यज्ञ ३८३ ८ जुलै २०१८, श्रीनर्मदा लहरी स्वाहाकार
नित्याप्रमाणे सकाळी ठीक ९.३० वाजता यजमानांच्या हस्ते आणि पूज्य आईच्या उपस्थितीत नर्मदा लहरी स्वाहाकाराला प्रारंभ झाला. यज्ञवेदी पूजन झाल्यानंतर यज्ञ प्रज्वलन आणि आवाहन मंत्र संपन्न झाले. त्यानंतर श्रीमद् आद्य शंकराचार्य आणि श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी रचलेल्या नर्मदा लहरींचे पठण आणि हवनास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात श्री नर्मदा मानसपूजा संपन्न झाल्यावर श्री सद्गुरुंच्या ध्वनिमुद्रित विवेचनाचे श्रवण सर्वांनी केले. प. प श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथी १३ जुलै रोजी असल्याने हे विशेष विवेचन ऐकवण्यात आले. ह्या विवेचनाचा सारांश असा,
“स्वामी महाराज ही स्वतंत्र व्यक्ती किंवा शक्ती अशी अस्तित्वात नाही, तर ते चैतन्य गुरुतत्त्वाशी संपूर्णपणे एकरूप झाले आहे. पण तरीही ह्या शक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा त्या रूपावर एकाग्रता करण्यातच आहे कारण त्या रूपाच्या माध्यमातून थेट त्या शक्तीपर्यंत पोहोचण्याचा पूल उपलब्ध होतो. विशेषतः पुण्यतिथीनिमित्त हे स्मरण घडल्यास ती शक्ती मूळ शक्तीपासून काही काळापुरती विलग होऊन आपल्याकरिता अवतरीत होऊ शकते. पुण्यतिथीच्या निमित्ताने स्वामी महाराजांच्या चरित्राचे अवलोकन करून त्यातून बोध घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. त्यांच्या चरित्र बोधामुळे आपल्याला ज्या गोष्टींचे ग्रहण करता येते, त्या म्हणजे संकल्प-निष्ठा, दंभ-परिहार, रसदोष-परिहार आणि अप्राकृत भक्ती. स्वामी महाराजांना आपण परमहंस परिव्राजकाचार्य असं म्हणतो. वस्तुतः ह्या काही डिग्र्या किंवा पदव्या नाहीत, तर हे शब्द म्हणजे त्यांनी आचरलेल्या तपःपूत जीवनाचा आरसा आहेत. संन्यास आश्रमाचे मुख्य प्रकार म्हणजे कुटीचक संन्यास, बहुदक संन्यास, हंस संन्यास आणि परमहंस संन्यास. ह्यात सगळ्यात सर्वात कठीण अशी शास्त्र नियमावली असलेला संन्यास म्हणजे विद्वत प्रकारचा परमहंस संन्यास. ह्या संन्यासाची नियमावली अतिशय कठोर असून त्याचे वर्णन मनुस्मृती, हंसोपनिषद आणि परमहंसोपनिषद ह्यामध्ये आढळते. खुंटीला बैल जुंपून जसा कोलू ओढतात तसं ह्या परमहंस संन्यासाने स्वतःला आयुष्यभर ज्ञानरूपी खुंटीला बांधून घ्यायचे असते. परिव्राजकाचार्य म्हणजे जो अमर्याद आहे, ज्याला कशाचीही मर्यादा नाही, असा. अशा ह्या परमहंस परिव्राजकाचार्य महापुरुषाचे कृपादान आपल्याला प्राप्त करायचे असेल तर त्यांच्या सतत स्मरणात आणि सत्संगात आपल्याला राहता आलं पाहिजे.”
दुपारच्या सत्रात जन्मपूर्व संस्कार, जन्मोत्तर संस्कार, वैद्यकीय समुपदेशन हे नित्याचे उपक्रम संपन्न झाले. यज्ञामध्ये स्तोत्र-मंत्रांचे सामूहिक पठण आणि हवनही उपस्थित साधकांनी केले. सायंकाळी पूर्णाहुती झाल्यावर आशीर्वाद मंत्राचे प्रोक्षण होऊन यज्ञाची सांगता श्रीगुरु पादुका दर्शनाने झाली.
यज्ञ ३८४, १२ ऑगस्ट 2018, श्रीगुरुपौर्णिमा यज्ञ
यज्ञ प्रज्वलनाआधी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ‘ ह्या नामस्मरणाच्या तालावर सगळे साधक दंग झाले आणि त्यानंतर नित्याप्रमाणे सकाळी ठीक९.३० वाजता पूज्य आईच्या उपस्थितीत गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित दत्तयज्ञाला प्रारंभ झाला. यज्ञवेदी पूजन झाल्यानंतर यज्ञ प्रज्वलन आणि आवाहन मंत्र संपन्न झाले. त्यानंतर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींच्या आवाजातल्या ध्वनिमुद्रित दत्तात्रेय नामांनी दत्तात्रेयांच्या विविध रूपांना निमंत्रित करून हविर्द्रव्य अर्पण करण्यात आले. पुढे श्रीमद् थोरले स्वामी महाराज विरचित वेदपादस्तुती आणि श्रीदत्तभावसुधारस स्तोत्रांचे सामूहिकरीत्या पठण व हवन झाले.
आता वेळ होती ती सद्गुरु आगमनाची! त्यासाठी अत्यंत सुशोभित केलेल्या व्यासपीठावर पाद्यपूजनाची जय्यत तयारी करण्यात आली, फुलांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या. ग्रंथ दिंडी सजवण्यात आली. बालसंस्कार वर्गातले बाल साधक पारंपरिक वेषात सज्ज झाले आणि मग श्री सद्गुरु पादुकांचे आगमन वाजत गाजत, नामस्मरणाच्या जयघोषात औक्षण करून करण्यात आले. त्यासोबत पूज्य आईंचेही स्वागत झाले. सोबत ग्रंथ पालखी, चंद्र, सूर्य हा सरंजाम होताच! श्री सद्गुरु-पादुका व्यासपीठावर स्थापन झाल्यावर त्यांचे षोडशोपचारांनी पूजन एका साधक दांपत्याने केले. पूजनाच्या वेळी श्रीविष्णुसहस्रनाम, पुरुषसूक्त, श्रीसूक्त आदीचे सामूहिक पठण झाले. अंती भावपूर्ण आरती श्री सद्गुरुंना अर्पण करण्यात आली. अन्नपूर्णाष्टक स्तोत्राने नैवेद्य अर्पण झाल्यावर सगळ्यांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला.
त्यानंतर सर्वप्रथम श्रीसद्गुरुंच्या ध्वनिमुद्रित विवेचनाने दुपारच्या सत्राचा प्रारंभ झाला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने झालेल्या ह्या विवेचनाचा सारांश असा,
“उत्पत्ती, स्थिती आणि संहार अशी तिन्ही कार्य एका सद्गुरु शक्तीमध्ये एकवटली आहेत. सद्गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत हे समजणं थोडं अवघड आहे. त्यासाठी प्रथम श्रद्धेची आवश्यकता असते. ईश्वर आणि सद्गुरु ह्यांमध्ये किंचितसा फरक असतो. ईश्वर हा सर्वत्र व्यापून असला, तरी ईश्वरी तत्त्वाला प्रकट होण्यासाठी भक्ताच्या आत्यंतिक श्रद्धेची आवश्यकता असते. सत्पुरुषांच्या बाबतीत मात्र ईश्वरी शक्ती त्यांच्यात स्वयमेव प्रकट झालेली असते. म्हणूनच ते सद्गरु पदावर असतात. ह्या शक्तीवर श्रद्धा असेल तरच ती शक्ती आपल्या अनुभवाच्या कक्षेत आपण आणू शकतो. त्यासाठी सद्गुरुंशी सतत अनुसंधान ठेवता आलं पाहिजे. अनुसंधानासाठी सद्गुरुंशी प्रत्यक्ष संपर्क साधावा लागतोच असं नाही तर सद्गुरुकार्यात, सद्गुरु संकल्पात सह्भागी होऊनही हे अनुसंधान आपल्याला साधता येतं. श्रीसद्गुरु प्रत्येक शिष्याची पात्रता ओळखून त्याला योग्य तो सल्ला देत असतात. तुकाराम महाराजांनी अत्यंत सुंदर शब्दात हे मांडलं आहे की, “ माझिया मनींचा जाणोनिया भाव, तो करी उपाव गुरुराव”. सत्कर्म कसे, कुठे आणि केव्हा करावे हे अचूक जे सांगतं ते म्हणजे गुरुतत्त्व. सत्कर्माशिवाय कर्माच्या गुंत्यातून सुटका होऊ शकत नाही. प्रारब्धाच्या रेखेवर जो मेख मारतो तो सद्गुरु! पण सगळ्यांना सद्गुरुंचं सामर्थ्य कळतंच असं नाही. एखादेवेळी संकटाला घाबरून भक्त विचलित होतो, त्याच्याकडून गुरुनिंदा घडते. गुरुनिंदा स्वतः करणे एवढंच नव्हे तर गुरुनिंदकाचे तोंड देखील पाहणे हे आपल्या अनेक पिढ्यांना नरकाच्या अंधारात ढकलण्यासारखे असते. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, “ तुका म्हणे गुरुनिंदकाचे तोंड, पाहता नरककुंड पूर्वजांसी !” भक्तांच्या विविध भौतिक अपेक्षांमुळे त्याच्याकडून हे पातक घडू शकतं. वस्तुत: सद्गुरू भौतिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नसतातच. ते भक्ताच्या आध्यात्मिक कल्याणासाठी असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीसद्गुरुंप्रती श्रद्धा वाढून गुरुनिंदेसारखा अपराध आपल्या हातून कधीही घडू नये आणि , आपलं आध्यात्मिक कल्याण झालं पाहिजे” असा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे.
श्री सद्गुरुंच्या ह्या विवेचनानंतर सर्व साधकांसमोर आणि यज्ञेश्वर नारायणाच्या साक्षीने www.yadnya.in ह्या संकेत स्थळाचे नवीन स्वरूपात विमोचन करण्यात आले. त्यानंतर अनुभव कथनाचा कार्यक्रम झाला. ह्यामध्ये बालसाधकांसह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले, साधकांनी स्वरचित काव्य व मानसपूजा सद्गुरु चरणी अर्पण केली. सायंकाळी पूर्णाहुती झाल्यावर आशीर्वाद मंत्राचे प्रोक्षण होऊन श्रीगुरु पादुका दर्शनाने यज्ञाची सांगता झाली.
यज्ञ क्रमांक ३८५, दिनांक ९ सप्टेंबर २०१८, गीताई ज्ञानयज्ञ
परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी ह्यांच्या प्रेरणेने ३८५ वा सामूहिक यज्ञ गायत्री गार्डन, बदलापूर (पूर्व) ह्या स्थळी संपन्न झाला. नित्याप्रमाणे पूज्य आईंच्या उपस्थितीत गायत्री मंत्राच्या जयघोषात ठीक सकाळी ९.३० वाजता यजमानांनी यज्ञप्रज्वलन केले. त्यानंतर आवाहन मंत्र, श्रद्धा सूक्त इत्यादीचे पठण झाल्यावर परम पूजनीय श्री विनोबांनी मराठीमध्ये रचलेल्या गीताई ह्या गीतेच्या समश्लोकी मराठी भाषांतराच्या पठण आणि हवनास प्रारंभ झाला.
सकाळच्या सत्रामध्ये श्री आदित्य बापट ह्यांनी “ आचार्य विनोबा भावे आणि त्यांची गीताई”, ह्या विषयावर विवेचन केले. त्या विवेचनाचा सारांश असा,
“ विनायक नरहर भावे अर्थात आचार्य विनोबा भावे ह्यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ मध्ये रायगड येथील गागोदे इथे झाला. विनोबा आणि त्यांची भावंडे आईच्या संस्काराखाली लहानाची मोठी झाली. आईवर संतांच्या शिकवणीचा प्रभाव होता ज्यामुळे विनोबांवरही त्या विचारांचा पगडा लहानपणापासून होता. तरुण वयात सावरकर तर त्यानंतर गांधीजींच्या विचारांचा परिणाम विनोबांच्या विचारसरणीवर होत गेला. प्राचीन आध्यात्मिक विचार विशेषतः ब्रह्मसूत्रे, गीता, ऋग्वेद इत्यादी लहान वयातच विनोबा कोळून प्यायले होते. त्यांची बुद्धी अतिशय कुशाग्र आणि ग्रहण क्षमता प्रचंड दांडगी होती. १९४० मध्ये गांधीजींनी विनोबांना पहिला वैयक्तिक सत्याग्रही म्हणून घोषित केलं. गांधीजींचा आध्यात्मिक वारसाही विनोबांनी समर्थपणे चालवला. खरतर ते आधुनिक काळातले एक क्रांतदर्शी ऋषी होते. त्यांनी जीवनभर ज्ञानसाधना केली. त्यांना भारतीय आणि युरोपियन अशा मिळून एकूण २२ भाषा येत असत. सर्व धर्मातल्या मुख्य ग्रंथांचे अध्ययन वाचन, मनन, चिंतन त्यांनी केले होते आणि त्यावर आधारित विवरणात्मक ग्रंथ सुद्धा प्रकाशित केले. त्यांच्या विवरणात्मक साहित्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विषय आहे त्यापेक्षा अधिक सोपा करणे. त्यामध्ये कायम सर्वसमावेशक दृष्टी आणि समन्वयवादी विचार त्यांनी बाळगला. ऋग्वेदातल्या १०,५०० ऋचांपैकी ३००० ऋचा निवडण्याची वेचक दृष्टी त्यांच्याकडे होती. व्यक्तिशः ते अद्वैत मताचे होते परंतु सर्वधर्मातील समन्वयाचा त्यांच्याकडे दृष्टीकोन होता.
गीतेचे समश्लोकी आणि अतिशय सुलभ असे मराठी भाषांतर त्यांनी अवघ्या चार महिन्यात केलं आणि त्याला गीताई असं नाव दिलं. ह्या भाषांतरावर त्यांनी स्व-मताचा प्रभाव पडू दिला नाही. त्यांनी गीतेवर कित्येक प्रवचने केली आणि त्या प्रवचनांचे लिखाण करण्यासाठी त्यांना साने गुरुजींसारखा सिद्धहस्त लेखक मिळाला. पुढे त्याना भूदान चळवळी मुळे प्रसिद्धी मिळाली. ह्या चळवळीद्वारे त्यांनी काही लाख एकर जमीन गरिबांसाठी दानाद्वारे उपलब्ध करून दिली आणि त्यासाठी १९५१ ते १९६४ असे सतत पदभ्रमण केले. कमालीच्या प्रसिद्धी पराङ्मुख असलेल्या विनोबांना पहिला मॅगसेसे पुरस्कार मिळाला. १९७२ मध्ये त्यांनी क्षेत्रसंन्यास घेतला. पुढे त्यांना भारतरत्न ह्या भारताच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अतिशय सुबोध अशा स्वरचित गीताईच्या सुरुवातीच्या गीता ध्यानात विनोबा स्वतःला “नेणता” असं संबोधतात. गीताभाष्याचा संपूर्ण अधिकार असलेल्या ह्या महापुरुषाने स्वतःला नेणता म्हणणे हेच त्यांच्या श्रेष्ठत्वाचे लक्षण होय.”
दुपारच्या सत्रात नित्याप्रमाणे वैद्यकीय समुपदेशन, जन्मपूर्व संस्कार आणि बालसंस्कार वर्ग इत्यादी यज्ञ उपक्रम संपन्न झाले. उपस्थितांनी गीताईच्या सर्व अध्यायांचे पठण हवन केले. संध्याकाळी पूर्णाहुती झाली आणि यज्ञेश्वर नारायणाचे आशीर्वाद सर्वांनी ग्रहण केले.
यज्ञ ३८६, दिनांक ७ ऑक्टोबर २०१८, पितृयज्ञ
दिनांक ७ ऑक्टोबर रोजी पितृपंधरवडा निमित्ताने विशेष पितृयज्ञ संपन्न झाला. सुरुवातीला आवाहन मंत्र, श्रद्धा सूक्त, अघोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण झाल्यानंतर गायत्री मंत्राच्या सामूहिकरीत्या पठण आणि हवनास प्रारंभ झाला.
सकाळच्या सत्रात स्वतंत्र यज्ञवेदीवरती सर्व उपस्थितांनी पिंड आणि हविचे हवन केले आणि उर्वरित हविर्द्रव्य जलार्पण करण्यात आले. ह्या वेळी श्री सद्गुरुंच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेल्या पितृसूक्तातल्या ऋचांचे श्रवण करून सगळ्यांनी मनोमन पूर्वजांसाठी पुण्य-अर्पण करण्याचा संकल्प केला. ह्या प्रसंगी “पितृकर्तव्य” ह्या विषयावर श्री गुरुजींनी घेतलेल्या विवेचनाचे (ध्वनिमुद्र्णाचे) श्रवण उपस्थितांनी केले. विवेचनाचा सारांश असा,
“जीवन जगताना जी जीवन प्रमेयं आपल्याला सोडवावी लागतात, त्यातलं सगळ्यात मोठं प्रमेय म्हणजे मृत्यू. प्रत्येकाला सतत मृत्यूची भीती वाटत असते. ही भीती नाहीशी करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी मृत्यू प्रक्रियेचं आणि त्यावेळी होणाऱ्या दुखांचं अतिशय उत्कृष्ट विश्लेषण केलं आहे जे भगवद्गीतेतही आलं आहे. भगवद्गीतेमधला आठव्या अध्यायातला सहावा श्लोक असं सांगतो की आयुष्यभर जो छंद जोपासला असेल, तोच विचार अंतकाळी मनुष्याच्या मनात येतो. मनुष्याला मृत्यूसमयी जी दुःखं होतात, त्यांचे प्रकार म्हणजे विश्लेषज दुःख, मोहज दुःख, अनुतापज दुःख आणि दुःखदर्शनज दुःख. पुण्यात्म्याला मात्र ह्यातलं कोणत्याही प्रकारातलं दुःख होत नाही, कारण त्याला खात्री असते की आयुष्यभर आपण सत्कर्मच केली आहेत. मनुष्याला जीवन-मृत्यूच्या चक्रात बांधून ठेवणारे बंध म्हणजे न्यासानुबंध, ऋणानुबंध, वैरानुबंध आणि उपकारानुबंध. मात्र जो कोणत्याच बंधनात अडकलेला नाही त्याला शास्त्रामध्ये उदासीन म्हटलं आहे. हा कोणाच्याच मायेत अडकलेला नसतो तर सर्वांपासून अलिप्त असतो. ह्या बंधनातून स्वतःला आणि आपल्या पूर्वजांना सोडवण्यासाठी काय करता येईल? तर अग्नी साक्ष संकल्प करता येईल की, मी कृतज्ञ आहे, मी पूर्वजांसाठी श्रमाचा, धनाचा आणि वेळेचा त्याग करेन आणि मी केलेल्या सत्कर्म फळांचाही त्याग करेन. यज्ञाचा प्रकाश सूक्ष्म आणि स्थूलाच्या सीमारेषेवर उभा आहे. आपण केलेला ज्ञानपूर्वक कृतीचा संदेश तो नक्कीच पूर्वजांना पोहोचवतो. आजच्या दिवशी गायत्री मंत्राचा यज्ञसाक्ष संकल्प करून त्याचे पुण्य अर्पण करणे हे सर्वात उत्कृष्ट आहे.”
दिवसभर गायत्री मंत्राची आवर्तनं झाल्यानंतर पूर्णाहुती आणि आशीर्वाद मंत्राने यज्ञाची सांगता करण्यात आली.
यज्ञ क्रमांक ३८६, दिनांक १४ ऑक्टोबर २०१८, शतचंडी स्वाहाकार
दिनांक १४ ऑक्टोबर २०१८, म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी होणारा संकल्पित यज्ञ, बदलापूर पूर्व इथे गायत्री गार्डन ह्या स्थळी संपन्न झाला. ह्या दिवशी नवरात्री निमित्त शतचंडी स्वाहाकार आयोजित केला होता. नित्याप्रमाणे सकाळी ठीक ९.३० वाजता यजमानांच्या हस्ते आणि पूज्य आईंच्या उपस्थितीत यज्ञ प्रज्वलन संपन्न झालं. त्यानंतर आवाह्नीय मंत्र, श्रद्धा सूक्त, सिद्ध संप्रदाय लक्ष्मी यंत्रासमोर ऋणमुक्ती मंत्र साधना संपन्न झाल्यानंतर दुर्गासप्तशतीच्या पठण आणि हवनाला प्रारंभ करण्यात आला.यज्ञ ३९२, दिनांक १० फेब्रुवारी २०१९, श्री यज्ञ
सर्व माहिती अधिकार © २०१८
Powered by PRAJAKTA SOFTWARE