प.पू.सदगुरू श्री.बापट गुरुजी लिखित साहित्य

Bapat Gurujiविचारें मना तुंचि शोधूनि पाहें :आपल्याकडे एक दंतकथा सांगितली जाते. एकदा व्यासमुनी विशेष पर्वानिमित्त भल्या पहाटे गंगेच्या किनारी स्नानासाठी गेले. आपला दंड, कमंडलू आणि इतर काही साहित्य त्यांनी गंगाकिनारी काढून ठेवलं. आता स्नानासाठी पाण्यात उतरणार, तोच त्यांच्या मनात आलं, की ‘इथे एवढ्यात बऱ्याच व्यक्ती, साधू स्नानासाठी येतील, मग त्यांच्या वस्तू कोणत्या आणि आपल्या कोणत्या, हे आपल्याला कसं बरं समजणार?’ त्यावर उपाय म्हणून त्यांनी तिथे एक छोटा खड्डा केला आणि त्यात त्या वस्तू पुरून ठेवल्या. पण आता आपल्या वस्तू आपण कुठे पुरून ठेवल्या आहेत, हे कसं ओळखणार? मग त्यांनी त्या जागी खुणेसाठी एक छोटं शिवलिंग तयार केलं आणि निश्चिंत मनाने ते स्नानासाठी पाण्यात उतरले. पुढे वाचा...

Bapat Gurujiयज्ञ रहस्य :वैदिक धर्माचा सार्थ अभिमान असला, तरी या पुस्तिकेचा हेतू मात्र धर्मप्रचार नाही. कारण समत्वाची शिकवण देणाऱ्या प्रकाशशक्तीची ही साधना संपूर्ण मानवजातीसाठी आहे. केवल यज्ञसाधनेबाबतची सांप्रतची मानसिकता बदलावी, धर्म-जात-पात-लिंग भेद राहित्याने तिची उपयोगिता सर्वांना समजावी, तिच्याबद्दलचे अपसमज दूर व्हावेत, जेणेकरून हे प्राचीन गतवैभव आपल्या अभ्युदयासाठी समाजाने पुन्हा अंगिकारावे ही अभिलाषा मनात बाळगून, यज्ञसाधनेचे आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले विचारमंथन व त्याचे तात्पर्यस्वरूप निष्कर्ष प्रस्तुत पुस्तकाद्वारे मांडले आहेत. यामागे अर्थातच ज्ञात व अज्ञात, व्यक्ती आणि शक्ती यांची प्रेरणा आहे. पुढे वाचा...

संतोपदेशनमो गुरवे वासुदेवाय : मंत्र आणि यंत्र साधना: हिंदू संस्कृतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिला असलेलं वैविध्यतेचं वरदान. अज्ञान मूलक अशा भ्रामक समजूतीमुळे आणि अर्धवट ज्ञानामुळे कधी कधी हेच वरदान विवादाचं कारण बनतं आणि मग त्यातून "आपल्याकडे देवच मुळी ३३ कोटी असल्याने इतर धर्मांमध्ये दिसतो तसा आपल्या हिंदू धर्मात एक संधपणा राहिलेला नाही" अशी विधानं केली जातात. वस्तुतः आपल्या संस्कृती इतकी तत्त्वज्ञानाने समृद्ध असलेली संस्कृती जगाच्या पाठीवर कोठेही नाही. तिला समजून घेण्यासाठी आवश्यकता आहे, ती केवळ योग्य दृष्टिकोनाची. आपल्याकडे सांगितलेले ३३ कोटी देव सुद्धा वेदांमध्ये सांगितलेल्या वसु, रुद्र, आदित्य इत्यादींचे कार्यभेदाने निर्माण झालेले शक्तिप्रकार आहेत. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या आवश्यकते प्रमाणे त्याला उपासना मिळावी, म्हणून आपल्या पूर्वसूरींनी उदार धोरण ठेवून शक्तिप्रकारांची तेवढी प्रतीकं निर्माण केली आणि समाजापुढे त्याच्या ऐहिक आणि पारलौकिक कल्याणासाठी ठेवली. त्या सर्व प्रतीकांमागील 'अनेकांतील एकत्व' पाहण्याचा दृष्टिकोन जर ठेवला, तर आपल्या संस्कृतीतल्या विचार वैविध्याचा निश्चितपणे उलगडा होईल.  पुढे वाचा...

चित्तसद्‍बोध नक्षत्रमालाचित्तसद्‍बोध नक्षत्रमाला : संपूर्ण अर्थ आणि विवेचन: भारतीय तत्त्वज्ञानाने सांगितलेला एक फार मोठा सिद्धांत म्हणजे ब्रह्मांडी ते पिंडी आणि पिंडी ते ब्रह्मांडी. आधुनिक विज्ञानाला अणुसंरचनेचा आणि मानवी देहातल्या प्लेक्ससचा पत्ता लागायच्या अगोदर प्राचीन भारतीय धुरीणांनी मांडलेला हा सिद्धांत आहे. ह्या सिद्धांताची प्रत्यक्ष अनुभूती ज्यांनी ज्यांनी घेतली, ते ते त्या वैश्विक शक्तीशी एकरूप होऊ शकले आणि त्यांच्या मुखातून स्रवलेले उपदेश आज अजरामर झाले आहेत. त्या तत्त्वज्ञानाचा प्रत्यय देणारं प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं हे प्रस्तुत स्तोत्र चित्तसद्बोधनक्षत्रमाला. स्वामी महाराजांनी गुरुपदावरून केलेलं सामान्यजनांचं हे अवलोकन आहे. कुठल्याही पातळीवरच्या मनुष्याच्या चित्तातली चलबिचल टिपण्याचं कौशल्य असलेल्या महापुरुषाचे त्यांच्या उत्तरायुष्यातले हे उद्गार आहेत एवढं समजलं, तरी ह्या स्तोत्रात सांगितलेल्या उपदेशाचं महत्त्व आपल्या अंतःकरणात ठसू शकेल.  पुढे वाचा...

Bapat Gurujiकरुणात्रिपदी : संपूर्ण जीवजगत ज्या नियमचक्राला बांधलेलं असतं, ती ही कर्मगती मोठी विलक्षण असते. कर्माची ही गती खरोखरच कोणाला समजत नाही. पूर्वजन्मांत कधीतरी निर्माण केलेली गती आज विस्मृतीत गेली, तरी तिचे परिणाम शिल्लक राहतात आणि त्या गतीच्या प्रतिक्रिया भोगताना पुन्हा ज्या काही क्रिया घडतात, त्यांची सुद्धा गती निर्माण होते आणि तेही परिणाम भोगायला लागतात, म्हणूनच ‘कर्मणो गहना गति:’ हे भगवान श्रीकृष्णाचे शब्द अगदी नि:संदिग्ध आणि सार्थ आहेत. अशा वेळी प्रत्येक मनुष्याच्या हाती एकच स्वातंत्र्य असतं, भविष्य सुधारण्यासाठी सत्कर्म करत राहणं आणि वर्तमानातील भोगगती सुसह्य व्हावी म्हणून व्यक्तिगत अहंकार सोडून देऊन सदगुरुतत्वाला प्रार्थना करत राहणं. कृतकर्माच्या पश्चात्तापासह जेव्हा आपल्या मनात स्वतःबद्दलची करुणा उद्भवते, तेव्हा तीच करुणा कृपेचं रूप घेऊन सदगुरुतत्वातही प्रकटते.  पुढे वाचा...

श्रीदत्तात्रेयस्त्रोत्रश्रीदत्तात्रेयस्तोत्र स्तोत्र – संपूर्ण अर्थ व विवेचन : परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज ह्या दत्तरूपच झालेल्या संन्यस्त सत्पुरुषाचे फार मोठे ऋण दत्त संप्रदायावर आहे. "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" ह्या महामंत्राचा निर्माता असणा-या श्री स्वामी महाराजांच्या जीवनकार्याचा स्थायीभाव म्हणजे जाज्वल्य दत्तभक्ती. साहजिकच त्यांच्या संस्कृत आणि प्राकृत अशा सर्व वाड्मयात दत्त विषयक स्तोत्रे आणि ग्रंथ विपुल प्रमाणात आढळतात. अशा काही स्तोत्रांपैकी एक प्रमुख स्तोत्ररत्न म्हणजे भगवान दत्तात्रयांच्या गुण-कर्म वैशिष्ठ्यांचे वर्णन करणारे हे दत्तात्रेयस्तोत्र. सतत काही ना काहीतरी मागणी करीत राहणे, हा वस्तुतः मानवी स्वभाव आहे. प्रगतीच्या दृष्टीकोनातून विचार करता तो गैर नसला तरी गुरुशक्ती सारखा सर्वश्रेष्ठ दाता सामोरा आला असता काय मागावे, याचे तारतम्य असणेही साधक भक्तासाठी गरजेचे असते. नेमका हाच धागा पकडून स्वामी महाराजांनी ही स्तोत्ररचना केली आहे. पुढे वाचा...
Bapat Gurujiअघोरकष्टोद्धरण स्तोत्र – संपूर्ण अर्थ व विवेचन : जीवन म्हणजे सततचा संघर्ष. आयुष्यात प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळतंच असं नाही. कित्येकदा ठरवतो एक आणि होतं दुसरंच. तर कधी काही कल्पना नसताना समस्या उभ्या राहतात. काय करावं, सुचेनासं होतं. मन सैरभैर होतं आणि आधार शोधू लागतं. अशा वेळी निश्चित सुचवावसं वाटतं की, श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या या अघोरकष्टोद्धरणस्तोत्राचा आश्रय घ्यावा. या स्तोत्राच्या आवर्तनाने आत्मविश्वास निश्‍चितपणे वाढतो आणि संकटाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आपोआप मिळतं. विश्वातील अनेक ज्ञात व अज्ञात व्यक्ति आणि शक्ति यांच्या प्रेरणेनुसार या स्तोत्रावर, खोपोली येथील स्थानी मी विवेचन केलं होतं. पुढे वाचा...

Bapat Gurujiश्रीगुरुस्तुति – संपूर्ण अर्थ व विवेचन : अध्यात्मिक पायवाट चालू इच्छिणा-या सामान्य मनुष्याच्या मनात मुळातूनच एक गोंधळ असतो - 'सगुण कि निर्गुण ? द्वैत कि अद्वैत ?' भारतीय आध्यात्मिक तत्वज्ञान निर्गुण तत्वाचा उपदेश करते, मात्र सदैव प्रतीतीस येते ते द्वैतात्मक सगुण विश्व. याच कारणामुळे मनुष्याच्या बुद्धीत विक्षेप निर्माण होतो. वस्तुतः सगुण आणि निर्गुण ही तत्वे एकमेकांविरुद्ध नाहीत. निर्गुणाचा स्वीकार करताना, सगुणाचा त्याग अपेक्षित नाही व ते हिताचेही नाही. त्यांच्यातील परस्पर संबंधाला अनुसरून, निर्गुण तत्वाचा पुरस्कार करणारे उपनिषदातील तत्वज्ञान आणि सामान्य मनुष्याच्या अध्यात्मिक जीवनात त्याला आवश्यक असणारी सगुणोपासना यांचा उत्तम समन्वय श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांच्या 'श्री गुरुस्तुति' या स्तोत्रात आहे.

पुढे वाचा...

संतोपदेशसंतोपदेश (भाग १ ते ५): आध्यात्मातल्या अनेक गूढ आणि गुह्य विषयांची उकल सहज-सोप्या शब्दात करून, सामान्यातल्या सामान्य साधकापर्यंत तो संदेश अचूकपणे पोहोचविण्याची विलक्षण किमया श्री परम पूज्य बापट गुरुजींच्या विवेचनांमध्ये असते. परम पूज्य श्री गुरुजींनी विविध प्रसंगी भक्तांच्या ज्ञानवर्धनासाठी घेतलेली शेकडो अभ्यासपूर्ण विवेचनं आजही उपस्थित श्रोतृवृंदाच्या चिरस्मरणात आहेत. या विवेचनांवर आधारित असलेले लेख, पुण्याच्या "संतकृपा" या दर्जेदार आणि मूल्याधिष्ठित आध्यात्मिक मासिकांतून, "संतोपदेश" या सदराखाली सन २००९ पासून प्रसिद्ध होत आहेत. भक्तांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी उपयुक्त असणारं हे श्रेष्ठ विचारधन अधिकाधिक साधकांपर्यंत पोहोचावं या सद्हेगतूने प्रस्तुत पंचवीस लेख "संतोपदेश" या पुस्तिका-मालिकेद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. या मालिकेत, "वर्तमान एक संधिकाल", "ज्ञानदीप उजळू दे", "सुखाचा शोध", "गुरु तोचि देव", आणि "साधना मार्ग प्रदीप" अशा पाच पुस्तिकांचा समावेश आहे. संतकृपाचे प्रतिभावंत संपादक श्री भारवि खरे यांनी या पुस्तिकांना अत्यंत समर्पक आणि यथोचित अशा प्रस्तावना दिल्या आहेत. या मालिकेतील प्रथम पुष्प म्हणजे "वर्तमान एक संधिकाल" या पुस्तिकेत एकंदर पाच लेखांचा समावेश आहे. कर्मगतीच्या जीवनरूपी चक्रव्यूहात अडकल्यामुळे भांबावून गेलेल्या प्रत्येक मनुष्याला या पुस्तिकेच्या वाचनाने अनमोल मार्गदर्शन मिळेल असा विश्वास वाटतो. पुढे वाचा...

Bapat Gurujiश्रेष्ठ मंत्रशक्ती : भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे संपूर्ण विश्वाचा प्रवास समतेकडे होत आहे आणि प्रत्येक मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे ही संपूर्ण समता स्थापन करणे हेच आहे. त्याकरिता ज्यात परम अर्थ आहे,अशा त्या परमार्थात स्वकल्याण साधून घेणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य ठरते. प्रत्येक मानवाला आपले अंतिम हित साधण्यासाठी योग्य तो मार्ग आणि साधना उपलब्ध करून देणे, हेच अध्यात्माचे लक्ष्य आहे. जगातील अतिशय प्राचीन समजल्या जाणार्‍या आपल्या भारतीय संस्कृतीने मानवाला काही विशेष देणग्या दिल्या आहेत. मंत्रशक्ती आणि यज्ञशक्ती या त्यातीलच काही वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वपूर्ण म्हणाव्या अशा देणग्या !

पुढे वाचा...

Bapat Gurujiनर्मदा नित्यपाठ : पुण्यजला मोक्षदायिनी श्री नर्मदेची परिक्रमा म्हणजे अध्यात्मातल्या प्रत्येक साधकासाठी एक दुर्मिळ, अलभ्य पर्वणी आहे. ’यज्ञ’ हे एक श्रेष्ठ वरदान असून, त्याची पुनर्स्थापना व्हावी आणि त्याचा लाभ सर्व समाजाला मिळावा या उद्देशाने अहर्निश कार्य करणारे, आमचे स्फूर्तीस्थान परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नोव्हेंबर - डिसेंबर २०११ या कालावधीमध्ये प्रकाश ज्ञान शक्ती केंद्रामार्फत, श्रीनर्मदा परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे. 

पुढे वाचा...

श्रीगंगा गीतावलीश्रीगंगा गीतावली : गंगामाहात्म्य वेदकाळापासून ते पुराणकाळापर्यंत गायले गेले आहे. तिच्या अवतरणाची कथा वाल्मीकि रामायणात विस्ताराने आली आहे. आदिकवी वाल्मीकिंनी केलेली तिची स्तुती, जगन्नाथ पंडितांनी तिच्यावर केलेले समर्पणात्मक गंगालहरी काव्य, आदि शंकराचार्यांनी रचलेले गंगाष्टक आणि गंगास्तोत्र, स्वामी महाराजांनी गुंफलेले मंत्रगर्भ गंगास्तोत्र अशा अनेक उत्तमोत्तम स्तोत्र आणि काव्यांचा समावेश करून चारधाम यात्रेप्रसंगी पठण करण्यासाठी विविध गंगास्तोत्रे, लहरी, नामावली, आरत्या, यमुनाष्टक आणि ध्यानमंत्रांचे संकलन ’श्रीगंगा गीतावली’ या पुस्तिकेद्वारे उपलब्ध करून देताना केंद्राला अतिशय आनंद होतो आहे. प्राचीन काळापासून आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या ’चारधाम-पंचप्रयाग’ या तीर्थस्थळांची यात्रा करण्याचं नियोजन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांची प्रेरणा आणि आमचे स्फूर्तीस्थान परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या आशीर्वादाने माहे सप्टेंबर-ऑक्टोबर २०१२ या कालावधीमध्ये प्रकाश ज्ञान शक्ती केंद्रामार्फत करण्यात आलं होतं. या पुण्य-यात्रेचा समारोप कुरुक्षेत्रावर घेण्यात येणा-या श्रीमद्भगवद्गीता यज्ञाने झाला. प.प. श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि भगवती गंगेचा अनुपमेय स्नेहबंध सर्व वासुदेव भक्तांना ज्ञात आहेच. श्रीदत्तप्रभुंच्या आज्ञेनुसार श्री स्वामी महाराजांनी एकूण सहा चातुर्मास गंगाकिनारी केले. तसेच इ.स. १८९४-९५ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये श्रीमहाराजांनी अत्यंत दुर्गम अशा हिमालय क्षेत्रात पदभ्रमण करत चारधाम-पंचप्रयागांसह इतर महत्त्वाच्या तपस्थलींना भेट दिली आणि श्रीगंगामाईच्या प्रेरणादायी सान्निध्यात अनेक उत्तमोत्तम स्तोत्र-ग्रंथांची निर्मिती केली. दुर्दैवाने या यात्रेचा विस्तृत वृत्तांत आज ज्ञात नाही. पुढे वाचा...काही पुस्तके ऑनलाईन खरेदी करण्यासाठीही उपलब्ध आहेत. तपशीलासाठी येथे क्लिक करा.


सर्व पुस्तके प्राप्त होण्यासाठी संपर्क / पुस्तक विक्रेत्यांचे पत्ते
 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी