श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त : सद्‍गुरुतीर्थ यात्रा
विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही विषय एकत्र अभ्यासले जाऊ शकतात असे प्रतिपादन करणाऱ्या परमपूज्य सद्‍गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी दिनांक १ जानेवारी २०११ रोजी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या खोपोली येथील मूर्तीस्थानावर श्रीनर्मदा परिक्रमेचा संकल्प प्रथमतः जाहीर केला. या नंतर बदलापूर येथे ९ जानेवारी २०११ रोजी आयोजित केलेल्या श्रीगणेश यज्ञात श्रीनर्मदा परिक्रमेच्या संकल्पाचे यज्ञ सन्मुख पुनरुच्चारण त्यांनी केले. थोरले स्वामी महाराज आणि श्रीनर्मदा मैयाच्या कृपाशीर्वादाने श्री गुरुजींच्या मुखातून हा संकल्प घडला मात्र आणि त्या दिवसापासून सर्व गोष्टी अत्यंत वेगाने घडू लागल्या. संकल्पानंतर अवघ्या दहा महिन्यात नोव्हेंबर-डिसेंबर २०११ या कालावधीत ३२० स्त्री-पुरुष भक्तांच्या महासमूहाने श्रीसद्‍गुरुंच्या सान्निध्यात ही परिक्रमा पूर्ण देखील केली! या अद्‍भूत सोहळ्याचे सिंहावलोकन आता आपण करणार आहोत.

परिक्रमा माहात्म्य -
"नर्मदे त्वं महाभागा सर्वपापहरी भव ।
त्वदप्सु या शिला: सर्वा: शिवकल्पा भवन्तु ताः ॥"
पुराणांतल्या उल्लेखाप्रमाणे भगवान शंकरांनी श्रीनर्मदेला तिच्या उत्पत्तीनंतर असं वरदान दिलं की,"हे भाग्यशालिनी नर्मदे, तू सर्व पापांचे हरण करणारी होशील, तुझ्या पाण्यात स्थित असलेले सर्व पाषाण शिवतूल्य होतील". या वरदानानुसार, सर्वात प्राचीन आणि पुण्यदायिनी अशा नर्मदा मातेच्या परिक्रमेला संपूर्ण भारत वर्षात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. परिक्रमा करणं म्हणजे नर्मदामातेला कायम उजवीकडे ठेवून, उगमापासून मुखापर्यंत संपूर्ण प्रदेशात प्रवाहाचं उल्लंघन न करता प्रदक्षिणा पूर्ण करणे. नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याचं खडतर तप प्राचीन काळापासून अत्यंत भक्तीभावाने केलं गेलं आहे. मोक्षदायिनी नर्मदा मैयाच्या किनारी निवास करून गृत्समद ऋषी, भृगु ॠषी, महर्षी कपिलाचार्य, सती अनसूया आणि अत्री महर्षी, भगवान परशुराम या सारख्या अनेक ऋषी-मुनींनी साधना केली आहे. श्रीमद्‍ आद्य शंकराचार्य यांनी त्यांचे सद्‍गुरु असलेल्या गोविंदपादांची सेवा रेवातीरावर केली आणि इथेच त्यांच्या कडून नर्मदा लहरी, नर्मदाष्टकम या प्रसिद्ध स्तोत्रांची रचना झाली असं इतिहास सांगतो. अर्वाचीन काळातही अनेक साधु-संत-संन्यासी सत्पुरुष मैयेच्या किनारी तपानुष्ठान करताना आढळतात. अशा पवित्र तीर्थस्थळाची परिक्रमा तेही प्रत्यक्ष सद्‍गुरुंच्या सान्निध्यात करणं म्हणजे एक अमृतसिद्धी योगच आहे अशी भावना सर्व भक्तांच्या मनात दृढ झाली आणि सद्‍गुरुंच्या मार्गदर्शनाखाली परिक्रमेची तयारी करण्यास सुरुवात झाली.

परिक्रमा पूर्वनियोजन : ’एकत्र या आणि एकत्र साधना करा" या सद्‍गुरु बापट गुरुजींच्या तत्त्वानुसार जात-पात-धर्म-लिंग-वय यापैकी कोणतंही बंधन न घालता श्रद्धेने येणाऱ्या प्रत्येक इच्छुक साधकाला बरोबर घेऊन श्रीनर्मदा मैय्याची सामूहिक परिक्रमा करण्याचा श्री गुरुजींचा मानस होता. ज्ञान, भक्ती आणि कर्म मार्गांचा यथोचित मेळ घालून प्रत्येक सहभागी साधकाला तप, सत्संग आणि सेवा करण्याची संधी निर्माण करणं हा परिक्रमेचा मूळ उद्धेश होता. या उद्देशानुसार नर्मदा किनारीच्या वेगवेगळ्या तपोभूमींवर सामूहिक यज्ञ, नामजप, नामस्मरण, नर्मदा पूजन, दीपदान, कन्यापूजन, पितृकार्य आदि विविध कार्यक्रम मैयातीरी संपन्न झाले पाहिजेत अशी श्रीगुरुजींची आज्ञा होती. यानुसार परिक्रमेमध्ये पुढील आध्यात्मिक संकल्पनांचा अंतर्भाव करून परिक्रमेच्या संकल्पाला एक वैशिष्ट्यपूर्ण आकार श्रीगुरुजींनी दिला.

संपूर्ण परिक्रमेत - श्री थोरल्या स्वामी महाराजांची छत्र-चामर-मशाल-दंड-सूर्य-चंद्रासह पालखी आणि रथ मिरवण्याचा संकल्प -'नमो गुरवे वासुदेवाय’ या नाममंत्राचा मोठ्या संख्येने नामजप पूर्ण करण्याचा संकल्प -अनेक सत्पुरुषांच्या तपोनुष्ठानाने पवित्र झालेल्या स्थळांवर एकूण बारा यज्ञ घेण्याचा संकल्प -विविध स्थळांवर दीपदान, अर्घ्यदान, नर्मदा पूजन, कन्यापूजन भक्तांकडून करवून घेण्याचा संकल्प -परिक्रमेदरम्यान सत्पुरुष आणि समाज धुरिणांचा यथोचित गौरव करण्याचा संकल्प.

नर्मदा किनारीचा खडतर, डोंगराळ प्रदेश, शहरी सोयी-सुविधांची सवय असणारा श्रीगुरुजींचा भक्तगण आणि घडलेल्या संकल्पाचे विशाल स्वरूप, या सगळ्याचे समीकरण मांडणं खरोखर एक आव्हान होतं. परंतु श्री गुरुजी संतपुरुष पाठीशी असल्यामुळे परिक्रमेचे अत्यंत काटेकोर आणि अचूक असे नियोजन केले गेले. यासाठी स्वयंसेवकांच्या एकूण सहा चमुंनी श्रीनर्मदा परिक्रमा मार्गावरील वेगवेगळ्या सहा प्रदेशांचे सखोल सर्वेक्षण केले. नियोजनाच्या या टप्प्यात पायी परिक्रमा पूर्ण केलेले पूज्य श्री विष्णुगीरी महाराज, पूज्य श्री प्रतापे महाराज, श्री सुहास लिमये, श्री नर्मदा प्रसाद(दिनकर)जोशी, श्री व सौ प्रतिभा चितळे, श्रीमती उष:प्रभा पागे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

संबंधित प्रदेशात परिक्रमेचा सोयीचा मार्ग कोणता, कोणत्या टप्प्यात पायी चालणे शक्य आहे, कोणत्या ठिकाणी बस प्रवास करणे अनिवार्य आहे, भोजन-मुक्कामासाठी सोयीची ठिकाणं कोणती, परिसरात उपलब्ध असलेल्या इतर सुविधा (किंबहुना सुविधांचा अभाव) इत्यादी बारीक-सारीक माहिती, नकाशे एकत्र केले गेले. परिक्रमा मार्गावरच्या विविध आश्रमांना भेट देऊन, तिथल्या व्यवस्थापकांना परिक्रमेची पूर्वकल्पना देऊन, त्यांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. नियोजित वेळेत नियोजित सर्व कार्यक्रम संपन्न होतील या बेताने परिक्रमेचा कच्चा आराखडा तयार केला गेला. या आराखड्यानुसार दररोज काही अंतर पदभ्रमण तर काही अंतर वाहन प्रवास करून परिक्रमा पूर्ण करण्याचे नियोजन केले गेले होते. स्वयंसेवक साधकांनी तयार केलेल्या या कच्च्या आराखड्यातल्या उणीवा दूर करून त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी, नर्मदा किनारी वास्तव्य करून श्री थोरले स्वामी महाराज आणि श्रीदत्तप्रभुंची अनन्यभावे भक्ती करणाऱ्या दोन सत्पुरुषांचे अमूल्य असे मार्गदर्शन स्वयंसेवकांना मिळालं. हे दोन सत्पुरुष म्हणजे भालोदचे पूज्य श्री प्रतापे महाराज आणि तिलकवाडा येथील पूज्य श्री विष्णुगिरी महाराज. " ही पालखी-परिक्रमा म्हणजे श्री महाराजांचं १०० वर्षांनी नर्मदा किनारी होणारं पुनश्च अवतरण आहे’ या भावाने या दोन्ही संतपुरुषांनी परिक्रमेच्या पूर्वनियोजनात तर सहभाग दिलाच शिवाय प्रत्यक्ष परिक्रमेतही भक्तांना सतत मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली.

पाउले चालती नर्मदेची वाट-
सद्‍गुरुंसमोर देहाने आणि मनाने संपूर्ण शरणागती स्वीकारून, दि. ३ नोव्हेंबर रोजी एकूण ३२० अबाल-वृद्ध, स्त्री-पुरुष भक्त परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजी आणि गुरुपत्नी परमपूज्य सौ. आई यांच्या कृपाछत्राखाली परिक्रमेस मार्गस्थ झाले. त्याआधी ९ ऑक्टोबर २०११ रोजी बदलापूर येथे झालेल्या शक्ती स्वाहाकाराच्या प्रसंगी श्री गुरुजींनी परिक्रमेस प्रत्यक्ष येणाऱ्या आणि प्रारब्धाच्या अडचणींमुळे केवळ मनाने उपस्थित राहणाऱ्या सर्व भक्तांकडून संकल्प उच्चस्वरात, यज्ञ सन्मुख करून घेतला.

दिनांक ५,६,७ नोव्हेंबर २०११ या दिवशी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथील अभय घाटावर यज्ञ आणि विधीवत परिक्रमा संकल्प झाल्यानंतर दिनांक ८ नोव्हेंबर २०११ रोजी पालखी-परिक्रमा दक्षिण तटावरून रेवासागराच्या दिशेने मार्गस्थ झाली. बडवानी, राजघाट, प्रकाशा, गोरागाव, भालोद या मार्गे निघालेले परिक्रमावासी दिनांक १४ नोव्हेंबर २०११ रोजी समुद्र प्रवासासाठी सज्ज झाले. कठपोर ते मिठीतलाई अशी पाच तासाची जहाज यात्रा आणि समुद्र पूजनानंतर परिक्रमावासीयांनी उत्तर तटावरील पालखी परिक्रमा सुरु केली. नारेश्वर जवळचा पुनीत आश्रम, तिलकवाडा, कोटेश्वर, माहेश्वर, बडवाह, नेमावर, बरेली, ब्रह्मांडघाट, जबलपूर या मार्गाने प्रवास करत दिनांक ३० नोव्हेंबर रोजी अमरकंटक येथे पालखी-परिक्रमेचं आगमन झालं. घनदाट वनराईने नटलेल्या निसर्गरम्य स्थानावर मैयाचा उगम आहे. या क्षेत्राला माईका बगिचा म्हटले जाते. या स्थळावर श्री सद्‍गुरु आणि सौ. आईंच्या हस्ते मैयापूजन आणि हवन संपन्न झाल्यानंतर परिक्रमावासी दक्षिण तटावरुन परिभ्रमण करू लागले. महाराजपूर, ब्रह्मांडघाट(दक्षिण तट), होशंगाबाद असा प्रवास करून दिनांक ६ डिसेंबर रोजी पालखी परिक्रमेचे पुनरागमन श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथे झालं. दिनांक ७ डिसेंबर २०११ रोजी पूज्य श्री गुरुजी आणि सौ. आईंच्या हस्ते परिक्रमा समापन विधी आणि श्रीनर्मदा मातेची सोळा उपचारांनी पूजा संपन्न झाल्यानंतर ओंकारेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी परिक्रमावासीयांनी मातेचा किनारा सोडला आणि खोपोलीकडे प्रयाण केलं. खोपोली स्थानावर ९ डिसेंबर रोजी उद्यापन सोहळा आणि १० डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सव संपन झाल्यानंतर पालखी-परिक्रमा ११ डिसेंबर रोजी गुरुगृही म्हणजे बदलापूर येथे पोहोचली. या दिवशी झालेल्या श्रीनर्मदालहरी स्वाहाकारानंतर निघाल्यापासून चाळीसाव्या दिवशी परिक्रमेची सांगता आशीर्वाद मंत्रांच्या प्रोक्षणानंतर झालेल्या सद्‍गुरु दर्शनाच्या सोहळ्याने करण्यात आली.

परिक्रमेतला आध्यात्मिक मकरंद-:
परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजींच्या परिक्रमा संकल्पनेतील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे परिक्रमेतल्या विविध साधना-कार्यक्रमांमुळे घडलेली आध्यात्मिक आनंदाची लयलूट. हे कार्यक्रम कसे आयोजित करण्यात आले आणि त्यांच्यातून कोणती अनुभूती सर्व भक्तांना मिळाली ते आपण आता क्रमशः बघणार आहोत;

यज्ञ -
प्राचीन भारताने पुरस्कृत केलेली ’यज्ञ’ ही अध्यात्मातली एक श्रेष्ठ साधना आहे. त्याची विज्ञानाधिष्ठित पुनर्स्थापना करून समाजात यज्ञ साधनेचं पुनरुज्जीवन करण्याचे स्पृहणीय कार्य , श्री गुरुजी गेले सतराहून अधिक वर्ष अविरतपणे करत आहेत. श्रीगुरुजींच्या यज्ञ संकल्पनेनुसार इच्छुक असणाऱ्या सर्व भाविकांना यज्ञात मंत्रपठणासह हवन करण्याची अनुमती दिली जाते, मात्र यासाठी कोणालाही बाध्य केलं जात नाही. (अधिक माहितीसाठी श्रीगुरुजींचा ’यज्ञरहस्य" हा ग्रंथ वाचावा) प. प. श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांसह अनेक सत्पुरुषांनी पुनीत केलेल्या नर्मदा किनारीच्या तीर्थक्षेत्रावर यज्ञांचे आयोजन केल्यास त्याद्वारे प्रचंड शक्तीची निर्मिती होईल. ही शक्ती परिक्रमावासी साधकांनाच नव्हे तर त्या क्षेत्राला, तिथल्या मनुष्यासहित सर्व जीवांना उत्तम गती देईल, त्यांना प्रगती साधण्यासाठी योग्य दिग्दर्शन करेल. या श्रेष्ठ विचारांनी प्रेरित होऊन श्रीगुरुजींनी एकूण बारा यज्ञांचे आयोजन परिक्रमेदरम्यान करण्याचा संकल्प केला. यज्ञांच्या आयोजना पाठीमागे अजून एक विचारधारा होती. ’दरमहिन्याला एक यज्ञ’ या संकल्पाबरोबरच, दरवर्षी एका तीर्थक्षेत्रावर जाऊन सात दिवसांचा यज्ञ घेण्याचा संकल्पही श्रीगुरुजींनी सन २००५ मध्ये केला होता. यानुसार चित्रकूट, हरिद्वार, खोपोली, नैमिषारण्य, पुष्कर आणि पुन्हा नैमिषारण्य असे सहा वार्षिक यज्ञ सन २०१० मध्ये संपन्न झाले. श्री नर्मदा परिक्रमेनिमित्त होणाऱ्या या बारा यज्ञांच्या मालिकेद्वारे वार्षिक यज्ञ संकल्पाची सातवी शृंखला पूर्ण करायची असा श्रीगुरुजींचा मानस होता.

अपरिचित स्थानी जाऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर सामूहिक यज्ञ घेणे ही खरोखर एक आव्हानात्मक गोष्ट होती. यज्ञासाठी सुयोग्य स्थळ निवडणे, यज्ञवेदीचे बांधकाम करणे, मंडप-बैठक व्यवस्था-हवन व्यवस्था-मंत्रविभाग इत्यादिची व्यवस्था करणे. या आणि अशा अनेक तपशीलातल्या नियोजनासाठी काही माहितगार स्वयंसेवक बंधुंचे आगावू पथक (अड्वान्स टीम) प्रत्येक यज्ञापूर्वी काही काळ, यज्ञ स्थलावर पोहोचून सर्व व्यवस्था अचूकपणे लावत असे. श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कुशल नियोजनामुळे नर्मदा परिक्रमेत नियोजित सर्व यज्ञ सुसंपन्न होऊ शकले. यज्ञ मालिकेचा श्रीगणेशा दिनांक ५ नोव्हेंबर २०११ रोजी अभयघाट, ओंकारेश्वर येथे झालेल्या श्रीगणेश यज्ञाने झाला. या दिवशी यज्ञ प्रज्वलनाच्या वेळी श्रीगुरुजींनी प्रभु रामचंद्राना यज्ञात उपस्थित राहून संपूर्ण यज्ञ मालिकेचे रक्षण करण्याची विनंती केली. त्यानंतर त्याच स्थळी दिनांक ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी श्रीदुर्गासप्तशती आणि रुद्रस्वाहाकार संपन्न झाले. या यज्ञांबरोबर श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथे पितृ-यज्ञही घेतला गेला. दिनांक १० नोव्हेंबर २०११ रोजी प्रकाशा येथील तापी नदीच्या तीरावरील पुष्पदंतेश्वर मंदिरात महिम्न स्वाहाकार संपन्न झाला. याच स्थळी पुष्पदंतेश्वर नामक गंधर्वाने शिवाराधना करण्यासाठी महिम्नाची रचना केली असा उल्लेख आढळतो. दिनांक १३ नोव्हेंबर २०११ रोजी भालोद येथे श्री प्रतापे महाराजांनी स्थापन केलेल्या श्री दत्तात्रेय मंदिरात दत्तयाग संपन्न झाला. याप्रसंगी श्री महाराजांनी आपल्या शिष्यासह यज्ञाचे यजमान पद भूषवले. दिनांक १६ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र नारेश्वर जवळच्या पुनीत आश्रमात श्रीयज्ञ संपन्न झाला. त्यापुढे तिलकवाडा हे क्षेत्र, गरुडेश्वर या श्री थोरल्या स्वामी महाराजांच्या समाधी स्थळासमीप आहे. या ठिकाणी श्री स्वामी महाराजांनी वास्तव्य केलं, चातुर्मासही केला. इथल्या ’वासुदेव कुटीत’ सध्या श्री विष्णुगिरी महाराजांचे कार्य चालते. या पुण्यक्षेत्री अनेक संत महात्म्यांच्या उपस्थितीत दिनांक १८ नोव्हेंबर २०११ रोजी श्री दुर्गासप्तशती स्वाहाकार पार पडला. रामपूर पासून तिलकवाड्यापर्यंत श्रीनर्मदा माई उत्तरगामिनी आहे या कारणास्तव इथे पितृयज्ञही स्वाहाकार आणि स्वधाकारासह विशेषत्त्वाने संपन्न झाला. दिनांक २१ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी माहेश्वर इथे पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी बांधलेल्या सुबक आणि विस्तीर्ण घाटावर सौ. वर्षा भावे यांच्या चमूने सुश्राव्य तसेच सर्वांना अंतर्मुख करणारी 'संगीत सेवा' सादर केली. दुसर्‍या दिवशी २२ नोव्हें.ला माहेश्वरला श्री नर्मदा लहरी स्वाहाकाराचे आयोजन केलं गेलं. या प्रसंगी श्रीमद्‍ आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या नर्मदा लहरींचे सामूहिक पठण आणि हवन झालं. याही दिवशी अधिकीचा पितृयज्ञ घेतला गेला होता ज्यामध्ये पितृसूक्तातील मंत्रांचे उच्चारण करून, श्रीगुरुजींनी सर्व भक्तांकडून यज्ञात हवन करून घेतलं. सर्व पितृजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा महत्त्वाचा विधी नर्मदेसारख्या पुण्यक्षेत्री घडत होता हे परिक्रमावसीयांचं मोठंच भाग्य म्हणावं लागेल!

परमपूज्य सद्‍गुरु श्री श्रीराम महाराज यांचं स्थान म्हणजे उत्तरतटावरील नावघाटखेडी, बडवाह (जिल्हा:खरगोन) येथील ’समर्थ कुटी’. या पवित्र स्थानी श्रीरामरक्षा यज्ञ संपन्न झाला. स्वतः सद्‍गुरु श्री श्रीराम महाराज आणि गुरुपत्नी सौ. जानकी ताई यांनी यज्ञाचं यजमानपद भूषवलं. दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी नेमावर येथील श्रीब्रह्मचारीजी महाराज यांच्या चिन्मयधाम या आश्रमात श्रीनर्मदालहरी स्वाहाकार संपन्न झाला.आश्रमातले मुख्य संन्यासी आणि महान तपस्वी श्रीसंत गाडगीळ महाराज यांनी यज्ञाचे प्रज्वलन केलं. यज्ञाच्या मध्यान्हपूर्व सत्रात नर्मदा सहस्त्रनामाचे सामूहिक पठण तथा हवन करण्यात आलं तसंच मध्यानोत्तर सत्रात प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित श्रीनर्मदा लहरी यामधील श्लोकांच्या अत्यंत गेय अशा लहरी काव्याचं सामूहिक पठण तथा हवन झाले.
दिनांक १ डिसेंबर रोजी अमरकंटक येथील मृत्युंजय आश्रमाच्या परिसरात श्रीगायत्री यज्ञ संपन्न झाला तर दिनांक ५ डिसेंबर २०११ रोजी हौशंगाबाद जवळील श्रीसीताराम वाडी, खर्रा घाट इथल्या एकमुखी दत्तमंदिरात श्री विष्णुयज्ञाचं आयोजन झालं. हे ठिकाण अत्यंत पवित्र आहे कारण याच स्थळी श्री थोरले स्वामी महाराज आणि श्रीनर्मदा मैयाची कन्यारूपात भेट झाली. या भेटीनंतर महाराजांचं जवळ जवळ संपूर्ण कार्य रेवातटी घडलं. महाराजांचे लहान बंधु श्री सीताराम (टेंबे) महाराजांनी काही मराठी मंडळींच्या साहाय्याने या ठिकाणी श्रीदत्तमंदिराची स्थापना केली. महाराजांच्या भगिनी मातुश्री रुक्मिणी जडये आणि त्यांचे यजमान पूज्य अनंतराव जडये यांचीही तपाराधना या ठिकाणी घडली आहे. दिनांक ७ डिसेंबर रोजी परिक्रमावासियांचे पुनरागमन श्रीक्षेत्र ओंकारेश्वर इथे झाल्यावर या स्थळीच्या अभयघाटावर हरिहर यज्ञाचे आयोजन करण्यात आलं. यज्ञ प्रज्वलनानंतर प्रथमतः श्री विष्णु सूक्ताचे पठण होऊन त्यानंतर दिवसभर रुद्राची आवर्तनं घेण्यात आली.
श्रीनर्मदा परिक्रमेदरम्यान आयोजित केलेल्या १२ यज्ञमालेचा मेरुमणी अर्थात बारावा यज्ञ बदलापुर येथे दिनांक ११ डिसेंबर रोजी संपन्न झाला. या दिवशी श्रीनर्मदा सहस्त्रनामाचं आवर्तन झालं. या दिवशीचे विशेष महत्त्व असं की संपूर्ण यज्ञमालिकेची पूर्णाहुती या दिवशी संपन्न झाली. प्रत्यक्ष श्री गुरुजींनी आशीर्वाद मंत्रांच्या उच्चारणासह उपस्थित असलेल्या ७०० भक्तांवर आशीर्वाद मंत्रांच्या उच्चारणासह अभिषेक जलाचं प्रोक्षण केलं आणि त्यानंतर यज्ञ कार्यक्रमांची सांगता झाली.

श्रीसद्‍गुरुंची विवेचने :
श्रीनर्मदा परिक्रमेचे अंतरंग उलगडून दाखवण्यासाठी, त्यातले ज्ञान-विज्ञान सांगण्यासाठी श्रीगुरुजींनी एकूण १४ विवेचनांचं ज्ञानसत्र परिक्रमेदरम्यान घेतलं. श्रीगुरुजींनी आपल्या रसाळ, ओघवत्या शैलीत घेतलेली ही विवेचनं म्हणजे प्रत्येक परिक्रमावासीयासाठी एक अलभ्य पर्वणीच होती. वस्तुतः भक्तांची मानसिक बैठक पक्की व्हावी म्हणून परिक्रमेपूर्वीपासूनच श्रीगुरुजी अनेक विवेचनांमधून परिक्रमेमागचं अध्यात्म ,विज्ञान आणि इतिहास समजावून देत होते, त्याची वारंवार उजळणी करत होते. परंतु परिक्रमेत घेतलेल्या विवेचनांना एक अनोखी रंगत प्राप्त झाली याचे कारण म्हणजे ही विवेचनं मैयाच्या साक्षीने आणि तिच्या उपस्थितीत झाली! नर्मदा परिक्रमेदरम्यान श्रीगुरुजींनी घेतलेल्या सखोल विवेचनांचा सारभूत वृत्तांत असा, श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथील तीन दिवसीय यज्ञामध्ये प्रथम तीन विवेचने झाली. पहिल्या विवेचनात श्रीगुरुजींनी श्रीनर्मदेच्या आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक स्वरूपावर भाष्य करून त्यानंतर श्रीक्षेत्र ओंकारेश्वराचं स्थान माहात्म्य सांगितलं. दुसऱ्या विवेचना दिवशी संत नामदेव जयंती असल्याकारणाने त्यांच्या जीवनचरित्राविषयी सांगून श्री सद्‍गुरुंनी तीर्थ विज्ञान हा विषय विवेचनात घेतला. यामध्ये तीर्थयात्रा कशासाठी करावी, तीर्थयात्रेचे प्रकार कोणते, आध्यात्मिक दृष्टीने जलतत्त्वाशेजारी तप करण्याचे महत्त्व काय आहे, अभिषेकामागचे विज्ञान याची साद्यंत माहिती दिली. ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या तिसऱ्या विवेचनामध्ये श्रीनर्मदेकडून तपाची प्रेरणा घेण्यासाठी कोणत्या पूर्व अटी आहेत, जलतत्त्वाकडून तेज ग्रहण करण्यासाठी साधकाच्या भावाला सर्वोच्च महत्त्व का आहे या विषयी विस्ताराने भाष्य केलं. परिक्रमा म्हणजे निर्हेतुकपणे नदी भोवती मारलेली फेरी नसून त्यापाठीमागे स्पष्ट असे विज्ञान आहे, या विज्ञानाचा रहस्यभेद श्रीगुरुजींनी केला. प्रकाशा येथील महिम्न स्वाहाकाराच्या निमित्ताने, ’शिवमहिम्न स्तोत्र’ या विषयी श्रीगुरुजी सविस्तर बोलले. यामध्ये महिम्न रचनेचा इतिहास, महिम्नाचे साहित्य आणि आध्यात्मिक दृष्ट्या गुणाकलन, महिम्न पठणाची फलश्रुती हे विषय आंतर्भूत होते. यानंतर पुनीत आश्रमात झालेल्या श्रीयज्ञात, ’भवसागर’ हा विवेचनाचा विषय होता. नुकतीच रेवासागराची यात्रा करून परतलेल्या परिक्रमावासीयांना भवसागर काय हे कळावं याचं औचित्य श्रीगुरुजींनी पहिलं. भवसागर म्हणजे काय, भवसागराची उत्पत्ती कशामुळे होते, भवसागर तरणोपायाचे मार्ग कोणते याची श्रीगुरुजींनी सखोल मीमांसा केली. ’सागरात समर्पित होणाऱ्या नर्मदेची ’समर्पण’ ही सर्वात मोठी शिकवण आहे. परिक्रमेच्या निमित्ताने समर्पणाचा हा जल्लोष आपल्याला समजून घेता आला पाहिजे’, श्रीगुरुजींच्या या समारोपाने सर्व श्रोतृवर्ग भावविभोर न होता तरच नवल झाले असते!
माहेश्वर येथे झालेल्या नर्मदालहरी स्वाहाकाराच्या प्रसंगी श्रीगुरुजींनी ’नर्मदालहरी’ या विषयावर विवेचन घेतलं. यामध्ये प्रथमतः महिष्मती नगरीचं स्थान माहात्म्य सांगून त्यानंतर मूळ विषयाला सुरुवात झाली. श्रीमद्‍ आद्य शंकराचार्यांना ’क्रांतदर्शी कवी’ का म्हटलं जातं, त्यांनी रचलेल्या नर्मदा लहरीतली सौंदर्यस्थळं, लहरीपठणामागचे विज्ञान आणि अध्यात्म, पठणामुळे वातावरणात होणारे परिणाम इत्यादि विषयी सखोल ज्ञान दिलं. बडवाह इथे श्रीरामरक्षा यज्ञाच्या निमित्ताने श्रीगुरुजींनी ’पूजन’ या विषयावर विवेचन घेतले. बडवाह तसेच नर्मदा परिक्रमेतील इतर काही स्थानांचं स्थानमाहात्म्य प्रथम विशद केलं. यानंतर पूजन म्हणजे काय, पूजन कशासाठी आणि ते कसं करावं याविषयी सांगून महर्षी जाबालांनी प्राचीन काळी केलेल्या सृष्टीपूजनाविषयी रसाळ कथनही केलं. देहातले सगळे परमाणू एका गतीत आणून इष्टदेवतेची केलेली एकाग्र पूजा हे पूजनाचं सार आहे या विधानाने विवेचनाचा समारोप झाला.

हरेकृष्ण मंदीर, भेडाघाट येथे नर्मदा माईच्या निसर्गरम्य शीतल किनाऱ्यावर श्रीगुरुजींनी स्वामी महाराजांच्या नर्मदा लहरींवर भाष्य केलं आणि त्यातल्या काही श्लोकांचं अर्थासह विवरण केलं. अमरकंटक इथल्या श्रीगायत्री यज्ञात श्रीसद्‍गुरुंनी सुरुवातीला अमरकंटकचं स्थान-काल माहात्म्य सांगितले. त्यानंतर अनुसंधान भक्तीचा आदर्श असणाऱ्या गृत्समद ऋषींचे नर्मदाकिनारी झालेले वास्तव्य आणि जीवन कार्य, अध्यात्म आणि सामाजिक जीवन याची त्यांनी घातलेली सांगड हे सांगून अनुसंधानाच्या पायऱ्यांचे विवरण केलं. श्रेष्ठ सत्पुरुषांविषयी ओळख करून देण्याची ही शृंखला हौशंगाबाद इथे झालेल्या विवेचनातही कायम राहिली. या दिवशी योगीराज अरविंद घोष यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनकार्याची आणि तत्त्वज्ञानाची ओळख श्रीगुरुजींनी सर्व उपस्थितांना करून दिली.
मराठी भाषेत झालेल्या या विवेचनांव्यतिरिक्त श्रीगुरुजींनी आमलथा गावातल्या राममंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थांसाठी हिन्दी भाषेतून ’रामनाम’ या विषयावर विवेचन घेतलं. या विवेचनानंतर श्रीमद्‍ आद्य शंकराचार्य विरचित श्रीरामस्तोत्राचं ( सदा रामचंद्रं भजेहं भजेऽहं.....) अर्थासह विवरण करून त्याचं उपस्थित ग्रामस्थ आणि परिक्रमावासीयांकडून पठणही करून घेतलं.
परिक्रमेदरम्यान दिनांक १० डिसेंबर रोजी श्रीदत्तजयंतीचा सोहळा खोपोली स्थानावर साजरा झाला. या प्रसंगी प.प.श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित श्रीदत्तात्रेय स्तोत्रावर श्रीगुरुजींनी केलेली विवेचनं पुस्तक रुपात प्रसिद्ध झाली. या प्रसंगी श्रीगुरुजींनी सर्व भक्तांना विवेचनाद्वारे सद्‍गुरुतत्त्वाची ओळख करून दिली. सद्‍गुरु तत्त्वाच्या पूजेमुळे, आराधनेमुळे भक्तांना मिळणारी उत्तमगती, सद्‍गुरुकृपेचं स्वरूप, शरणागत शिष्याला सद्‍गुरुतत्त्व कशाप्रकारे दिग्दर्शन करतं याविषयीचं विवरण श्रीगुरुजींनी केलं.
परिक्रमेतल्या विवेचन मालिकेची समाप्ती बदलापूर येथे झालेल्या यज्ञविवेचनाने झाली. संपूर्ण नर्मदा परिक्रमेची पूर्ती आणि फलश्रूती विदीत करणारं हे विवेचन होतं. तप म्हणजे काय, तपाचे प्रकार कोणते, तप करताना कोणत्या अडचणी उद्भवतात. सृष्टी, समाज आणि देहाचं ऋण फेडण्यासाठी यज्ञ, श्रेष्ठजनांचा सन्मान आणि तप हे मार्ग का सांगितले गेले या विषयी सांगून पूर्णाहुती म्हणजे काय या विषयाकडे श्रीगुरुजी वळले. पूर्णाहुती मागचं विज्ञान सांगताना श्रीगुरुजी म्हणाले की जसा एका शक्तीचा अंत ही दुसऱ्या शक्तीची सुरुवात असते तद्वतच परिक्रमेचा अंत म्हणजे शक्तीनिर्मितीच्या दुसऱ्या वर्तुळाचा प्रारंभच आहे. अधिक मोठ्या तपवर्तुळामध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व भक्तांनी सिद्ध व्हायचं आहे! या स्फूर्तीदायक संदेशाने विवेचन मालिकेची सांगता झाली.
नर्मदा परिक्रमेतल्या या विवेचनांची लज्जत अधिक वाढली ती श्रीगुरुजींनी केलेल्या वेगवेगळ्या दृक-श्राव्य माध्यमांच्या कौशल्यपूर्ण वापरामुळे. संगणकीय स्लाईड्स, विडियो क्लिप्स, छायाचित्रं, तक्ते, फलक आणि काही वेळा तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा वापरही त्यांनी केला! याशिवाय मध्येच पेरलेले खुसखुशीत विनोद, बोधात्मक कथा, यासगळ्यामुळे श्रीगुरुजींची सर्वच विवेचनं श्रवणीय, दर्शनीय आणि संस्मरणीय अशी झाली हे निश्चित!

नामस्मरण, नामजप आणि नामघोष :
सन २०१४ साली असणार्‍या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या शंभराव्या पुण्यतिथी पर्यंत ’नमो गुरवे वासुदेवाय’, या नाममंत्राचा शंभर कोटींचा जपसंकल्प पूर्ण करण्याचा संकल्प आहे. यापैकी पंचवीस कोटींचा जप परिक्रमेत पूर्ण करावा असं नियोजन होतं. त्यानुसार बस-रेल्वे प्रवासात, इतर निवांत वेळी साधकांनी एकमेकांशी व्यर्थ बोलण्याऐवजी नामजप करावा अशा सूचना सर्व भक्तांना देण्यात आल्या होत्या. या वैयक्तिक जपाबरोबर, दररोज किमान एकदा टाळ, मृदुंगाच्या तालावरची सामूहिक नामस्मरणं आणि पालखी-पदभ्रमणाच्या वेळी सामूहिक नामघोष होत असे. सिद्धमंत्रांबरोबरच श्रीदत्तप्रभुंची, गुरुपरंपरेची इतर नामस्मरणं देखील घेतली जात. ज्या ज्या आध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या मंदिरांना परिक्रमावासी भेट देत त्या प्रत्येक ठिकाणी त्या विशिष्ट इष्ट देवेतेचं नामस्मरण घेतलं जाई. या सर्वांवर माधुर्याची पेरणी करणारे नाम होते ते श्रीनर्मदा मैयाचे,
"जय नर्मदे, जय नर्मदे, नमामि देवी नर्मदे
नर्मदे हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर, हरऽ हर"

पालखी-पदयात्रेमध्ये, दीपदानाच्या वेळी मैयातीरावर किंवा अन्य कुठेही हे नामस्मरण ताला-सुरात सुरु झालं की भक्तांची पावलं सहजच तो ताल पकडत. मैयाचा शांत अथांग किनारा, चांदण्यांचा शुभ्र प्रकाश आणि जोडीला भक्ती रसात न्हाऊन निघालेले, नामस्मरण करताना तल्लीन होऊन नाचणारे भक्त असं दृश्य रेवातटी दिसू लागे! अशावेळी श्रीसद्‍गुरु आणि सौ. आई या नामस्मरणात उत्साहाने सहभागी होत आणि मग या भक्तीपूर्ण वातावरणाचा कळस गाठला जात असे. बडवाह येथे पालखी-पदयात्रेमध्ये ’दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामस्मरणाने असाच रंग पकडला असताना, सद्‍गुरु श्री श्रीराम महाराजांनी अचानक उत्स्फूर्तपणे सद्‍गुरु श्री बापट गुरुजींचा हात पकडून त्यांना स्वतः बरोबर फुगडी घालायला लावली आणि भक्तांमध्ये आनंदोत्सवाची एक नवीनच लहर आली! यानंतर अनेक स्थळांवर सद्‍गुरु श्री बापट गुरुजी, सौ. आईसाहेब, श्रीविष्णुगिरी महाराज, श्रीदादा महाराज आणि इतर श्रेष्ठ व्यक्तींनी पालखी पदयात्रेत घातलेलं रिंगण आणि फुगड्या बघण्याचं भाग्य सर्व परिक्रमावासियांनी अनुभवलं आणि ते दृश्य ह्रदयाच्या कुपीत आयुष्यभरासाठी साठवून घेतलं!

दीपदान :
भक्तीरसाची अशीच उधळण मैयातीरी होणाऱ्या दीपदानाच्या प्रसंगी होत असे. सामूहिक नामस्मरण आणि श्रीनर्मदा आरती झाल्यानंतर सर्वप्रथम श्रीसद्‍गुरुंसह सर्व संतमंडळी दीपदान करत आणि त्यानंतर उपस्थित प्रत्येक बंधु आणि भगिनीला दीपदान करण्याची संधी दिली जात असे. नर्मदेच्या अथांग प्रवाहात अर्पण केलेले हे दिवे, तिच्या कंठात विराजमान होणारे हिरे-मोती असल्यासारखे लखलखत. ’घाटन घाट पूजावत कोटी रतन ज्योती’ या आरतीतल्या शब्दांचा तो प्रत्यक्ष अविष्कार असे. सद्‍गुरुंच्या दिव्यामागे सर्व दिवे एका रांगेने प्रवाहाबरोबर पुढे पुढे जाऊ लागले की असं वाटत असे की असंच एकदिवस सद्‍गुरुतत्त्व आपल्या प्रत्येक शिष्याला भोगनदी पार करून मोक्षतीरावर नेणार आहे!

आरती :
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या स्थानांवर नित्याने होणारी गुरुवार-शनिवारची आरती, नर्मदा किनारीच्या त्या दिवशीच्या प्रत्येक मुक्कामी आवर्जून घेण्यात आली. नेमावर येथील सिद्धनाथ महादेव मंदिरात शनिवारच्या पालखी प्रदक्षिणेचा सोहळासुद्धा संपन्न झाला. स्वामी महाराजांनी रचलेली अनेक पदं आणि स्तोत्रं श्रीगुरुजींनी त्यांना लावलेल्या भावपूर्ण चालीत नर्मदा तीरी म्हटली गेली. श्रीगुरुजींनी ’करुणात्रिपदी’ या स्वामी महाराजांच्या अपूर्व सुंदर तीन पदांच्या आरतीला करुणारसाने परिपूर्ण अशी अत्यंत मधूर चाल लावली आहे. नर्मदेच्या धीरगंभीर प्रवाहासमोर समूहाने म्हटल्या जाणाऱ्या या आरतीप्रसंगी स्वामी महाराजांना अपेक्षित असणाऱ्या करुणामय भक्तीरसाच्या ह्रदयस्पर्शी अनूभुतीमुळे अनेक भक्तांचे आणि संत्पुरुषांचे डोळे पाणावत असत.

कन्यापूजन/कन्याभोजन :
श्रीनर्मदा मैयाला कन्येच्या रूपात पाहिलं जातं. स्वामी महाराजांनाही तिने बालकन्येच्या रूपात दर्शन दिलं होतं. यामुळे कन्यापूजन आणि कन्याभोजन हा नर्मदा किनारीचा एक महत्त्वाचा विधी आहे. परिक्रमेत घडणारा हा कन्यापूजनाचा कार्यक्रम म्हणजे नर्मदा किनारीच्या लहानग्या आवखळ मैयांचा परिक्रमावासी भगिनींनी केलेला कौतुक-श्रद्धा मिश्रित पूजनाचा ह्रद्य सोहळा असे! कन्यापूजनाच्या प्रसंगी काही वेळा आजूबाजूचे छोटे ’बाबाजी’ देखील उत्सुकतेने या सोहळ्यात सहभागी होत असत. त्या सगळ्यांना रांगेत बसवून, कुंकुम तिलक लावून त्यांचे औक्षण केल्यानंतर त्यांना दक्षिणावस्तु दिल्या जात असत. यज्ञाच्या दिवशी हा कार्यक्रम घेतल्यास, या बालचमुकडून हवनही करून घेतले जाई. या सोहळ्यानंतर भोजन-प्रसाद देऊन या कन्यांची प्रेमाने बोळवण करण्यात येई.

सत्संग आणि सन्मान :
’सन्मान, संगतीकरण आणि दान’, या यज्ञाच्या त्रिसूत्रीला अनुसरून परिक्रमेत अनेक साधु-संत-सत्पुरुष आणि समाजधुरिणांना उपस्थित राहण्याचे अगत्यपूर्ण निमंत्रण देऊन त्यांचे यथोचित सन्मान करण्यात आले. सत्पुरुषांचा सन्मान का करावा याविषयी श्रीगुरुजी म्हणतात "सृष्टी आणि निसर्गाचं ऋण फेडण्यासाठी यज्ञ करावा तर समाजाचं ऋण फेडण्यासाठी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या श्रेष्ठ व्यक्तींचा सन्मान करावा असं आपली संस्कृती सांगते. ही ऋणमुक्ती झाल्याशिवाय भव-बंधनातून सुटका नाही!" याला अनुसरून परिक्रमेपूर्वी देखील अनेक संत-सत्पुरुषांना परिक्रमेची माहिती कळवण्यात आली होती आणि या उपक्रमास त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले होते. नाशिकचे परमपूज्य काकामहाराज ढेकणे, अंमळनेरचे परमपूज्य पूर्णानंद स्वामी, मैसूरचे परमपूज्य स्वामी विरजानंद यांनी लेखी पत्राद्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. मुंबईचे सुफीपंथीय सद्‍गुरु, परमपूज्य सुफी दशरथ रहेमान शाह (श्री ससाणे महाराज) यांनी तर संपूर्ण परिक्रमा कार्यक्रमात शिष्यांसह उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार पूज्य ससाणे महाराज (दादा महाराज) आणि त्यांचे चार शिष्य परिक्रमेच्या पहिल्या दिवसापासून ते बदलापूरच्या यज्ञापर्यंत संपूर्ण परिक्रमा कार्यक्रमात उपस्थित होते. पालखी-पदभ्रमण, यज्ञ, नामस्मरण या सर्व सोहळ्यात त्यांचा अत्यंत भक्तीयुक्त सहभाग असे. भालोदचे पूज्य श्रीप्रतापे महाराज आणि तिलकवाड्याचे पूज्य श्रीविष्णुगिरी महाराज यांचा अत्यंत आनंदमय सहवास आणि सत्संग परिक्रमावासियांना लाभला. त्यादोघांचं नर्मदामैया आणि स्वामी महाराज या दोघांवर असलेल्या अन्योन्य प्रेमाचं दर्शन सर्वांना घडलं. पायी परिक्रमा पूर्ण केलेले श्री सुहासकाका लिमये यांचा शांत आणि आश्वासक सहवास संपूर्ण परिक्रमेत भक्तांना प्रेरित करून गेला. परिक्रमेत काही काळ श्री नर्मदाप्रसाद (दिनकर) जोशी तसेच श्री व सौ चितळे ताई परिक्रमावासियांना अमूल्य असे मार्गदर्शन करण्यासाठी सोबत आले होते.

’भूदेव संतांशी सदा नमावे’ ही शिकवण सद्‍गुरु श्री बापट गुरुजी नेहमीच आपल्या शिष्यांना देत असतात. त्यानुसार बडवाहचे पूज्य सद्‍गुरु श्रीराम महाराज, नेमावरचे श्रीसंत गाडगीळ महाराज, हौशंगाबाद इथल्या दत्तमंदिरात कार्य करणारे पुज्य स्वामी हरिॐतीर्थ, नंदुरबारचे संतचरणरज सखारामकाका चौधरी, देडिया पाड्याचे निरंजनी आखाड्यातील महामंडलेश्वर स्वामी सुरेंद्रनाथ महाराज, ब्रह्मांडघाट(दक्षिणतट) यास्थळी वेदपाठशाळा चालवणारे ११४ वर्षांचे श्रीसंत रामलखनदासजी महाराज या संतपुरुषांचे सान्निध्य आणि आशीर्वाद परिक्रमावासीयांना लाभले.
इंदौर लोकसभा मतदारसंघातून सलग सातवेळा निवडून येणाऱ्या आणि केंद्रीयमंत्रीमंडळात विविध महत्त्वाची पदे भूषवलेल्या श्रीमती सुमित्राताई महाजन, अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीभावाने ओंकारेश्वर येथील यज्ञात उपस्थित राहिल्या. गोरागावच्या भारतीमाताजी, कोटेश्वर मंदिर-कठपोर इथेले श्री लालजी बाबा, तिलकवाड्याच्या रामकृष्ण आश्रमातले स्वामी आत्मकृष्ण आणि स्वामी आत्मदेवानंद, कुंभेश्वरचे स्वामी रामदासजी त्यागी आणि स्वामी राधादासजी त्यागी, हरेकृष्ण मंदिर, भेडाघाटचे संन्यासी भक्तीवेदांत श्रीभिक्षुजी महाराज, शूलपाणी जंगलातले साधू श्रीगिरनारी महाराज या सगळ्या संत-महात्म्यांचा सत्संग परिक्रमावासीयांना लाभला. मंडलेश्वर इथल्या वासुदेवकुटीची व्यवस्था बघणारे श्री अनील जहागिरदार, दत्तमंदिराची व्यवस्था बघणाऱ्या सौ केळकर ताई आणि श्री हळबे काका, हौशंगाबाद दत्तमंदिरातले श्रीदत्तानंद महाराज, मोरटक्का इथल्या श्रीभक्तराज अश्रमाचे व्यवस्थापक श्री नाना घळसासी यांच्याही सेवाकार्याचा गौरव सद्‍गुरुंच्या हस्ते करण्यात आला. खोपोली येथील श्रीदत्तजयंतीच्या सोहळ्यास वेदवासुदेव प्रतिष्ठानचे पूज्य श्री अजीतदादा तुकदेव आणि स्वामी महाराजांवर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या, स्वामी महाराजांच्या साहित्याच्या अभ्यासक डॉ. सुनीता जोशी यांचा सन्मानही श्रीगुरुजींच्या हस्ते झाला.

कठपोर येथील महंत श्री गोपालदासजी महाराज यांनी नर्मदा परिक्रमावासीयांसाठी समुद्र-प्रवासापूर्वी धर्मशाला उपलब्ध केलेल्या आहेत. तसेच, समुद्र-प्रवासाच्या बोटींच्या व्यवस्थेवर त्यांचे नियंत्रण असते. श्री गुरुजींनी त्यांचा दि.१४ नोव्हें.रोजी पहाटे समुद्र प्रवासापूर्वी स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला; तसेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना धर्मशाळा उभारणीसाठी एक ट्रक सीमेंट नर्मदा परिक्रमेचा भाग म्हणून देण्यात आले.

प्रेमळ जनप्रतिसाद आणि आगत्य :
शिवमय-मंगलमय नर्मदा मैयाच्या जलाने पवित्र झालेला परिक्रमा मार्ग कधी रम्य वनश्रींनी नटला आहे तर कधी कापुस, तूर, कारळं, भात, गहू, हरभरा इ. पिकांच्या शेतांनी डवरला आहे. धरणामुळे पाण्याखाली गेलेल्या शूलपाणीच्या जंगलाच्या प्रदेशाला वळसा घालून परिक्रमा जेव्हा तापी नदी पात्रातल्या प्रकाशा जवळ पोहोचते तेव्हा तिथला दुर्गम, पाण्यासाठी आसुसलेला प्रदेश दिसतो तर पुढे नारेश्वर-भलोद इथला प्रदेश मात्र केळीच्या बागांनी आणि हिरव्या भाजीपाल्याने आच्छादलेला दिसतो. अनेक प्रकरचे पक्षी जाता येता नजरेस पडतात. नर्मदा किनारीची पशु-पक्षी-वनस्पतींची ही जैवविविधता मनाला संमोहित करते. या विविधतेला एका समान धाग्याने बांधले आहे आणि हा धागा आहे नर्मदा किनारीच्या अगत्यशील, प्रेमळ आणि सहज सात्विक भावाने परिपूर्ण असणाऱ्या लोकमानसाचा! अत्यंत नेटकी, साधी सुबक घरकुलं प्रत्येक खेड्या-वस्त्यांमध्ये आढळून येतात. या घरकुलातून नर्मदाकिनारीच्या आश्रमातून परिक्रमावासीयांना मिळणारा अकृत्रिम स्नेह अनेक परिक्रमावासी-लेखकांनी नोंदवुन ठेवला आहे.
या अनुभवाचा प्रत्यय याही परिक्रमेत भरभरून मिळाला. लहान मुलं, तरुण मुलं-मुली, स्त्री-पुरुषांचा एवढा मोठा जत्था कधी बसमधून तर कधी पालखी-पदयात्रा करत परिक्रमा करतो आहे याचं कौतुक मिश्रीत अप्रुप अनेक ठिकाणी स्थानिकांच्या नजरेत आढळून आलं. परिक्रमेत सहभागी झालेल्या संतपुरुषांचा, पूज्य सद्‍गुरुंचा काही काळ तरी सहवास लाभावा यासाठी अनेक ग्रामस्थ निमंत्रण देत असत, चहा-पान भोजनासाठी आग्रह करत. या लोकागत्याचे अनेक प्रसंग मन हेलावून टाकणारे आहेत. त्यातले दोन प्रसंगांचं वान‌गीदाखल वर्णन करता येईल.
परिक्रमेच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे ओंकारेश्वर ते बडवानी या दक्षिण तटावरच्या प्रवसात ऊन या गावी भोजनासाठी थांबल्यावर सर्व परिक्रमावासी बसने बडवानीच्या दिशेने मार्गस्थ झाले. वाटेत अंधार पडला. त्यातच एका ठिकाणी अपघात झाला असल्याकारणाने वाहनांची पांगापांग झाली. रात्रीची वेळ, अनोळखी परिसर अशा परिस्थितीत सीलखेडा या गावात श्री दादा महाराजांनी त्यांची बस थांबवली. आसपास काही टपरीवजा दुकानं, काही लहान लहान घरं आणि मध्येच एका विस्तीर्ण वटवृक्षाखाली बांधलेला दगडी प्रशस्त पार. या पारावर श्री दादा महाराजांनी आसन लावलं आणि श्रीगुरुजींची खुशाली कळल्याशिवाय तिथून हलायचे नाही असा निर्णय जाहीर केला. काही वेळाने स्थानिक मंडळी, ’कुठले वाहन, कोण माणसं आहेत’ याची विचारपुस करू लागली. परिक्रमावासी आहेत, सोबत सत्पुरुष आहेत असं समजताच एक मनुष्य लगबगीने घरी गेला. काही वेळातच श्रीगुरुजी आणि सौ. आईंचे वाहन त्या स्थळी पोहोचले. चांदण्या रात्री, शुक्र आणि चंद्राच्या शीतल प्रकाशात, वटवृक्षाच्या विस्तीर्ण छायेत श्रीगुरुजी, सौ आईसाहेब आणि श्री दादा महाराज विराजमान झाले. तेवढ्यात घरी गेलेल्या त्या ग्रामस्थांने सर्वांसाठी गरमगरम चहा आणला. या प्रेमाने दिलेल्या चहाचा आस्वाद घेताना श्रीगुरुजी म्हणाले, "आपकी इच्छा इतनी प्रखर थी की हमारी बसों को मोड बदलना पडा और आपके यहा आना हुआ!" ग्रामस्थाने त्या त्रिमूर्तींच्या पायी मस्तक ठेवलं आणि मंडळी मार्गस्थ झाली.
नर्मदा परिसरातल्या आतिथ्यशीलतेचा अजून एक सुंदर अनुभव मंडलेश्वर-बडवाह या मार्गावरील आमलथा या गावात आला. शंभर-दिडशे लोकवस्तीचं हे गाव, शेजारी तशीच लहान लहान दोन गावं. मैय्याच्या कुशीत वसलेल्या या तीन गावांच्या ग्रामस्थांनी श्रीगुरुजी आणि पालखी बरोबरच्या सर्व परिक्रमावासीयांचं ढोल, ताशे वाजंत्र्यांसह वाजतगाजत स्वागत केलं. स्वतःच्या खांद्यावर पालखी धारण केलेले श्रीगुरुजी , त्यांच्याबरोबर चालणारी संतमंडळी पालखीच्या पुढे डोक्यावर जल-कलश घेऊन चाललेल्या गावातल्या सात-आठ कन्या , मागे नामघोष करणारे परिक्रमावासी अशी मिरवणूक गावाच्या वेशीपर्यंत गेली. त्यानंतर छत्र-चामर-दंड-मशाल-चंद्र-सूर्यासहित पालखीत विराजमान झालेली प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची मूर्ती आणि श्रीनर्मदेच्या जलकुंभाचं गावच्या वेशीवर भव्य स्वागत करण्यात आलं. आमलथा गावातल्या गावकऱ्यांचा श्रीगुरुजींच्या हस्ते सन्मान, श्रीगुरुजींचं विवेचन हे कार्यक्रम पार पडल्यानंतर भोजन-प्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. गावातली लहान-थोर सर्व मंडळी परिक्रमावासीयांना आग्रहाने जेवू घालत होती. सर्व परिक्रमावासीयांनी भोजन घेईपर्यंत गावातलं लहान मूलही जेवलं नाही हे विशेष! कृषी प्रधान असलेल्या आमलथा गावाला ट्यूबवेलने पाणीपुरवठा होतो. या पाण्यावर कापूस, गहू अशी बागाईत शेती घेतली जाते. गावात गाई-म्हशी-शेळ्या असं पशुधनही मुबलक आहे. या सर्वातले खरे मर्म म्हणजे गावकऱ्यांची नुसती घरंच समृद्ध नाहीत तर मनंही तितकीच समृद्ध आहेत! कोटेश्वर-मांडू मार्गावरील पिपलीया गावातल्या पाटीदार समाजानेही परिक्रमावासीयांचं असंच प्रेमळ स्वागत केलं. मनाच्या समृद्धीचा हाच अनुभव तळोदा तालुक्यातल्या आमलापाडा गावात कनकेश्वर मंदिराच्या भेटीच्या प्रसंगी आला. मनाची समृद्धी प्रदान करणाऱ्या नर्मदामैयाला सर्वांनी मनापासून वंदन केलं! या भव्य परिक्रमेची त्यातल्या यज्ञांची नोंद अनेक स्थानिक वृत्तपत्रांनी घेतली. प्रसिद्धीसाठी कोणताही वेगळा खटाटोप न करता मिळालेला हा जनप्रतिसाद अद्भूतच म्हणावा लागेल.

मंदीर आणि देवस्थानं भेट:
परिक्रमेत अनेक प्राचीन आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्व असणाऱ्या देवस्थानांना भेट देण्याचं भाग्य परिक्रमावासीयांना मिळालं. ’कोणात्याही पवित्र स्थानावर जाऊन ’देखल्या देवा दंडवत’ घालण्यापेक्षा तिथे एकाग्रतेने काही सत्कर्म करावं जेणेकरून तिथली शक्तीस्पंदनं ग्रहण करता येतात. शिवाय शक्तीनिर्मिती झाल्यामुळे त्या स्थानावर भविष्यात येणाऱ्या भाविकाला, एकूण परिसराला त्याचा लाभ होतो’ ही गुरुजींची प्रमुख शिकवण आहे. यानुसार भेट दिलेल्या प्रत्येक मंदिरात/आश्रमात एकत्रितपणे नामस्मरण, आरती, स्तोत्रपठण घेण्यात आलं. अनेक ठिकाणी श्रीगुरुजी आणि सौ.आईसाहेबांच्या हस्ते अभिषेक, षोडशोपचारे पूजन, आरती असे विधिवत उपचार संपन्न झाले. ओंकारेश्वर येथील ममलेश्वर महादेव मंदीर, राजघाटावर स्वामी महाराजांनी स्थापन केलेले दत्तमंदीर, प्रकाशा येथील पुष्पदंतेश्वर मंदीर, आमलापाड्याचा कनकेश्वर महादेव, भालोदचे दत्तमंदीर, कठपोर येथील कोटेश्वर महादेव मंदीर, नारेश्वर मधले श्रीरंगावधूत महाराजांचे स्थान, अनसूया मातेचे मंदीर, कर्नाली इथले पंचकुबेरेश्वर महादेव या देवस्थानांचे दर्शन घडले. कोटेश्वर इथे श्रीसंत दगडू महाराज आश्रमात गेली कित्येक वर्ष अखंडपणे सुरु असलेल्या रामधूनी मध्ये परिक्रमावसीयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मांडू येथील प्रसिद्ध चतुर्भूज श्रीराम मंदीर, सहस्त्रधारा-जलकोटीचे सद्‍गुरु श्री नारायण महाराज संस्थान, नारायणपूर, जिल्हा पुणे या संस्थेने बांधलेले भव्य दत्तमंदीर, मंडलेश्वर मधली वासुदेव कुटी, दत्तमंदीर, राममंदीर, बडवाह येथील वासुदेव कुटी, अखिलेश्वर महादेव, ओखला , छिंद-बरेली येथील हनुमानाचे जागृत स्थान या मंदिरांमध्ये जाण्याचा योग आला. नेमावर इथले श्रीसिद्धनाथ महादेव हे अतीप्राचीन आणि वास्तुशिल्पांचा उत्तम नमूना असलेल्या मंदिराभोवती पालखी-प्रदक्षिणेचा कार्यक्रम संपन्न झाला. भेडाघाट इथल्या हरेकृष्ण मंदिरात ’वासुदेवरूपी’ कृष्णाचं नाम घेऊन त्याचं स्मरण केलं. अमरकंटक इथे निसर्गरम्य परिसरात, घनदाट जंगलाच्या कुशीत विसावलेल्या नर्मदा कुंड, माईका बगिचा, दशमहाविद्या मंदीर, श्रीयंत्र मंदीर, कपील महर्षींचे साधना स्थळ या स्थानांना पायी पदभ्रमण करत भेट दिली.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्रीओंकारेश्वर हे पुण्यस्थळ परिक्रमावासियांना परिक्रमा सुरु असताना बघता येत नाही, अन्यथा माईचं पात्र ओलांडल्यामुळे पारिक्रमेचा भंग होतो. परिक्रमेअंती श्रीओंकारनाथाचे दर्शन घेण्यासाठी अभयघाटावरुन पालखी-पदभ्रमण करत परिक्रमावासी मैयाच्या पैलतीरी गेले. पहिल्यांदाच मैयाचा प्रवाह ओलांडताना सर्वांच्या अंगावर रोमांच उभं राहिलं. या प्रसंगावर सौ. प्रतिभाताई चितळे यांनी फार सुंदर वक्तव्य केलं, "जीवनाची परिक्रमा पूर्ण करून असंच आपल्याला ॐकारात विलीन होण्यासाठी जायचं आहे आणि त्यावेळेला मोक्षदायिनी नर्मदा सद्‍गुरुंसह आपल्या बरोबर असणार आहे!".

आनंदयात्रेतली स्मृती चित्रे :
परिक्रमावासीयांचे सांख्यिकी दृष्ट्या केलेले विश्लेषणही अत्यंत उद्बोधक ठरेल. या परिक्रमेत एकूण १७० भगिनी आणि १५० बंधु सहभागी झाले. तीन वर्षाखालच्या मुलांनी तर ज्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे अशा बंधु-भगिनींनी परिक्रमेत सहभाग घेतला. परिक्रमेत नुसते उच्चवर्णीय हिंदुच नाहीत तर सर्व धर्मीय, सर्व जातींच्या भक्तांनी सहभाग घेतला. शारीरिक दृष्ट्या सशक्त तरुण पिढी बरोबरच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग व्यक्ती सुद्धा अत्यंत भक्तीभावाने, जिद्दीने आणि उत्साहाने या परिक्रमेत सहभागी झाल्या आणि त्यांनी यशस्वी रीत्या ही परिक्रमा पूर्ण केली. भारतीय भक्तांबरोबर थेट अमेरिकेतून आलेला स्वामी महाराजांचा निस्सीम भक्तही या परिक्रमेत अगदी सहजच सामावला गेला. सलग चाळीस दिवस, तीनशे वीस भक्त, सात बसेस, एक अ‍ॅम्ब्युलन्स, दोन तुफान जीप्स, दोन ट्र्क्स (एक स्वयंपाकाचा, एक सामानाचा) असा ताफा सोबत घेऊन सद्‍गुरु श्री बापट गुरुजींच्या संकल्पानुसार निघालेली ही भव्य परिक्रमा सफल होणं म्हणजे आजच्या काळातला एक चमत्कार म्हणावा लागेल. अर्थात श्रीगुरुजींच्या व्याख्येप्रमाणे जगात चमत्कार असा काही नसतो. जे जे चमत्कार सदृश्य भासतं ते अनेक व्यक्त आणि अव्यक्त शक्तींनी दीर्घ काळापासून केलेल्या साधनेचं, परिश्रमांचं फलित असतं. दैववादापेक्षा कर्मवादावर भर देत श्रीगुरुजींनी परिक्रमेचं अचूक नियोजन आणि व्यवस्थापन सर्व स्वयंसेवकांकडून करून घेतलं. नियोजनानुसार सर्व कार्ये यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांची त्यांच्यातल्या कौशल्यानुसार गटबांधणी केली. प्रत्येक गटाने काय कामं करायची आहेत याची स्पष्टता दिली गेली. प्रत्येक दिवसाचं नव्हे प्रत्येक तासाचं वेळापत्रक तयार केलं गेलं! या आणि अशा अनेक बारिकसारीक तपशीलासह परिक्रमेची आखणी केली गेली. अर्थात एवढं करूनही परिक्रमेत अनेक संकटं वारंवार उद्भवली. निर्मनुष्य स्थळी वाहनं बंद पडणे, रस्त्यांच्या दुर्दशेमुळे प्रवासाचे वेळापत्रक संपूर्ण कोलमडणे, नियोजित स्थळी सोईंचा संपूर्ण अभाव असणे, भक्तांच्या प्रकृतीच्या बारीकसारिक तक्रारी उद्भवणे, साधकांचे मनोधैर्य दोलायमान होणे या आणि अशा अनेक संकटांवर मात करत करतच परिक्रमा पूर्ण झाली.

परिक्रमेतलं महत्त्वाचं बलस्थान म्हणजे अबाल-थोर परिक्रमावासीयांची सद्‍गुरुंप्रती असलेली संपूर्ण श्रद्धा आणि शरणागती. श्रीगुरुजींनी परिक्रमेआधी कित्येक दिवस भक्तांची मानसिकता तयार केली, त्यांना परिक्रमेमागचं अध्यात्म समजावून सांगितलं. त्यामुळे अत्यंत भव्य आयाम असलेला हा कार्यक्रम सिद्धीस गेला तो एकत्रिततेच्या आणि सहकार्याच्या शक्तीमुळेच. मानवी प्रयत्नात कसूर न ठेवता यशासाठी सद्‍गुरुंकडे बळ मागितलं तर ते हमखास मिळतं, हा श्रीगुरुजींचा मूलमंत्र आहे. तद्वतच योजलेल्या कार्यास सिद्धीस नेण्यासाठी सद्‍गुरुतत्त्वाशी एकरूप झालेल्या अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्ती आणि शक्तींनी परिक्रमेला दिलेला आशीर्वाद सर्वोच्च महत्त्वाचा होता हे निश्चित आहे! ’एकत्र समूहाने केलेली परिक्रमा सफल होत नाही’, हा समज खोटा ठरला तो नर्मदा माई आणि सद्‍गुरुतत्त्वाच्या असीम कृपेमुळेच.
परिक्रमा करून काय मिळवलं हा प्रश्न जर परिक्रमेत सहभागी झालेल्या कोणालाही विचारला तर तो एवढंच म्हणेल, ’नेति नेति’, ते शब्दात सांगता येणार नाही ! आध्यात्मिक प्रगती बरोबरच आपसातले सहकार्य, तडजोडीची वृत्ती, कठीण परिस्थितीत टिकणारे मनाचे समाधान या गोष्टींची संथा मिळाली. पुणे-मुंबईच्या तूलनेत कोणतीही सोय-सुविधा नसलेला नर्मदा किनारीचा प्रत्येक रहिवासी, शहरी भागातल्या परिक्रमावासीयांची मनाची कवाडं विशाल करून गेला. संत सहवासामुळे अपरिग्रह, त्याग, सेवा आणि करुणेचं प्रात्यक्षिक मिळालं. इच्छिलेली प्रत्येक वांच्छा पूर्ण करणारी नर्मदा माई आणि भेटलेल्या प्रत्येक जीवाचा उद्धार करण्यासाठी आतुर असलेलं सद्‍गुरुतत्त्व अनेक व्यक्ती आणि शक्तींच्या माध्यमातून नर्मदा किनारी कार्यरत आहे, किंबहुना नर्मदा हीच सद्‍गुरुरूप आहे आणि सद्‍गुरु हे नर्मदा स्वरूप आहेत या अद्वैताची अनुभूती 'आत्मयजनाच्या' रूपाने सद्‍गुरु कृपेने ठाई ठाई झाली.
या अनुभूतीचा आनंद आध्यात्मातल्या प्रत्येक साधकाला मिळो हीच सद्‍गुरुरूपी-नर्मदामाईला प्रार्थना!

 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी