दासीचा पुत्र म्हणून पुढील काळात जाबाल महर्षी म्हणून ते ओळखले जाऊ लागले. मूळ ऋग्वेदातल्या रुद्र सूक्तावर ह्यांनी पुढे भाष्य केलं. विश्वाचं हे विराट महाकाव्य अतिशय प्रभावी आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या परस्परविरोधाला नमस्कार केला आहे. जसा सावाला नमस्कार केलाय तसाच चोरालासुद्धा नमस्कार केलाय. जसा क्षुल्लकाला नमस्कार केलाय तसाच महानालाही नमस्कार केलाय. ह्या सर्व परस्परविरोधी गोष्टींमधलं मूळ तत्त्व एकच आहे. ह्यातून स्वतःचं क्षुल्लकत्व स्वीकारून ईश्वरी शक्तीचं सामर्थ्य आपल्या लक्षात येऊ शकतं. सर्व शक्तींना नमस्कार असलेलं नमक झाल्यावर मग मागण्यांचं चमक आहे. ‘च मे’ म्हणजे आम्हाला दे. ही सामूहिक मनाची मागणी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनातल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत वासनांची पुटं जळत नाहीत. त्यामुळे त्या मागण्या पूर्ण तरी झाल्या पाहिजेत किंवा त्यातला फोलपणा लक्षात आला पाहिजे. तपाचरणाने आपल्या मागण्या क्षुल्लक आहेत हे समजण्याची अवस्था मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक आहे. मला काही नको, मी म्हणजेच वैश्विक शक्ती आहे हा प्रवास रुद्राद्वारे घडतो. जितकी आवर्तनं होतात तितकं सामर्थ्य वाढतं. जसं आयुर्वेदातली औषधं घोटून त्यांचं सामर्थ्य वाढतं आणि होमीओपॅथीमध्ये जेवढ सूक्ष्म तेवढं’भव्य' समजलं जातं, तसंच रुद्र-आराधनेने मनाची सूक्ष्म ताकद वाढत जाते आणि संकल्प दृढ होत जातो. यज्ञसाधनेचा संकल्प सुरुवातीला मोठा वाटेल पण हळूहळू मुंगीच्या पावलांनी वाटचाल केली की, आपण संकल्पाच्या डोंगरावर उभे राहू शकतो. हा संकल्प पूर्णत्वाला जाण्याची शक्ती आपण रुद्राकडे मागूया. जाबालाचा सत्यकाम झाला, कारण तो गुरु-आज्ञेप्रती निःशंक होऊन पुढे गेला. तसाच डळमळीत न होणारा संकल्प आपण करुया.”
सामूहिक रुद्र्पठण झाल्यावर पूर्णाहुती होऊन यज्ञाची सांगता आशीर्वाद मंत्राने करण्यात आली. उपस्थित सर्व भक्तांनी श्रीगुरुपादुका आणि पूज्य आईंचे दर्शन घेतले.

गायत्री यज्ञ -यज्ञ क्र.३६२ (रविवार,दिनांक १२फेब्रुवारी,२०१७)-
दिनांक १२ फेब्रुवारी २०१७ रोजी संकल्पित दरमहा गायत्री यज्ञाची पूर्तता गायत्री गार्डन, बदलापूर ह्या यज्ञस्थळी संपन्न झाली. परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी ह्यांच्या प्रेरणेने आणि पूज्य आईंच्या उपास्थितीत गायत्री मंत्र पठणासह यज्ञ प्रज्वलन झाले. श्रध्दा सूक्त आणि सौर सूक्त ह्यांचे पठण झाल्यानंतर उपस्थितांनी गायत्री मंत्राच्या सामूहिक आवर्तनांना आणि हवनाला सुरुवात केली. प्रथम सत्रात श्री गायत्री षोडशोपचार मानसपूजा सर्वांनी मनोभावे केली.

ह्यानंतर श्री यशोधन बापट ह्यांनी परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी ह्यांच्या संकल्पनेवर आधारित असलेल्या “तुका नावाचा खेळिया” ह्या सांगितिक कार्यक्रमाची घोषणा केली. हा कार्यक्रम शारदा संगीत आणि कला अकादमी (रजि.), बदलापूर व कलांगण, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर येथे दिनांक १८ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता, कुळगाव शाळा नं १, गांधी चौक, मराठी शाळेचे मैदान, बदलापूर पूर्व येथे आयोजित आहे. ह्या कार्यक्रमात सद्गरु श्री बापट गुरुजींनी त्यांच्या अखेरच्या विवेचनांमध्ये ज्यावर विवरण केले आहे असे संत तुकाराम महाराजांचे काही अप्रचलित अभंग मान्यवर गायकांकडून सादर केले जाणार आहेत.

तद्नंतर श्रीगुरुदेवांच्या ध्वनिमुद्रित विवेचनाचा लाभ उपस्थित भक्तांनी घेतला. विवेचनाचा सारांश असा,

“ गायत्री मंत्र विज्ञान आणि अध्यात्म:

ह्या भारत वर्षामध्ये प्राचीन काळापासून जन्म-मृत्यू, सुख-दुःख ह्या चक्रातून सुटण्याविषयीचं फार मोठं संशोधन झालं आहे. सहा दर्शनांपैकी महर्षी कणाद ह्यांनी रचलेल्या वैशेषिक दर्शनामध्ये काही विशेष सिद्धांत मांडले आहेत. हे संपूर्ण निरीश्वरवादी दर्शन आहे. ह्यातलं प्रमुख प्रतिपादन म्हणजे, “अणु-रेणूंचा संघातरुपी भाव म्हणजे जीवन तर अणु-रेणूंचा विघातरुपी अभाव म्हणजे मरण’. ह्या व्याख्येनुसार ह्या विश्वात निर्जीव असं काहीच नाही. आधुनिक भौतिक शास्त्रानुसारदेखील सगळीकडे अणु-रेणू भरले आहेत आणि त्यांचं सांघिक चलनवलन सुरू आहे. ह्या सर्वांचं तात्पर्य असं निघतं की कर्म नियम, निसर्ग नियमांनुसारच हे अणु-रेणू एकत्र आले आहेत. त्या संघाचा जो संकल्प असतो तशी त्याला गती मिळते. ह्याचाच अर्थ असा की, प्रगतीचा संकल्प जर करायचा असेल तर तो संदेश प्रत्येक मूल कणापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. खरी प्रगती म्हणजे जीवन मृत्यूच्या चक्रातून सुटणे. जर प्रत्येक कणाचा निर्णय झाला की, आता मला ह्या संसारचक्रात अडकायचं नाही, तरच त्या दिशेने वाटचाल सुरू होईल. ह्या निश्चयाची सर्वात मोठी आणि सर्वोच्च प्रभावी प्रार्थना म्हणजे गायत्री मंत्र. विश्वातल्या सविता नामक उर्जेच्या मूळ स्रोताला केलेली ही प्रार्थना आहे. त्रिपदा गायत्री मध्ये ८ अक्षरांचे तीन पाद आहेत. ह्या सामर्थ्यशाली मंत्राचा अनेकांना अनुभव आहे. प्रत्यक्ष समर्थ रामदासांनी आपलं विश्वकल्याणाचं कार्य सुरू करण्याआधी गायत्रीचं पुरश्चरण केलं होतं. हा मंत्र विश्वामित्रांसह एकूण २४ ऋषींनी रचला असं इतिहास सांगतो. ह्या समूहातील प्रत्येकाने रचलेल्या एकेक अक्षराचा मिळून जो चोवीस अक्षरी मंत्र निर्माण झाला, तो म्हणजे गायत्री मंत्र. ह्यातल्या सर्वात प्रभावी अक्षराची, अर्थात ‘ण्यं’ ह्या अक्षराची रचना महर्षी विश्वामित्रांनी केली. महर्षी विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झालेल्या ह्या मंत्राचं कर्तुत्व म्हणूनच महर्षी विश्वामित्रांना दिलं जातं. जगातल्या प्रत्येकाला तारण्याचं सामर्थ्य ह्या मंत्रामध्ये आहे. पण त्यासाठी अगोदर कर्मनिष्कृती व्हायला हवी. त्यासाठी मंत्रसाधने बरोबरच दैनंदिन जीवनामध्ये नव्याने निर्माण होणारी कर्मदेखील अलिप्तपणे केली गेली पाहिजेत. विशेष म्हणजे ह्या मंत्राला एकत्रिततेची पूर्वअट आहे. समूहाने जेव्हा जेव्हा साधना करू,तेव्हा तेव्हा ती निश्चितपणे साध्यापर्यंत पोहोचवते. विशेषतः यज्ञासमोर केलेल्या सामूहिक आवर्तनांना विशेष महत्त्व आहे.”
दुपारच्या सत्रात जन्मपूर्व संस्कार, वैद्यकीय समुपदेशन, बालसंस्कार असे दरमहा नियोजित उपक्रम संपन्न झाले. त्यानंतर नुकत्याच होऊन गेलेल्या गुरुप्रतिपदेनिमित्त सर्वांनी श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी रचलेल्या विविध स्तोत्रांचं पठण आणि हवन केलं. संध्याकाळी पूर्णाहुती होऊन सर्वांनी आशीर्वादाचं ग्रहण केलं.

श्रीमहाविष्णुयज्ञ-यज्ञ क्र.३६१(रविवार,दिनांक ८ जानेवारी २०१७)-
दिनांक ८ जानेवारी २०१७ रोजी पौष शुद्ध स्मार्त एकादशी निमित्त, विष्णुयज्ञ ह्या संकल्पित यज्ञाची पूर्तता गायत्री गार्डन, बदलापूर ह्या नियोजित स्थळी झाली. परम पूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी ह्यांच्या प्रेरणेने आणि पूज्य आईंच्या उपास्थितीत गायत्री मंत्र पठणासह यज्ञ प्रज्वलन संपन्न झाले. श्रद्धा सूक्त, पुरुषसूक्त, लक्ष्मीसूक्त, श्रीसूक्त झाल्यानंतर उपस्थितांनी श्रीविष्णुसहस्रनाम सामूहिक आवर्तनांना आणि हवनाला सुरुवात केली. प्रथम सत्रात जगन्नियंता विश्वपालक असलेल्या महाविष्णुंची मानसपूजा सर्वांनी मनोभावे, षोडशोपचारे केली.
ह्यानंतर प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित श्रीगुरुस्तुती स्तोत्रावर आधारित असलेल्या श्री सद्गुरुंच्या “श्रीगुरुस्तुति : संपूर्ण अर्थ आणि विवरण”, ह्या ग्रंथाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन पूज्य आईंच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यानंतर श्रीगुरुदेवांच्या ध्वनिमुद्रित विवेचनाचा लाभ उपस्थित भक्तांनी घेतला. विवेचनाचा सारांश असा,

“ एकादशी व्रतामागील ज्ञान आणि अध्यात्म : वृ ह्या धातूपासून व्रत हा शब्द निर्माण झाला. ह्याचा अर्थ संकल्प/आज्ञापालन किंवा प्रतिज्ञा. एकादशी हे व्रत प्रमुख २४ व्रतांपैकी एक आहे. ह्यादिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. उपवासाने शरीर हलकं पण चिवट होतं. पण उपवास ह्या शब्दाचा खरा अर्थ, आपल्या उपास्य देवतेपाशी निवास करणं. कोणत्याही व्रतामागे भौतिक सुखप्राप्ती हा प्रमुख उद्देश असतो पण त्याबरोबर असाही उद्देश असतो की, त्या नियमावलीचं आचरण करता करता हळूहळू वैराग्य प्राप्ती होऊन, मोक्षाचा प्रवास सुखकर होईल. कोणत्याही व्रताचा प्रमुख उद्देश म्हणजे पापनाश. त्यासाठी एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त सत्कर्म करणं अपेक्षित आहे. ध्यान, हवन, पूजन, स्तोत्रपठण असं एकत्र येऊन केल्यामुळे चित्तशुद्धी होऊन सामाजिक एकोपा वाढीस लागतो. व्रतपालनामुळे प्रवृत्ती आणि निवृत्ती अशी दोन्ही साध्य साधता येतात. ह्यामध्ये गुरु आज्ञा आणि शास्त्र आज्ञेचं पालन अपेक्षित आहे. एकादशी व्रतामधली प्रमुख देवता म्हणजे महाविष्णू. विष्णू म्हणजे सतत क्रियाशील राहणारं तत्त्व. सगळ्याला व्यापून उरणारा महाविष्णु शेषावर आरूढ आहे. शेष म्हणजे गणितातली बाकी. विश्वाला भागून उरलेल्या शेषावरही ज्याचा अंमल चालतो तो विष्णू! ह्या शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे “विशेष अणु”, अर्थात जो चराचराला व्यापून आहे तो विष्णू. त्याला जर आपण एकादशी निमित्ताने यज्ञ माध्यमातून संदेश पाठवला तर तो संदेश विश्वाच्या कणाकणात पोहोचतो. महाविष्णुंचे गुण म्हणजे ज्ञान, शक्ती, सूक्ष्मता/व्यापकता/बल, ऐश्वर्य,तेज,वीर्य-शौर्य,संशील्य, वात्सल्य,समत्त्व,करुणा,स्थिरता,धैर्य,माधुर्य. विष्णूतत्त्वा बरोबर केलेल्या ‘उपवासाने’ आपण हे सगळे गुण आत्मसात करू शकतो, नव्हे हेच त्या व्रताचं खरं फळ आहे. तेव्हा भवसागरातून पार नेण्यासाठी आपण त्या विष्णुतत्त्वाला भावपूर्ण आर्ततेने साद घालूया”.

दुपारच्या सत्रात जन्मपूर्व संस्कार, वैद्यकीय समुपदेशन, बालसंस्कार असे उपक्रम संपन्न झाले. संध्याकाळी पूर्णाहुती होऊन सर्वांनी आशीर्वादाचे ग्रहण केले.

 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी